म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Wednesday, December 27, 2017

कसे कसे हासायाचे>>>> दरवेळी हे प्रश्न पडतात. ह्या कवितेला चाल लावाविशीच कशी वाटली असेल, मग सुचली कशी असेल, ती समजावली कशी असेल, रेकॉर्डिंगच्या वेळी वादकांना नेमकं काय चाललंय ते कळलं तरी असेल का.
भाऊ कशाचंही काहीही चित्र काढतो, नंतर ते कितीही वाकडंतिकडं असो, बहीण कहर मांडते.
ऐकून आरती प्रभूही हतबुद्ध झाले असतील बहुतेक.
कसे कसे ऐकायाचे असं होतं. डोकं फिरतं. वेडेपणा आहे झालं!

Sunday, December 24, 2017

घरासमोर नव्यानेच उघडलेल्या मिल्क पार्लरमधे एका कोप-यात ख्रिसमसचा छोटेखानी सुबक देखावा तयार केलाय.
संध्याकाळपासून पियानोच्या एकेक सुरेल ट्युन्स, जिंगल बेल्स आणि कॉयर असं पाठोपाठ चालू आहे.
मधे जेमतेम चाळीसेक फुटांचा पण अविश्रांत वहाणारा रस्ता आणि झाडांच्या पानं गाळू लागलेल्या फांद्या.
दाट थंडीच्या थरातून ते एकसंध प्रसन्न समूहसूर जणू घरातच वाजत असल्यासारखे स्पष्ट कानावर येत आहेत.
सणाचं छानसं सुखद वातावरण अायतंच घरात चालून आलंय.

अाठवणी अशाच नकळत गोळा होतात.
कोल्हापुरात शिवाजी रोडच्या घरात स्टेशनवरच्या इंजिनांची शिट्टी दाट हिवाळ्यातल्या सकाळी जणू मागच्याच गल्लीत प्लॅटफॉर्म असल्यासारखी खणखणीत ऐकू यायची.
अंबाबाईच्या घाटेचा घण एरवीही ऐकू येत असे, मात्र थंडीच्या दाट सायीत संध्याकाळी ते घण शेजारच्या घरी वाजल्यासारखे स्वच्छ, मजबूत ऐकू येत.
त्यावेळी जर चौथ्या मजल्यावर असलो, तर इमारतींच्या गर्दीतून नेमक्याच मोकळ्या सुटलेल्या एका चौकोनातून बरोबर अंबाबाईच्या देवळाचं शिखर आणि त्यावर लावलेला दिवा दिसे.
आत आजोबा सुरमा घातलेले डोळे मिटून गीतेचे अध्याय म्हणत, कधी माझ्याकडून तर कधी स्वत:च काश्याच्या वाटीनं पायांचे तळवे चोळत चोळत.
भित्री होते मी. मग गारठून गच्च अंधारलेल्या संध्याकाळी आजोबा, त्यांचे श्लोक, ती घाट आणि तो शिखर-दिवा मन घट्ट करायचा.
अजूनही तो आधार आठवणींच्या त्या चौकोनात शाबूत आहे. दाट थंडीत पाठीवरून हात फिरवणारा.
आयुष्य असतं आठवणीत.

Monday, December 4, 2017

शशी कपूर. अत्यंत आवडता माणूस. निरंतर आवडत राहील. त्याच्या गाण्यांपैकी फार आवडतं गाणं.

Tuesday, October 31, 2017

हे म्हणजे एखाद्याच्या थोबाडीत देण्यासारखं आहे.
- इति चि. नील कोडोलीकर.

सकाळी सातची ठळक बातमी ऐकल्यावर वेतनकपात म्हणजे काय हे आधी विचारून ते समजल्यावर आलेली उत्स्फुर्त प्रतिक्रिया.

(एसटी कामगारांची 36 दिवसांची वेतनकपात)

Sunday, October 29, 2017

लख्ख ऊन. निरोगी प्रकाश.

मनालाही उन्हं दाखवायला हवीयेत.
त्याशिवाय निर्जंतुक व्हायचं नाही बेटं.

Saturday, October 28, 2017

फास्टर फेणे :-) चोक्कस!
बघून या जावा सगळे. सकुसप जावा.

बन्या एक नंबर. अमेयचं नाव ऐकून पहिलं नाक मी मुरडलेलं, आता नाक घासून मोठं सॉरी. मेहनत घेतलीये पोरानं.
गिरीश कुलकर्णींना तोडीस तोड फाइट दिलीये त्यानं. गिरीश कुलकर्णी तर खतरनाक.
सगळंच चोख आहे, पण कॅमे-याच्या प्रेमात जास्तच.
तसा मुलांसाठी वगैरे नसला, तरी मुलंही रंगून गेली होती. सोपी मराठी, पुणं, गुणी बन्या, त्याची सायकल, त्याची फायटींग, भागवतआजोबा, भुभू आणि ट्टॉक! भरपूर खाऊ. खुश झालीत.

हीच टाइट क्वालिटी राखणं जमलं तर सिक्वल्सचा विचार करावा फाफे टीमनं. जाम मजा आणतील.

#फास्टरफेणे #फाफे #FasterFene #ट्टॉक!