घन तमीची त्रिमूर्ती..
घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी
फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?
मना, वृथा का भीशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरीं
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ghan_Tami_Shukra_Bagh
अलिकडेच वाचनकट्ट्यावर विशाल कुलकर्णीने या गाण्यावर लिहिलेलं सुरेख स्फुट वाचलं. आरती खोपकर, हर्षद पेंडसे, अविनाश चव्हाण, शशांक आणि अंजली पुरंदरे, सायली कुलकर्णी, दीप्ती जोशी, अमोल कुलकर्णी अशी स्नेहीजनांची उपस्थिती आणि गाण्यावरची मते.
कविवर्य भा. रा. तांबेंच्या कवितेवर एक मन समृद्ध करणारी अप्रतिम चर्चा झाली. आशावाद, स्थितप्रद्न्यता, प्रेम, कारूण्य अशा विविध भावना समर्थपणे व्यक्त करणा-या त्यांच्या कविता मंगेशकर बंधू-भगिनीद्वयाने तितक्याच सामर्थ्याने आपल्यापर्यंत पोचवल्या.
मला नेहमी ही गाणी ऎकताना वाटतं की ह्या तशा रूढार्थाने गेय कविता नव्हेत. तरीही त्यांना सुरेल बुद्धिमान सुरावटीत गुंफलंय. बरं, जरी यांना चाली लावल्या तरी त्या कविता म्हणुनही इंटॆक्ट राहिल्यात, इतर बहुतेक वेळी होतंच तसं त्यांचं फक्त गाणं झालेलं नाही. जीवनाची जी तत्वे त्या कवितेत उद्ध्रुत केली आहेत ती तत्वे सुरावटीतूनही तितक्याच ताकदीने प्रतिबिंबीत होतात. 'ये बाहेरी अंडे फोडूनी' हा तारस्वर ताकदीने कवच फोडून बाहेर येण्याची साद तंतोतंत घालतो, 'फूल गळे', 'बीज नूरे', 'तेल गळे'.. हे शब्द वरून खाली ही उतरंड चपखल दर्शवतात तर 'आई पाही वाट रे मना'ला खरोखरीच छातीशी कवटाळायला आसूसलेली आई डोळ्यांसमोर उभी रहाते. विशाल कुलकर्णीही परवा म्हणाला तसं शुक्र बघ राज्य करीच्या 'रा'वरच्या आलापातून आसमंतात पसरलेले शुक्राचे अथांग साम्राज्य आपल्यापर्यंत पोचते.
असो, फक्त मंगेशकरांवरती बोलायचे नाहीये खरंतर; त्या अख्ख्या त्रैमूर्तीबद्दलच माझ्या मनात एक ग्रेटफुलनेस आहे. 'तिन्हीसांजा'मधली प्रियेला वचन देण्याच्या क्षणी विश्वातल्या सगळ्या चराचराला साक्षी ठेवण्याची प्रेमात पडायला लावणारी कल्पना असो किंवा तिलाच कशा स्वरुपात मनात साठवीन हे सांगण्यासाठी वापरलेली रुपकेही तशीच मन ओथंबून टाकणारी.. एखाद्याच्या मनात असावं तर असं, असं वाटायला लावणारी!
हे सगळं सांगायला निवडलेली वेळही मन कातर करणारी. मावळत्या सूर्याला नमन करून कृतद्न्यता व्यक्त करण्यासाठीचीही पुन्हा हीच वेळ. एकीकडे 'मना वृथा का भिशी मरणा' तर एकीकडे 'ढळला रे दिन सखया, संध्याछाया भिवविती हृदया'.. या प्रत्येक भावनेशी मी स्वत:ला थेट रिलेट करते. लता कवीला अभिप्रेत असलेली ती ती भावना मला भेटवते.
घन तमी हे गाणं माझ्यासाठी खास आहे. माझ्या मते त्यात टोकाचा आशावाद ठासून भरलेला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला लो वाटतं, निराशा येते, तेव्हा तेव्हा मी हे गाणं आवर्जून ऎकते. अंग झडझडून उभी रहा, बघ डोळे उघडून भोवताली, हे जीवन सुंदर आहे, मुळूमुळू रडण्यात ते वाया जाऊ देऊ नको, असं ते ठणकावून सांगतं मला! उभारी, तरतरी येते मग. मळभ बाजूला सारण्याचं बळ येतं.
एरवी इतक्या तीव्रतेने भारांच्या वाटेला मी गेले असते का, शंका आहे. मर्ढेकर मला जड जातात तसेच भाराही कदाचित ऑप्शनला पडले असते आणि माझी केवढी हानी झाली असती. केवळ या विचारानेही अस्वस्थता येते. मग मंगेशकरांसमोर नम्र होण्यावाचून पर्याय रहात नाही. राहून राहून हा विचार मात्र मनात येतोच की भारांनी या 'कविता' ऎकायला हव्या होत्या, शब्द-सुरांची ही लेणी त्यांनाही प्रसन्न करून गेली असती.
या तिघांनाही माझा सादर दंडवत _/\_