म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, June 30, 2016

वीणाताई,
खुप आनंद दिलात आम्हाला, कायम देत रहाल.
तरतरीत, भारदस्त गायनाचा वस्तुपाठ होता तुम्ही.
गेल्याच महिन्यात आकाशवाणीवर व्यक्तिवेधमध्ये ऐकत होते तुम्हाला. आयुष्याचंही गाणं किती सुरेल केलं होतं तुम्ही.
विनम्र आदरांजली.

Sunday, June 26, 2016

पाऊस, हुडहुडी, फ्रेंच फ्राइज, बोर्नव्हिटा, गुरफटलेलं पोट्टं अन् आईशी.
पोट्टं, पाई, रिचर्ड पार्कर.
आईशी, फौजीभाई, हस्की डिंपल.
ऐतवार!

Saturday, June 25, 2016

आज विविधभारतीवर अखंड मदनमोहन :-) तलत, मदनमोहन, लता, रफी, किशोर.. काही वाढदिवस रोज असले पाहिजेत!

Friday, June 24, 2016

सैराटमध्ये मंजुळेंनी जे परफेक्शन आणि जो फोकस ठेवलाय, तो फँड्रीतसुद्धा कुठेच हुकलेला नव्हता, हे आज हा स्वत:चाच लेख पुन्हा वाचताना जाणवलं.
स्वतःचा आवाका इतका नेमका माहिती असलेला हा माणूस चाट पाडतो.
सैराट अजून बघायचाय, पण जितकं ऐकतेय आणि वाचतेय, त्यावर आधारीत हे विधान आहे.
लेखाखालच्या प्रतिक्रियेतले साजि-याचे (Deepak Thakare) म्हणणे दोन वर्षांनंतर आलेल्या सैराटने खरे ठरवले आहे.

Sunday, June 12, 2016

कैफियत - मैत्रीविनंती!

काय गंमत आहे ना? फेसबुकनं माझं जग (?) इतकं विस्तारलंय की आश्चर्यच वाटतं. एवढी मित्रमंडळी? छे! विचित्र आहे हे. ह्या यादीला काहीतरी निराळा शब्द शोधला पाहिजे आता. प्रत्यक्ष आयुष्यातलं माझं जग फारच चिमुकलं आहे, त्यातही मित्रमंडळी म्हणता येईल असे आणखी कमी. ओळख असणा-या किंवा नातं असणा-या सर्वांशीच मैत्री कुठे असते? पण फेसबुकवर मात्र सगळे एकाच शीर्षकाखाली नांदतात. बाहेरच्या जगात निदान तोंडओळख तरी असते, फेसबुकवर मात्र तसं नाही.

लहानपणच्या घट्ट मैत्रिणीच्या बरोबरीने कालच ऑफिसात नव्याने आलेला सहकारीही विनाविलंब पंक्तीला बसायला येतो, तेव्हा नवल वाटतं. मग तो रात्री काय जेवला नाहीतर शहराच्या कोणत्या कोप-यात चेक इन केलं ते मला कळून घ्यावं लागतं. बसस्टॉपवर भेटलेली मुलगीसुद्धा आद्य कर्तव्य असल्यासारखी ताबडतोब मैत्रीविनंती पाठवते. मग तिच्या तपशीलांचा पूर येत रहातो. तुम्ही एका इमारतीत रहात असता, नुसतं उतरता चढता औपचारीक हसणं होतं. तुम्ही मित्र. एका ऑफिसात असून मी समोरून आल्यावर हसावं की नाही विचार करत न हसून तुम्ही पुढे जाता. पण तरी तुम्ही माझी मैत्रिण. तुमचे आणि माझे अनेक मित्रमैत्रिणी सामायिक असतात, मग फेसबुक सारखं पिडतं, तुम्ही ह्यांना ओळखत असाल. एवढ्यावर मैत्रीविनंती येते.

जे समोर दिसतात, त्यांचं एकवेळ ठीक, पण अनोळखी लोकांना तर ओळख विचारायला हवी? छे, नाव नको. पापड तडातड मोडतात लोकांचे! मी असा आहे, तशी आहे, अॅक्सेप्ट करायची असेल तर करा नाहीतर राहू देत! स्वत:ला काय समजता, फेसबुक म्हणजे आभासी जग, मूर्खांचा बाजार, इथे कुठे माणसं ओळखत बसता वगैरे वगैरे..

अरेच्चा! हसावं की रडावं? हा विनाकारण उद्धटपणा कशासाठी? तुम्ही कोण, कुठले, किती मोठे हे मला आधीच का माहिती असावं? बरं, सरळपणे सांगितलंत तर चालतं ना. वाकड्यात का शिरता? आणखी एक म्हणजे बहुतेकदा लोकांचे संकेतस्थळांवर वावरताना वेगळे आणि प्रत्यक्ष नाव वेगळे असते, मला विनंती ख-या नावानं येते. पुन्हा पंचाइत! सामायिक मित्रमैत्रिणीत अनंत नावं झळकतात. म्हणुन हो म्हणायचं? तिथलं नाव विचारायला नको? पण असं विचारलं की राग येतो लोकांना.

कुणाची तरी विनंती मी स्विकारते, तेव्हा माझ्या पोस्टस्, फोटो, माहिती सगळं त्यांना दिसू लागतं, मग मला माहिती नको का की हे कोण आहेत बघणारे? तसं ते बघायचं ठरवलं तर कुणीही बघू शकतंच, शेवटी चव्हाटाच आहे हा. आणि तंत्रही माझ्या जगाहून कित्येक दशकं पुढे गेलंय. तरीसुद्धा निदान जे माझ्या नियंत्रणातलं आहे ते करायचंच आहे मला. फेसबुकवर माज करायचा आणि त्यालाच शिव्याही घालायच्या हेही अनाकलनीय आहे. पण ते तसं असतंच. ज्या ऑफिसात काम करता, तिथल्या कारभाराचा उद्धार, ज्या शहरात रहाता, तिथला उद्धार, तेव्हा ह्यात काही नवीन नाही.

अर्थात ह्या सर्वाला सन्माननीय अपवाद असतातच. ज्यांनी खरंच काही विचार केलेला असतो. आपल्याही मनात त्यांच्याबद्दल काही आदर असतो, तेव्हा अशी विनंती आली, की आनंद होतो, ऑनर्ड वाटतं. मला आवर्जून ज्यांचं लेखन वाचावंसं वाटतं, जी व्यक्तिमत्वं आवडतात, त्यांना विनंती पाठवते. तेव्हा उलट त्यांना हे आवडेल का ही धाकधूकच असते मनात. मधे एकदा एका ज्येष्ठ आदरणीय मैत्रिणीसोबत ह्याबद्दल बोलत होते. इतक्या मोठ्या ढिगा-यातून आपल्याला ज्यांचं लेखन किंवा पोस्ट्स न चुकता वाचत रहायचं असतं, ते मागोवा घेऊन अक्षरश: उपसून काढावं लागतं. मी काही खरडते, आणि ते ज्यांनी वाचून मत द्यावं असं वाटतं, त्यांनाही त्यांच्या ढिगा-यात माझं खरडणं दर्शनी आलं पाहिजे ना? जितका मैत्रीआकडा मोठा, तितका ढिगारा मोठा. तो दिसामाजी वाढणारा आकडा अस्वस्थ करत रहातो. वास्तविक, माझे सख्खे कित्येक जीवलग या यादीत नाहीत आणि कधीच नसणारेत, तर कित्येक केवळ शोभेच्या वस्तूसारखे केवळ असायचे म्हणुन आहेत.

म्हणलं तर सोय, म्हणलं तर केवढी गैरसोय. पॅकेज आहे ते शेवटी, इलाज नाही. शाळेत हल्ली फेसबुक - शाप की वरदान हा निबंध लिहायला सांगतात का? तुमच्यापैकी कुणी लिहीला असेल तर मला वाचायचा आहे.

Saturday, June 4, 2016

गोड मुकेश. कधी मधी कानांना फार गरज असते! सुकून.
https://www.youtube.com/watch?v=yHCfmS8Z1HM