म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, June 28, 2019

किरकोळ सामान आणण्यासाठी पलिकडच्या कॉलनीतल्या किराणा दुकानात जाणं होतं अधूनमधून. तिथे एक तिशीच्या आसपासची स्त्री* काम करते. तिचे डोळे खूप सुंदर आहेत. मोठे, टपोरे. गोल चेहरा, किंचित ठेंगणा गुटगुटीत बांधा. नेहमी हसरी आणि प्रसन्न असते. बरीचशी माधवी मुखर्जीसारखी. नीटनेटकी नेसलेल्या साडीचा पदर कंबरेला खोचून ग्राहकांना वस्तू विचारत, एकीकडे सामान बांधत, पैशांचे हिशोब करत ती वीजेसारखी लकलक हलत असते. मी तर जितका वेळ तिथे असते तितका वेळ तिच्याकडे बघतच राहिलेली असते.** दुकानात कायम गर्दी असते, त्यामुळे तिला डोळ्यांबद्दल सांगणंच होत नव्हतं.

आज पावसामुळे जरा गर्दी कमी आणि ती उसंतीत दिसल्यावर तिला ते सांगितलं, तर आधी काऊंटरला क्षणभर टेकून टकमक बघत राहिली आणि एकदोन सेकंदांनी एक हात पुढ्यात नाचवून लाजरं हसून म्हणाली, "हं, तुमी असं म्हनाइलाइसा खरं, लई मोटं डोळं म्हून चिडीवत्यात न्हवं!" मी म्हणाले, "चिडवणा-यांकडे लक्ष द्यायचं नाही. प्रत्येकाचे नाकडोळे चेहऱ्याच्या प्रमाणात बरोबर असतात." हे ऐकून माझ्या शेजारी उभ्या असलेल्या एका मावशींनी "व्हय व्हय" म्हणत दुजोरा दिला. मग ती 'काहीही' अशा अर्थी मान डोलावत खुलून हसत माझं सामान गोळा करायला वळली. तिला पटलं की नाही तीच जाणे, पण हसण्यावरुन आवडलं असण्याची शक्यता वाटली. खेडंवजा उपनगरातलं साधं दुकान आहे, पण मध्यमवयीन दुकानदार मालक आणि ही मदतनीस, दोघंही प्रामाणिकपणे चांगली सेवा देत असतात. तिचा हा कामसूपणा तिच्या देखणेपणात जास्त भर घालतो. काही असो, कोसळणाऱ्या पावसामुळे आणि ह्या चिमुकल्या प्रसंगामुळे मन हलकंफुलकं आणि संध्याकाळ साजरी झाली एवढं खरं.

* तिशीतली मुलगी/तरुणी म्हणायला हवं खरंतर. पण कुठल्याही गावभागात ह्या वयात त्या बाय डिफॉल्ट विवाहित असतात, त्यांना अजूनही सामाजिक संकेत म्हणून तरी मोठ्या प्रमाणावर साडीतच वावरायची अलिखित सक्ती असते, त्यांची मुलंही आता वरच्या वर्गात जात असतात. त्यामुळे मुलगी ह्या संबोधनातला अल्लड भाव तिथे उरत नसतो. आणि बाई म्हणणंही पटत नाही, त्या संबोधनातला पोक्तपणा तिशीतच का आणायचा उगीच ओढून! त्यामुळे जो गोंधळ उडतो, तो इथे स्त्री शब्द वापरून कसाबसा झेपवलाय आपला.

** मी स्त्री असल्यामुळे स्वच्छपणे तिला आणि इथेही हे सांगू शकतेय. पुरुष असते आणि तितक्याच स्वच्छपणे बघितलं असतं तरी दादही कदाचित मनातल्या मनातच द्यावी लागली असती आणि इथेही व्यक्त होता आलं असतं की नाही, कोण जाणे.