'खुपते तिथे गुप्ते'चा आनंद इंगळे-पुष्कर श्रोत्री एपिसोड पहात होते. आनंद इंगळेंनी पुलंना फोन लावला आणि हृद्य कृतज्ञता व्यक्त केली. नंतर म्हणाले, भाई गेले तेव्हा ख-या अर्थाने महानिर्वाण म्हणजे काय ते प्रत्यक्ष पाहिलं. ते ऐकताना प्रयाग हॉस्पिटलसमोर त्या दिवशीं संध्याकाळपासून उभी असलेली मीही मला दिसत होते.
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Thursday, May 21, 2020
पुलं जाण्याआधीचे चार पाच दिवस, रोज संध्याकाळी सहाला ऑफिस संपवून कुबेरा चेंबर्स इमारतीतून बाहेर पडून वाटेत बालगंधर्वमध्ये शिरून फळ्यावर लावलेले पुलंच्या तब्येतीचे अपडेटस् पहायचे आणि पुढे निघायचं, असं सुरू असताना त्यादिवशी फळ्यावर टांगलेला हार लांबून बघूनच कंबर खचलेली आजही आठवते. तब्येतीतले चढ उतार चिंताजनक होते, परिस्थिती फारशी आशादायक नव्हतीच, तरीही शेवटपर्यंत मनाची तयारी झाली नाहीच. तिथूनच एक रुपया टाकून घरी फोन केला, वाट बघू नका असं कळवलं आणि तडक तशीच बॅंक ऑफ महाराष्ट्रबाहेर जाऊन उभी राहिले होते ती रात्री उशिरापर्यंत. ज्योत्स्नाबाई, नाना पाटेकर, हर्षवर्धन पाटील, ही आणि आणखीही कुणी कुणी माणसं दिसत राहिली रात्रीपर्यंत. प्रत्येकाला जब्बार पटेल नेत आणत होते. धडाधड गाड्या येत थांबत जात होत्या, गर्दीला बाजूला करू पहाणा-या पोलिसांच्या शिट्टया वाजत होत्या, माझ्यासारखे घरी जाऊच नयेसं वाटून तिष्ठलेले अगणित लोक होते तिथे. जराही अनागोंदी नव्हती. विचित्र घुसमट होती त्या हवेत. दिवस मोठा होता तरी अंधार दाटला होता. आज आनंद इंगळेंमुळे कितव्यांदा तरी ते सगळं तिथलं वातावरण पुन्हा आठवलं.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून फक्त किरण गुरवांचा एक कथासंग्रह वगळता काहीही नवं म्हणून वाचलं नाही. घरात होती त्यातलीच पुन्हा पुन्हा वाचताना एकीकडे मुक्काम शांती निकेतन, एक शून्य मी, चार शब्द, अपुर्वाई, जावे त्यांच्या देशा हीसुद्धा अनेकाव्यांदा हातात घेतली. हसले, दाद दिली, अंतर्मुख झाले. भांडी घासताना, फोडण्या घालताना, कपड्यांच्या घड्या घालताना, समोर त्यांच्याच क्लिप्स वाजवल्या. नाही येत कंटाळा. काय असेल ते असो. बाहेरच्या गंभीर वातावरणाचा ताण घरापुरता तरी थोडा हलका झाला. दोन दिवसांमागे लेकानं भांडी घासायला सुरुवात करण्यापूर्वी हाक मारून सांगितलं, म्हैस लाव गं जरा! ऐकता ऐकता हसत हसत बराच उरका पाडला त्यानं. आढ्याचं पाणी असं थोडंसं का होईना वळचणीला चालल्याचं जाणवून हायसं वाटलं. ताण तर घडोघडी असतील आयुष्यात, चटकन हाताशी असणारे रामबाण उपाय वापरून ते हलके करता आले तर आयुष्यही नक्की थोडंसं सहज होईल.
Wednesday, May 6, 2020
ओटा नसताना किंवा असून कमी पडतो म्हणून खाली जमिनीवर ठेवलेल्या स्टोव्हवर चालणारा स्वयंपाक तासन् तास बघत बसायचे मी. आजही तशी बघत बसू शकते. पीठ मळताना, भाज्या परतताना, पोळीची वाफ काढताना ती पोळपाटावर झटकताना, तिथेच पलिकडे मोठ्या कुंड्यात किंवा तसराळ्यात हात विसळताना वगैरे होणा-या हातांच्या मोहक हालचाली किंवा पदार्थांचं बदलत जाणारं स्वरूप ह्या अजूनही तोंड उघडं टाकून तंद्री लावूनच बघायच्या गोष्टी आहेत माझ्यासाठी. सुंदर भूतकाळात बुचकळून आणल्याबद्दल धन्यवाद Jayant Vidwans
Subscribe to:
Comments (Atom)