माहिती
नाही पण आज दिवस चांगला चालू झाला, उगीचच जाग आल्यावर सक्काळी सक्काळी
अंथरुणातच काही छान आणि आवडत्या आठवणी आल्या, सकाळी उगीचच सगळी कामे वेळेत
झाली (रोज उगीचच उशीर होत असतो, का याला काही उत्तर नाही ) निवडायला खूप
उशीर करूनही हिरव्या माठाने तग धरला आणि मावशींनी मला हवी तशी चरचरीत
परतलेली भाजी केली, पांढरे वाटाणे एरव्ही टणाटणा उड्या मारतात पण आज अगदी
मनासारखे शिजले, योगेशने न कुरकुरता सकाळी नारळ
फोडून दिल्यामुळे ओल्या नारळाच्या करंज्या झाल्या, ठरवलेला बेत
डब्यांमध्ये जाउन बसला, नीलने पटापट आवरून घेउन नेहमीसारखंच आनंदाने टाटू
केलं, वेळेत बाहेर पडले, झाडून सगळे सिग्नल्स माझीच वाट बघत असल्यासारखे
हिरवे मिळाले, कोल्हापूरहून अनपेक्षितपणे आत्याचा कडाकण्या पाठवत असल्याचा
फोन आला आणि पोचल्याबरोबर साधेसेच पण आवडत्या मैत्रिणिंचे gm मेसेज येउन
पडले होते मी वाचायची वाट बघत… संध्याकाळी मायबोलीवर एक सुरेssssख लेख मालिका वाचली... सुरुवात चांगली झाली की मग पुढचा दिवसही तसाच स्मूथ जात रहातो…
पुरे झाली की एवढी कारणं आनंद आणि आनंदी होण्यासाठी… रोजच्या आयुष्यात आणखी काय शोधायचं आणि रोज नवं तरी काय घडणार?
पुरे झाली की एवढी कारणं आनंद आणि आनंदी होण्यासाठी… रोजच्या आयुष्यात आणखी काय शोधायचं आणि रोज नवं तरी काय घडणार?