पुण्यात येऊन, स्थायिक होऊन, बरीच वर्षं झाली आता. कोल्हापुरात
जितकी वर्षं राहिले त्याहीपेक्षा जास्त. म्हणजे मी आता पुणेकरच खरंतर.
तरीही इतक्या वर्षांत नेहमीची ८-१० यशस्वी ठिकाणं सोडल्यास मी पुणं मुद्दाम
वेळ काढून पाहिलंच नाही कधी. तो विचार मात्र होता, मनातल्या कुठल्यातरी
सांदी-कोप-यात मुटकुळं करून पडून.
सध्या भारताबाहेर वास्तव्य असणारी मैत्रिण पुण्यात आल्यावर म्हणाली, एक
पूर्ण दिवस सोबत घालवू या आपण. तेव्हा मग पर्यायांचा विचार करताना हा 'पुणे
दर्शना'चा विचार उसळी मारून पृष्ठभागावर आला आणि आनंदाने एकमताने मंजूरही
झाला. लगेच सोयीचा दिवस ठरवून बुकिंगही करून टाकलं.
खुप उत्सुकता होती या एकंदर सहलीची. काय काय दाखवतील, वेळ कसा पुरेल,
कसा अनुभव असेल, दगदग होईल का.. वगैरे उगीचच वायफळ शंकाही होत्या. सहलीहून
परतताना ह्याच शंकेचा फोलपणा जाणवून हसू आलं खुप.
पूर्ण दिवसभराची, अत्यंत उत्तम सहल आहे ही. स्थळांनुसार मार्गांचे आणि
वेळेचे योग्य नियोजन, स्थलदर्शनासाठी पुरेसा अवधी, वेळेचे काटेकोर पालन,
प्रत्येक ठिकाणाची नियमांसकट उत्तम माहिती देणारे गाईड, उत्तम स्थितीतली,
माफक सजावट केलेली स्वच्छ हवेशीर बस, गाईड आणि वाहकाचं पर्यटकांप्रती
सुहास्य वदने आदबीचं वर्तन, हे सगळं खुप सुखावणारं चित्र होतं.
केसरीवाडा, सावरकर स्मारक (बाह्यदर्शन), शनिवारवाडा, लाल महाल, आगाखान
पॅलेस, शिंदे छत्री, युद्ध स्मारक, कात्रज प्राणी संग्रहालय, बागुल
उद्यानाशेजारचं महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पु.ल. देशपांडे उद्यान, राजा
केळकर संग्रहालय, चतु:शृंगी मंदिर, डॉ. आंबेडकर संग्रहालय.. ही स्थळं आम्ही
पाहू शकलो. काही पार्किंगच्या अडचणीमुळे तर काही रविवारच्या सुट्टीमुळे
पाहता आली नाहीत. उदा. महात्मा फुले वाडा, जोशी रेल्वे संग्रहालय, आदिवासी
वस्तू संग्रहालय, श्रीमंत दगडूशेठ गणेश मंदिर, पुणे विद्यापीठ (बाह्यदर्शन)
वगैरे. पाहिलेल्या स्थळांकडे नजर टाकल्यास मार्गाच्या आखणीची साधारण
कल्पना येऊ शकेल. हे सगळं पाहताना, बसमधून जाता-जाताच डेक्कन जिमखाना,
कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, चितळेंचं दुकान, विश्रामबाग वाडा, तुळशीबाग,
लक्ष्मी रस्ता, सिंहगड रस्ताही आपसुकच कव्हर केले गेले, त्यांचीही महत्वाचे
रस्ते, पुण्याची ओळख असलेली ठिकाणं म्हणुन विशेष माहिती देण्यात आली. मला
हे खुप महत्वाचं वाटलं आणि आवडलं. या वेळापत्रकात वेळेअभावी पर्वती,
खडकवासला, सिंहगड ही महत्वाची ठिकाणं समाविष्ट होऊ शकत नाहीत. पुढेमागे
मुदत वाढवून एका मुक्कामाची सहल झाली तर पुण्याची ओळख अगदी परिपूर्ण होईल.
सहलीचा पहिला भाग थोडा निवांत तरीही खुप सारी स्थळं सामावलेला आहे.
जेवणानंतर भेट द्यायची स्थळं मात्र जरा वेळखाऊ आणि तुलनेने किंचीत जास्त
पायपीटीची आहेत. पण मार्गानुसार पाहिल्यास ते होणं क्रमप्राप्त आहे. सगळी
ठिकाणं तुम्ही पाह्यलाच हवीत असं अर्थातच नाही, त्यामुळे दगदग होईल असं
वाटल्यास एखादं स्थळ न बघता ती टाळता येऊ शकते. दिलेल्या अवधीत प्रत्येक
स्थळ बघून होईलच असेही नाही, पण त्या स्थळाचं स्वरूप आणि महत्व समजण्याइतका
तो नक्कीच पुरेसा असतो, जेणे करून आपण पुन्हा जाऊन निवांतपणे ते पाहू
शकतो. एक बाब आवर्जून नमुद करावीशी वाटते की भेट दिलेली सर्वच स्थळं उत्तम
देखरेख असलेली, तिकिटांची सोय असलेली, प्रभाव पाडणारी आहेत. बहुतेक सर्व
ठिकाणी उत्तम स्वच्छतागृहांचीही सोय आहे.
आम्ही तिघी मैत्रिणी, त्यापैकी दोघी आपापल्या मुलांसकट, असे पाच जण
होतो. आम्ही आणि मुलांनीही सर्व स्थळे पाहिली. दमणूक मुळीच झाली नाही कारण
स्थळ-भेटींदरम्यान बसमधे आपल्याला आरामच मिळतो. अतिशय आल्हाददायक हवेमुळे
प्रसन्न वातावरण होते. योगायोगाने आमच्यासोबत आमच्यासारखेच पुणं बघायच्या
इच्छेने आलेले पुणेकर खुप होते, अख्खी मिनीबस मराठी लोकांनीच भरली होती.
"पुणे दर्शन कसलं करताय, रविवार आहे तर गप घरात पडून रहा.. हेहे पुण्यात
काय आहे बघण्यासारखं.. काहीही करतात लोकं.." अशा न विचारताही आगाऊपणे
आलेल्या हेटाळणीयुक्त अभिप्रायांच्या पार्श्वभूमीवर तर ही बाब मला आनंदाची
वाटली, की आहेत बाबा आमच्यासारखे आणखी काही वेडपट लोकं! विशेष आनंद ह्याचा
झाला की दैनंदीन सेवा असूनही बसचे आगाऊ आरक्षण करावे लागते. पूर्ण पैसे
भरून आरक्षण केलेले असूनही कुणी येवो अगर न येवो, बस वेळेवरच सुटते, ही
आणखी एक कौतुकाची गोष्ट.
आम्ही सगळ्यांनी या सहलीचा पुरेपूर आनंद घेतला. जेवणाच्या डब्यांसोबत
भरपूर खाऊही नेला होता, वाटेत खिडकीतून बाहेर बघत तो खाऊ खायला खुप मजा
आली. स्थलदर्शनासाठी उतरताना ओझी बसमधेच ठेऊन सुटं, मोकळं फिरत होतो.
सारसबागेजवळ जेवायला बस थांबल्यावर बाकी सगळे हॉटेलमधे जेवायला गेले तेव्हा
आम्ही मात्र बागेतल्या हिरवळीवर वर्तमानपत्रे पसरून डबे उघडून मस्त पिकनिक
लंच घेतलं. मुले तेवढ्याच वेळात तिथे भरपूर खेळलीही. मला व्यक्तिशः
बाजीराव रोडवर, लक्ष्मी रोडवर असं बसमधून फिरताना, आपली बस इथे थांबणार
नाही आणि त्यात धक्काबुक्की होणार नाही या प्रत्यक्षातल्या कल्पनेने खुपच
गंमत वाटली.
मला पुणं आवडतं. मला आणि माझ्या मुलाला सार्वजनिक वाहनांनी फिरायला
भयंकर आवडतं. त्यामुळे सहल आवडणार हे गृहीत होतं. पुण्यातून असं एका
दिवसभरासाठी नवं, अनोळखी होऊन फिरताना मनात अनेक विचार येत होते.
पुण्याबाहेरून आलेल्यांना काय काय दाखवायला हवं ते लक्षात आलं. मी त्यांना
पुणं फिरवताना मुळात मी पुण्याकडे कसं पाह्यला हवं हे समजलं. प्रशासन ज्या
चांगल्या गोष्टी करतंय, त्याची दखल घेऊन त्याबद्दल कौतुकाची थापही पुणेकर
नागरीक या नात्याने मी द्यायला हवी, हे जाणवलं. वाहतुकीच्या कोंडीत
अडकलेलं असताना दिसणारं पुणं, अव्यवस्था असणारं पुणं ओलांडून त्यापलिकडच्या
पुण्याकडे बघायला मला या सहलीची अतिशय मदत झाली. कारण अशी अव्यवस्थेची
बाजू ही प्रत्येक शहराला असते, ती काही एकट्या पुण्यालाच नाही.
इतिहास-वर्तमानाशी एकाच वेळी घट्ट नाळ असलेली अभिमानास्पद स्थळं, २५० शाळा,
१८० कॉलेजेस, ४० सिनेमागृहे, १० नाट्य्गृहे, ४० आयटी पार्क्स, अगणित बागा
आणि नदी-ओढ्यांवरचे पूल, रस्त्यांचं आणि आता उड्डाणपूलांचं जाळं, हर एक
वस्तूची जुनी-नवी बाजारपेठ, सणावारांची खासियत, पारंपरीक आणि आधुनिकतेचा
उत्कृष्ट मिलाफ असलेलं खाद्यजीवन.. हो, इथे काहीच उणं नाही.
केवळ एक दिवस वेगळा काढल्यामुळे मला पुण्याकडे बघण्याचा असा सुंदर
नजरिया मिळाला. बाहेरून आलेल्या पर्यटकालाही तोच मिळत असणार. हा दृष्टिकोन
पुढे पास करणं मला आवश्यक वाटलं. पुणे दर्शनाच्या या आढाव्याचा तोच मुख्य
हेतू. त्यासाठीच स्थळांचं वर्णन कटाक्षाने टाळलं, जे अतिशय मोलाचं आहे,
ज्यावेळी तुम्ही पुणे सहलीला जाल, आणि मी तर सुचवेन नक्की जाच,
मुलाबाळांसकट, कुटुंबिय, मित्रमंडळींसह, तेव्हा प्रत्यक्ष त्या स्थळीच
गाईडकडून ऐकताना काय वाटतं ते अनुभवण्यासारखं आहे...
तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करायला विसरू नका, मला ऐकायला खुप आवडेल.