एम्. टी. डी. सी. ने यंदा त्यांच्या
डॉर्मेट-यात
पाणी गळत होतं म्हणुन रायगडावरची रहाण्या-जेवण्याची व्यवस्था बंद ठेवलीये असं
कळलं आणि आमचा मूडच गेला..
उडत्या पाखरांच्या
पंखांवर शेवाळं उगवायला लावणारा पाऊस बघायला जायचा मनसुबा होता, जड मनाने तो रद्द
करावा लागला. पण
३ दिवसांची सलग सुट्टी आणि निमआराममधे पूर्ण पैसे भरून महाडपर्यंत आरक्षित
केलेल्या जागा स्वस्थ बसू देईनात. निघायच्या आदल्या रात्रीपर्यंत उद्या कुठे हा विचार डोक्यात
आणण्याचीही फुरसद मिळाली नाही त्यामुळे वाटेतच कुठे जायचे ते बघू असे ठरले आणि
सॅक्समधे सामानापेक्षा अनिश्चितताच जास्त भरून गाडीत बसलो.
स्वारगेटवर दहा-बारा मुलांचा एक ग्रुप दिसला, शॉर्टस्, टीज्, मोठाल्या सॅक्स्, त्यावर बांधलेल्या
मॅट्स्, हसणं-खिदळणं.. झालं, पुन्हा चलबिचल..
गाडी स्वारगेटातून
बाहेर पडून शास्त्री रोड, कर्वे रोड करत शहरातून निघाली आणि ते निवांत रस्ते बघून मग जरा
बरं वाटायला लागलं. जी काही तुरळक वाहतूक सुरू होती, ते सगळे गाडीवले छोटे छोटे तिरंगे
फडकवीत शांतपणे आपापल्या इच्छित स्थळी निघाले होते. आजकाल या रस्त्यांचं हे निवांत दर्शन 'चुकवू नये असे काही' या सदरात मोडत
असल्याने डोळे सुखावत होते. ते बघत बघत एकीकडे नकाशा उघडला आणि महाडच्या पलिकडे नजर टाकली.. दिवाळीत मुरूड-कर्द्यापर्यंतचा
समुद्रकिनारा दुचाकीवर पालथा घातल होता, साहजिकच यावेळी त्याच्यापुढे जायला हवं
होतं त्यामुळे एकमताने असं ठरलं, की आता कोळथरं, दाभोळ, अंजनवेल, गुहागर, वेळणेश्वर, हेदवी हा पट्टा पूर्ण करायचा आणि अगदीच रहावलं नाहीतर सरळ
रायगडफाट्याला उतरण्याचा पर्याय शेवटपर्यंत उपलब्ध होताच...
काहीतरी ठरलं एकदाचं
असं म्हणतोय तोवर गाडीने चांदणी चौक ओलांडला होता. अचानक हातातल्या पुस्तकावरचा उजेड कमी
झाला. बाहेर
अंधार दाटला होता आणि पावसाला सुरुवात झाली होती. मनात सगळ्या सुलक्षणांच्या घंटा वाजायला
लागल्या... तशी
पावसातला रायगड चुकणार ही रुखरुख मोठी होती, त्री पण आजचा दिवस मात्र छान सुरू झाला
होता.. कधी
नव्हे ते जायची तयारी आदल्या दिवशी सकाळीच पूर्ण झाली होती, पहाटे नेहमीसारखं
अजून ५ मिनिटं, फक्त
पाचच मिनिटं असं न रेंगाळता गजर झाल्याबरोबर मी चटकन उठून आवरायला सुरूवात केली
होती, गाडीतही
आरक्षणामुळे मनासारखी जागा मिळाली होती, त्यातून अचानक गोनिदा आणि पेंडश्यांच्या
आवडत्या प्रदेशात जायचा बेत ठरला होता.. मग काय जरा हुरळायलाच झालं मला..
आभाळ अगदी गच्च भरलं
होतं म्हणजे पाऊस ब-याच दूरपर्यंत आमची सोबत करणार हे उघड होतं. हा शुभ संकेत होता. आजुबाजूची झाडं
आधीच्या वर्षावातून सुटून अजून निथळतच होती, तोवर पुन्हा पाऊस सुरू झाला होता, फांड्यांवर बसलेली
पाखरं अंगं झटकत होती, मधूनच येणा-या वा-याच्या झुळूकीमुळं शहारत होती. रस्त्यावरच्या एखाद्या मोठ्या झाडाखाली
त्यातल्या त्यात कोरडी जागा बघून एखादे श्वानमहाशय भिजून गारठून अंग मुरगळून पडले
होते. एकंदरीत
प्रवासाची सुरुवात छान झाली होती. उगाचच कुसुमाग्रजांचं कल्पनेच्या तीरावर आठवलं. त्यांनी जेव्हा
कल्पनेच्या तीरावरून पलिकडच्या प्रदेशात पाऊल ठेवलं तेव्हा तो प्रदेश त्यांना
संपुर्णपणे अनोळखी होता, पुढे चांगलं काही भेटणार की वाईट याबद्दल ते अनभिज्ञ होते. तसं माझं नव्हतं, मी ज्या प्रदेशात
निघाले होते तो प्रदेश मी पाहिला नसला तरी त्याच्याशी माझी तोंडओळख नक्कीच होती, पुढे जी दृश्ये
दिसणार होती त्याची पूर्वकल्पना होती.
गाडीची अगदी
स्वस्थचित्तानं मार्गक्रमणा सुरू होती. अख्ख्या मुळशी खो-यावर ढगांचे पुंजके
अक्षरशः वहात होते, एकही डोंगरशिखर दिसत नव्हतं, दाट धुकं होतं आणि चहूबाजुला असंख्य झरे
खळाळताना दिसत होते... एक चिमुकली टेकडी तर पर्वतीच्या गुडघ्याएवढीही नव्हती पण तिची
रचना अशी झाली होती, तिच्या वरच्या बाजूने वेगवेगळ्या दिशेने असे काही झरे वहात
होते की तिच्यावर झ-यांचं एक सुंदर फुलच तयार झालं होतं! तशीही या पावसाळ्यात मुळशी-ताम्हिणीची वारी
झालीच नव्हती, तेही
दर्शन झाल्यामुळे यंदा जमलंच नाही, ही चुटपूट संपली. इतके झरे बघून बघून मान मोडायला आली. मला जरा बरंच वाटलं, लोक अजून मुळशीत एवढी
गर्दी करत नाहीत जेवढी माळशेज आणि भुशी धरणावर वगैरे करतात, त्यामुळे अजूनही इथे
निवांतपणा आहे. झ-यांची मजा अनुभवत
मधेच एके ठिकाणी थांबून थोडीशी पोटपुजाही आटोपली. त्या पावसात गरमागरम खमंग बटाटवडे आणि
कढत चहा... अहाहा!
आता आम्ही घाटाच्या
जवळ आलो होतो. ताम्हिणीचा
घाट खरा खुप जुना, भाटघर धरणामुळं वरंध काही काळ बंद ठेवण्यात आला आणि हा पुन्हा
वापरायला सुरुवात झाली. पण कित्येक वर्षे वर्दळीपासून दूर राहिल्यामुळे याची रमणियता
टिकून आहे अजून. हा
घाट कोकणात उतरणा-या
इतर घाटांच्या तुलनेत बराच सुलभही आहे, इतरांसारखी खाली सुखरूप पोचणार की नाही
अशी भिती हा घालत नाही. इतरांसारखेच एका बाजुला आत्तापर्यंत अज्ञात असलेले सह्याद्रीचे
बेलाग कडे आणि दुस-या बाजुला बेरजा-वजाबाक्यांनी आ वसलेल्या खोल घळी असा
याचा पसारा. या
घाटात डोंगरवाडीच्या पुढे सह्याद्रीच्या एका सरळ भिंतीला समांतर जाणारा एक खुप
सुंदर जवळपास ३-४
किमीचा सोट रस्ता आहे, त्याच्या दुतर्फा नेहमी ऊंच वाढलेलं गवत असतं आणि अख्ख्या
रस्त्यात एकही खाचखळगा नाही. पण याची मजा मात्र दुचाकीवरून जास्त येते. याही घाटात
खंबाटकीच्या वरच्या तोंडासारखी खिंड आहे, त्यातून बाहेर आल्यावर कोकणाचा प्रचंड
मुलुख दृष्टीपथात येतो.. हवा स्वच्छ असेल तर रायगडावरून दिसते तशी दूरवर एखादी पाण्याची
सोनेरी किनारही दिसत असावी बहुतेक. नुकतंच या घाटाचं काम पूर्ण झालंय. काळेभोर चकचकीत रस्ते, मधोमधची दुभाजकाची
पांढरी तुटक रेघ, नागमोडी
वळणं, खाली
पाहताना घाटाचं सौंदर्य अगदी खुलून दिसतं.
निझामपूर-माणगांव मागे टाकून गाडी
मुंबई महामार्गावर आली तेव्हा आम्ही थेट दापोली गाठण्याचा बेत पक्का केला. हा महामार्गही माझ्या
खास आवडीतला. किती
सुंदर, रहदारी
तुलनेने कमी, बहुतेक
सर्व वेळ याच्या एका बाजूने एखादी नदी नाहीतर लोहमार्ग समांतर जात असतो आणि देखणी
छोटी छोटी टुमदार गावं.. अचानक एके ठिकाणी हा रस्ता सोडून गाडी उजव्या बाजुला खडकाळ
रस्त्याला लागली आणि आम्ही महाडात शिरलो. सगळ्या सुंदर प्रवासाला गालबोट लागू नये
म्हणुन की काय महाडात मुलखाची घाण बघायला मिळाली, कधी एकदा बाहेर पडतो असे केले तिने... महाडातून बाहेर
पडल्यावर पुन्हा सुरू झाली होती नागमोडी वळणं आणि रस्त्याच्या दोहो बाजुंना
वृक्षांची दाटी. मात्र
अजून यात आंबा, फणस, माडपोफळ क्वचितच दिसत
होते... पण
केवढ्या त्या हिरव्या रंगाच्या छटा! कसे ते पानांचे वेगवेगळे आकार! सतत माझे डोळे
विस्फारलेलेच होते. एरवी पुणे-कोल्हापूर प्रवासात कंडक्टरना तिकिट दाखवेतोवरही डोळ्यांच्या
उठाबशा न थोपवू शकणारी मी आज दापोली येईतोवर एक साधी डुलकीही खाल्ली नव्हती. शेजारी बसलेल्या नव-याच्या डोळ्यात
याबद्दल कुतुहलमिश्रित आश्चर्य दाटलेलं होतं. आज ही अख्ख्या प्रवासभर जागी?
दापोलीत उतरल्यावर
दुचाकी नसल्याबद्दल दिवसभरात पहिल्यांदाच आम्हाला थोडं वाईट वाटलं. कारण दुचाकीच्या
तुलनेत बसने फिरताना मर्यादा येणार होत्या.. आता आम्हाला गुहागरला पोचायचं होतं. आधी दाभोळ, तिथून लाँचने वेलदूर
आणि तिथून पुन्हा गाडीने गुहागर असा पुढचा प्रवास होता. आभाळ कमीजास्त प्रमाणात अखंड गळतच होतं. आता सगळीकडेच लालभडक
माती दिसत होती, तीही
ओली.. हिरवाई
दाट दाट होत चालली होती, त्यात आता माड, पोफळी, केळी, आंबे, फणसंही डोकावायला लागली होती.. दोहोबाजुला उतारांवरून आखिवरेखीव
चौकोनांमधे दाटीवाटीनं लावलेली भातं सुरू झाली होती. काय तो त्यांचा तलम पोत, सुरेख पिवळसर हिरवा
रंग, वा-यामुळे त्यांच्यावर
येणा-या
मऊ लाटा, आसमंतात
पसरलेला त्या तांदळाचा खमंग वास! अशी रानंच्या रानं नुसता भात, मधेच कुठेतरी लवंग, मिरीचे वेल, जायफळांची झाडंही
दिसत होती, तर
कुठे प्लास्टिकच्या पिशव्यांनी वरची तोंडं झाकलेली कलमं..
रस्त्यात मोकळी सोडलेली, चहूबाजुला वाढून
ठेवलेला कोवळा लुसलुशीत हिरवागार खाऊ खात मजेत बागडणारी जित्राबं गाडीच्या वाटेत
येऊ लागली होती. पण
त्यांना बघून चालकाचाही भोंग्यावरचा हात हळूवार होत होता,
जेणे करून त्यांनी बाजूला तर व्हावं पण
त्यांच्या समाध्या तर भंगू नयेत, ती दचकू नयेत.. केवढी मजेत हिंडत होती ती, ना त्यांना पावसात जायला आईच्या मागे
भुणभुण करावी लागत असेल, ना पावसात भिजल्यामुळे सर्दी खोकला होत असेल, ना त्यामुळे आजारी
पडून शाळा-ऑफिस
चुकायची भिती वाटत असेल.. बाजुला मुकाट उभे राहिलेले गोपाळ नेहमीप्रमाणे काखांत आडवी
काठी अडकवून, तोंडाचा
आ वासून, त्यात
जीभ अधांतरी लटकत ठेवून, भिरभि-या नजरेने आणि उत्सुकतेपोटी अनवधानाने कपाळावर दाटलेल्या
आठ्यांच्या जाळ्यातून चालकाची ही धांदल बघत होते.. दिवसातून कितिकदा तरी ही मंडळी या
बसगाड्या बघत असतील, पण त्यांच्या डोळ्यातलं या धुडांबद्दलचं ते अप्रुप मावळत नाही..
खिडकीत बसायचा आता
माझा टर्न होता त्यामुळे नवरा जरा वैतागला होता. शेजारी बसल्या बसल्या तो मला सालिम
अलींचं मित्रमंडळ दाखवत असतो सारखा आणि या भागात तर ते अमाप दिसतात. माझ्या पामरीच्या
लक्षात मात्र एखादा दुर्मिळ दिसणारा स्विफ्ट, एखादा खंड्या, एखादा सुतार, एखादा ब्लॅक व्हाईट हॉर्नबील एवढेच
रहातात. यावेळी
हेदवीला चक्क शेकरानं दर्शन दिलं. याला प्रेटरचं मित्रमंडळ म्हणायला हवं.
हेच शेकरू बघायला सहा-सात वर्षांपूर्वी
आम्ही भीमाशंकरमधे ऐन श्रावणात दोन रात्री ठिय्या मारून बसलो होतो. आधीच श्रावण धुवांधार
कोसळत होता, मिट्ट
काळोख, दोन
जणांच्यात असलेलं दहा-दहा फुटांचं अंतर, त्यात शंकराचं ठिकाण म्हणुन उगीचच
वातावरण जरा गुढच.. मला तर एक सस्तन प्राणी बघायच्या नादात दुस-याच अंगावर ठिपके
असलेल्या सस्तन प्राण्याची भिती वाटायला लागलेली आणि दोन सस्तन प्राण्यांच्या
नादात तिस-याच
सस्तन प्राण्याचा गेलेला बळी दिसायला लागून डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले होते.. असो.
गच्च दाट झाडी म्हणजे
काय याचं प्रत्यंतर दापोली ओलांडलं की क्षणोक्षणी यायला लागतं. बाजुच्या झाडांच्या
फांद्या खिडकीतून आत येत होत्या आणि गालांवर सपकारे हाणत होत्या. झाडांची घनदाटी. अतिशयोक्ती होईल, तरीही म्हणायला हरकत
नाही की काही काही ठिकाणी अजूनही यांच्या खाली सुर्यप्रकाश पोचू शकत नसेल बहुतेक. सध्या विनय आपटेंच्या
'छत्रपती
शिवाजी' मालिकेत
चंद्रराव मो-यांचं
बंड निपटायला महाराज जावळीत उतरलेत.. कसली हो ती जावळी? फिल्मसिटीत वाढलेली
समान अंतरावरची एकाच पोपटी रंगाची जेमतेम ७-८ फुट उंचीची विरळ फांद्यांची ती झाडं. जावळीचं शुटिंग खरंच
कोकणातच करायला हवं होतं त्यांनी.
आता जवळपास प्रत्येक
फाट्यावर गाडी थांबत होती. किती फाटे? रेवतळे फाटा, कोळथर फाटा, उमराठ फाटा, सोवेली फाटा.. असंख्य असंख्य. जितकी आडवळणाची गावं, तितके फाटे. एरवी अशी सगळीकडे गाडी थांबत गेली असती
तर मी पॅसेंजर म्हणुन हिणवलं असतं पण इथे तसं वाटलं नाही मला. प्रत्येक फाट्यावर
उतरणा-यांना
घ्यायला आलेल्यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वहात होता तर उअतरणा-यांच्या चेह-यावर घ्यायला आलेल्यांना बघून गहिवरलेला
जिव्हाळा निथळत होता. तिथे एखादी व्ही.आय.पी, अॅरिस्टोक्रॅट,
एखादी स्पोर्टस्बॅगवाली जीन्स उतरायची
तशी एखादी गुडघ्यापर्यंत घट्ट नेसलेली नऊवारी, एखादी गुडघ्यापर्यंतचीच चौकटींची लुंगी
चढायची. उतरलेली
माणसं गर्द झाडीत लुप्त होणा-या लाल मातीच्या पायवाटेवर झपाझप चालू लागायची. ती पायवाट बघून असं
वाटायचं की बचकभर माती मुठीत घेऊन तोंडात कोंबावी आणि तिनं सगळं तोंड नंडाच्या
लोणी खाणा-या
कॄष्णासारखं माखून घ्यावं.. ती अफाट चव असेल यात तीळमात्र शंका नाही!
सानेगुरुजींचं पालगड
ओलांडून गाडी एका सरळ लांबूडक्या रस्त्याला लागली. दूतर्प्फा महाकाय वृक्ष त्या रस्त्यावर
वाकले होते, सगळे
वड-पिंपळच. त्यांच्या पारंब्या
रस्त्यावर अधांतरी लटकत होत्या. एक सुंदर नैसर्गिक महिरपीची कमान तयार झाली होती. ते इतकं विलक्षण दिसत
होतं की जणु काही धीरगंभीर ऋषीमुनीच समोरासमोर बसून एकमेकांच्या गळ्यात गळे
घालतायत आणि त्यांच्या लांब वाढलेल्या दाढ्या खाली लोंबतायत! त्याखालचा रस्ताही
असा क्वचित सरळ सापडत होता. नाहीतर हे रस्ते म्हणजे एखाद्या षोडशेप्रमाणे बाकदार वळणे आणि
तीव्र चढ-उतार
असणारे.. तिनं
तिच्या मनाला येईल तसं बागडावं, मुरडावं आणि इतरांना आपल्या तालावर नाचवावं! अशावेळी अशोक लेलँडचं
खुप कौतुक वाटतं. या
गाड्यांबद्दल माझ्या मनातला एक कॉर्नर अजूनही सॉफ्ट होतो आणि लहानपणच्या सयी दाटून
येतात. मी
आणि माझी धाकटी बहीण पहिली ते चौथी ज्या बसने शाळेत जायचो ती अशोक लेलँडची होती. तिच्यावर भलीमोठ्ठी
जलाराम ट्रान्स्पोर्टची जाहिरत होती. शाळेव्यतिरिक्त ती बस रस्त्यात कुठेही
दिसली की आम्ही जलाराम दिसली, जलाराम दिसली म्हणत उड्या मारायचो. आणखी एक म्हणजे माझा आत्तेभाऊ लहान
असताना माझे बाबा त्याला एका हातानं चाक फिरवून दुस-या हातानं गेअर टाकत आणि तोंडानं घाट
चढल्याचा आवाज काड्।अत ट्रकड्रायव्हरची नक्कल करून दाखवायचे. आणि तो भोळसट प्राणी
बावळट्ट चेहरा करून, डोळे फाडून आत जाऊन आत्याला विचारायचा,
आई, अण्णामामाकडं खरंच ट्रक आहे का गं? अशा या अशोक लेलँड
म्हणजे जेव्हा या घाट चढायला लागतात तेव्हा असं वाटतं की आता टेक ऑफ घेतात की काय
आणि उतरताना वाटतं आता खिडकीतून खाली पडतो की काय! केवळ त्या म्हणुन या लचकणा-या नखरेल रस्त्यांचे
लाड पुरवायला पु-या
पडतात!
इथे माणसांचे
निरनिराळे प्रकार बघायला मिळतात. सडसडीत बांध्यांच्या गुडघ्यापर्यंत घट्ट नऊवार नेसलेल्या आणि
तेज चालणा-या
कुणबिणी, तशीच
लुगडी नेसलेल्या कोपरापर्यंत बाह्यांची पोलकी घातलेल्या, अंबाड्यात फुलं माळलेल्या, सुरकुतलेल्या नाकात
खापरपणजेसासूची वाटावी इतकी परंपरागत नथ घातलेल्या, मोठी भोकं असलेल्या कानाच्या पाळ्या
लोंबणा-या
(ही
पाहिली की मला राजगडाचं नेढं आठवतं!), कुळकुळीत काळ्या पण तुकतुकीत कांतीच्या
डोक्यावर वेताच्या दुरड्या घेतलेल्या कोळणी, नखशिखांत बुरखे ओढलेल्या, मेरे मेहबूबच्या
साधनाची आठवण देणा-या सुंदर डोळ्यांच्या आणि गो-यापान हातांच्या खानदानी मुस्लिम
स्त्रिया, त्यांच्यासोबतचे
मेंदीने केस आणि दाढी रंगवलेले पुरुष, लांबसडक घट्ट शेपटा, त्यावर खोचलेला एखादा
नाजुक मोगरा किंवा गुलाब, शेवग्याच्या शेंगेसारखा बांधा, घारे डोळे आणि भरपूर तेल प्यायलेल्या
पुरणाच्या पोळीच्या कणकेसारखी नितळ मऊसूत लख्ख त्वचा असलेल्या प्रसन्न चेह-याच्या कोकणस्थ
स्त्रिया.. प्रत्येक
बस थांब्यावर असे संमेलनच भरलेले असते.
या सगळ्या धामधुमीत
एक गोष्ट लक्षातच आली नाही, ती म्हणजे आज सकाळपासून नारायणरावांनी दर्शनच दिलं नव्हतं! तशी त्यांची पेढी
वेळेवर उघडली होती पण माल बाहेर मांडण्याची त्यांना बाजारातल्या इतरांनी संधीच
दिली नव्हती. आज
मेघराजच आपला माल खपवत होते.. हा पाऊस अनुभवण्याचेही किती वेगवेगळे आनंद आहेत.. छत्री घेऊन, रेनकोट घालून, खिडकीत बसून, दुचाकीवरून जाताना, चालत, गाडीत बसून.. प्रत्येक आनंद निराळा. यंदा नवा रेनकोट
घेतल्यापासून सारखं पावसात भिजायला मिळालं, अगदी भाजी आणायला पण मी रेनकोट घालून
जाते.. बाकीचे
सगळे आडोसे धरून उभे असतात, छत्रीवाले कमीत कमी भिजायच्या धडपडीत,
काहीच सोबत नसलेले पळापळीत आणि मी मात्र
त्यांची धांदल, मौज
बघत आरामात, मजेत...
अशा प्रवासांमधे
पर्यटकही फलातून बघायला मिळतात. दुस-या दिवशी आम्ही वेळणेश्वरच्या ओवरीत बसलो असताना तिथले एक
गुरुजी एका एम्.एच्.३१ वाल्याला सांगत
होते की हे देऊळ जवळपास ५०० वर्षे जुनं आहे. तो भारावून जोरजोरात मान हलवत म्हणाला, म्हणजे पेशव्यांच्या
काळचं की! गुरुजी
चाट आणि आमची पाची बोटं तोंडात! मनातल्या मनात दोन्ही हातांनी कपाळावर मारून घेतलं.. लोक आपल्या
बाळगोपाळांना घेऊन फिरायला येतात पण सारख्या सूचना आणि सख्त पहारा. ए! तिकडे जाऊ नको, ए! उड्या मारू नको, ए! पळू नको, ए! पुढे जाऊ नको, ए! पाऊस आहे, भिजशील, लक्ष कुठेय तुझं, लाल मुंग्या दिसत
नाहीत का, चावतील
की...!! अरे
हो, हो! किती ते जपायचं? ती चिमणी पोरं नुसती
उधळलेली असतात, उनाडत
असतात, एवढं
मोकळपण, वाट्टेल
तितकं हुंदडण्यासारख्या रिकाम्या जागा कधी नव्हे ते मिळालेल्या असतात, पण ही आई-बाबा मंडळी ते
त्यांना धड करू देतील तर ना! कशाला इतकी नस्ती काळजी करावी? बघू गं, होऊ दे काय व्हायचं ते, चावेना एखादी मुंगी, आपोआपच उचलील की तो
पाय.. असं
म्हणलं तर बिघडेल का! पण हे लोकं ना त्यांना उंडारू देतात ना स्वतः उंडारतात!
आता समुद्र पहायची
तीव्र उत्कंठा लागली होती. पण तो काही केल्या येतच नव्हता. एके ठिकाणी गाडीनं जरा मोठं वळण घेतलं
आणि अचानक समोरच आला एकदम! दिसला एकदाचा! दोन टेकड्यांमधून आत आलेलं खाडीचं पाणी, समोरच्या दोन्ही
तीरांवर वसलेली छोटी छोटी गावं, अलिकडच्या किना-यावरची एका रांगेतली सुरूची झाडं, नांगरून पडलेल्या लाँचेस आणि
मोटरबोट्सची गर्दी, बर्फाचे ट्रक्स, कोळ्यांची लगबग,जुन्या दगडी इमारती, दाट झाडीत लपलेली
उतारावरचे घरं.. असं
ते देखणं चित्र होतं टुमदार दाभोळचं! गोनिदा आणि पेंडश्यांच्या पुस्तकांमधे
पुन्हापुन्हा भेटणारं लाडकं गाव! गाडी प्रचंड उतार असलेली वाकडी वळणं घेत घेत खाली थेट बंडराला
येऊन थांबली आणि लक्षात आलं, पेंडश्यांनी 'एक होती आजी'त वकिलांचा जावई मोटरसायकलवरून ज्या रस्त्यावरून सुसाट येताना
दाखवलाय तोच हा रस्ता. तो वरून भन्नाट वेगात सुसाटत येतो आणि सरळ गाडीसकट त्याच वेगात
जलसमाधी घेतो. मी
तो रस्ता कसा असेल याची मनात कल्पना केली होती पण प्रत्यक्षातला हा रस्ता फार फार
रमणीय आहे, माझी
उडी तिथवर पोचली नव्हती. इथून पुढे दोन दिवस मी प्रत्येक ठिकाणी त्या दोघांनी
लिहिलेल्या वर्णनांचे पडताळे घेत राहिले.
इथली देवळंही तर कशी
साधीसुधी आणि स्वच्छ. गाभारे शोडषोपचारे आटोपलेल्या पुजेअर्चेने प्रसन्न असतात आणि
मनोभावे वाहिलेल्या फुलांच्या सुगंधानी दरवळत असतात. काही अपवाद वगळता इथले देवही आपण रहातो
तशाच साध्या घरांमधे रहातात. त्यामुळे देव परका वाटत नाही, त्याच्या आपल्यातलं अंतर नाहीसं होतं
आणि आपण त्याच्या जास्त जवळ जातो. असंही वाटतं, कदाचित म्हणुनच कोकणातले बहुतेक सगळेच एव नवसालाही लवकर पावणारे
आहेत..
काही काही ठिकाणी जसे
रस्ते गच्च झाडीतून जात होते तसे काही ठिकाणी गच्च घरांच्या दाटीतूनही.. दुस-या दिवशी आम्ही
गुहागर-वेळणेश्वर
जात असताना गाडी पालशेतमधून जात होती, ती अगदी कशीबशी वळू शकत होती इतका तो
रस्ता त्या गावातून घरांच्या गर्दीतून गेला होता. ते बघून मध्यंतरी पेडर रोड वादंग चुलीवर
रटरटत असताना, लक्ष्मण
की कुणी काढलेल्या कुठल्याशा वृत्तपत्रात पाहिलेल्या व्यंगचित्राची मजेशीर आठवण
झाली मला. त्यात
उड्डाणपूलावरून चाललेला एक दुचाकीस्वार बाल्कनीत उभ्या असलेल्या स्वरसम्राज्ञीशी
हस्तांदोलन करत होता आणि चक्रावलेल्या चिंटूच्या चेह-यावर चारुहास पंडित कसे असंख्य चकल्या, तारे, चांदण्या, हवेत उडणारे उभेआडवे
थेंब दाखवतात तसे लतादिदींच्या चेह-याभोवती दाखवले होते! हसून पुरेवाट झाली होती माझी. तोच प्रकार इथेही
घडणं अगदी सहज शक्य होतं! एखाद्या स्त्रीनं घरातल्या माणसांबरोबरच पोह्यांची ताटली
ड्रायव्हरलाही पुढे केली असती किंवा वरच्या मजल्यावरची कुणी सुबक ठेंगणी ऊन खायला
किंवा ओले केस झटकायला म्हणुन छपरावरून चालत सहजपणे गाडीच्या टपावर येऊन बसली असती! मी तरी कसली वेडी, काहीही कल्पना करत
असते..
इथली घरं तरी कशी
सुरेख! किती
प्रशस्त! घरांची
खाली उतरलेली छपरं, चहूबाजुंनी मोठमोठाली धोपटून सारवलेली चकचकीत अंगणं, त्यांच्या बाजुला
जाईजुईचे वेल, अबोली, शेवंती, सदाफुली, जास्वंद, प्राजक्त, सर्व प्रकारचे चाफे, बकुळ आणि अशीच
कित्येक फुलझाडं (हेदवीच्या
लक्ष्मीगणेशाला तर चाफ्याने मढवलं होतं, तब्बल ८-९ प्रकारच्या जास्वंदांनी!), चिक्कू, केळी, कोकमं, अंगणार उतरवून
ठेवलेले नारळ-सुपा-या, प्रत्येक घरातया
ऐसपैस ओट्या, त्यावर
बांधलेले लोखंडी कड्यांचे जड लाकडी झोपाळे, ओट्या-अंगणामधल्या लाकडी किंवा लोखंडी सळया
असलेल्या भिंतीवजा चौकटी, त्यातनं अनुक्रमे आत-बाहेर करणारा गारवा आणि उकाडा, प्रशस्त गोठे, त्यातली तृप्त जनावरं, वाडीतल्या प्रत्येक
छोट्यामोठ्या झाडा-झुडुपापर्यंत पोचवलेले शब्दशः झुळझुळणारे पाण्याचे पाट, दगडी चि-यांनी बांधून
काड्।अलेल्या रहाटांच्या खोल विहिरी, तशाच चि-याणी बाधलेले कुंपणांचे गडगे.. आणि या सर्वातून
शांतपणे पण अखंड कामात असलेले कोकणातले हसतमुख लोक.. काय काय आणि काय काय.
आजवर कधीही आम्ही
कोकणात गेल्यावर हॉटेलव उतरलेलो नाही. घरगुती व्यवस्थेची पाटी वाचून एखाद्या
कुटुंबात रहायचं, माहितीची
देवाणघेवाण करायची, ते जे देतील ते खायचं, ते जसे रहातील तसं रहायचं.. गेल्यापासून फारतर
एखाद्या तासाभरात आम्ही त्यांच्या घरातलेच होऊन जातो आणि त्यातूनच निर्माण होतात
आपुलकीची नाती. कोकणी
माणुस मुळातच प्रेमळ आणि अगत्यशील. याचं प्रत्यंतर दर खेपेल वारंवार येत रहातं.. मुक्तहस्ते ओलं खोबरं
ओतलेले बारीकशी दिसेल न दिसेलशी हिरवी मिरची घातलेले शुभ्र पांढरे बिनफोडणीचे
दडपेपोहे, हिरव्यागार
केळीच्या पानांवरचे लोण्याचा गोळा आणि खाराची मिरची ठेवलेले गरमागरम पानगे, तोंडात विरघळणारे
वाफाळते उकडीचे मोदक, मोहक दिसणा-या सोलकढीसोबत घमघमणारा भात, स्वादिष्ट कुळथाचं पिठलं, घासागणिक लसूण
लागणारी खमंग तांदळाची उकड.. वगैरे वगैरे! अगदी निघताना वाटखाऊ म्हणुन मिळणारे फणसाचे गरे, खारवलेला आवळा, आंब्याफणसाची साटं, सोबत कोकमाची सोलं, घरच्या पोह्यांचे पापड ही शिदोरी. हे सगळे आनंड, हे कोकणी जीवनदर्शन, हॉटेलमधे उतरून कुठे
मिळायला?
किती लिहायचं या
कोकणाबद्दल? हा
तर फक्त ट्रेलर, अख्ख
चित्रपट दाखवणं माझ्या आवाक्याबाहेरचं.. आणि तो ज्यानं त्यानं आपापलाच
बघण्यासारखा. बस्स! तीन दिवसांची सुट्टी
जायच्या दिवशीच वसूल झाली होती, पुढचा सगळा फक्त बोनस होता. माझीच झोळी निसर्गापुढे दुबळी ठरत होती, घेता किती घेशील दो
कराने अशी अवस्था.. सुरुवातीची रायगड चुकल्याची रुखरुख आता, 'बरं झालं, म्हणुनच इकडे येणं
झालं' मधे
बदलली होती. परशुरामाची
ही पवित्र भूमी मी जेव्हा जेव्हा तिच्या दर्शनाला जाते तेव्हा तेव्हा नित्यनवे
आविष़्आर दाखवत असते. आयुष्याच्या अंतापर्यंत मी तिच्याकडे अशीच जात रहाणार आहे, अतृप्तपणे येरझा-या घालणार आहे आणि
तरीही हे कधीच अनुभवून संपणार नाही..
देवा, असशील तर आणि तुझ्या
हातात असेल तर पुढच्या जन्मी मला कोकणात जन्माला घाल...!