म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Wednesday, January 24, 2024

 पाच दिवस होत आले तरी नीनाताईचं जाणं नीटसं पचवता आलेलं नाही अजून. तिनं फार जीव लावला होता मला. आणि हा 'होता' उल्लेख त्रासदायक आहे.

घरचे आम्ही सगळे रेडिओजीवी. त्यामुळे नीनाताई 'ऐकून' चांगल्या ओळखीची होतीच. पण प्रत्यक्ष ओळख Sonaliमुळं झाली. अगदी पहिल्या फोनपासून आमचं छान जुळलं. तिच्या ऋजुतेमुळंच अर्थात. नीनाताईचं हसरं, सौम्य, उबदार व्यक्तिमत्व आणि तिच्या आवाजाचा आब एकमेकांशी उत्तम मेळ खाणारे होते. मी कामाच्या शोधात असताना तिनं मला बरेच संपर्क दिले. आधी पुराच्या कहारात आणि मग कोविडच्या संकटावेळी तिनं घेतलेल्या आणि प्रसारित केलेल्या अनेक सामान्य नागरिकांच्या असंख्य शॉर्ट बाईट्स मध्ये माझाही समावेश होता. आकाशवाणीच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानंही मी दिलेल्या ऑडिओ शुभेच्छा प्रसारित झाल्या होत्या.
या दरम्यान तिचं 'कहाणी शब्दांची' धडाक्याने सुरू होतं. चपखलसं शीर्षक गीत आणि नीनाताईचं क्रिस्प वाचन हा दिनक्रमातला चुकवला न जाणारा भाग झाला. नंतर 'एका श्वासाचं अंतर'ही तिनं विषयाचं गांभीर्य जपत पोचवलं. हे चालू असताना या ना त्या निमित्तानं आमचं बोलणं, भेटी होत होत्या. मी नेमानं तिला माझे अभिप्राय पोचवत राहिले आणि मी लिहित राहिलं पाहिजे असं ती मला वारंवार सांगत राहिली.
'चौफेर'च्या २०२०च्या दिवाळी अंकासाठी अरुणदादांनी प्रतिभा ताईंची फिरोज रानडेंविषयी मुलाखत घ्यायला सांगितली. प्रतिभा रानडे हे केवढं मोठं नाव, मी थोडी साशंक झाले. पण दांदानी सर्व ती मदत केली आणि Yashodhan Joshiच्या मदतीनं मला ती यथाशक्ती पुरी करता आली. यामागे नि:संशयपणे नीनाताईचा हातभार होता. पुढच्या वर्षी ताईनं मला शनिवार रात्रीच्या विशेष रजनीगंधाच्या प्रसारणासाठी आमंत्रित केलं. श्रोत्यांना माझ्या आवडीची हिंदी गाणी एक पूर्ण तासभर माझ्याच निवेदनासह ऐकवण्याचा हा अनुभव फार आनंदाचा होता. माझं स्क्रिप्ट तिनं आधी मागवून घेतलं, ते आकाशवाणी अधिकाऱ्यांनी तपासून दिलं. लता-आशाचे मी केलेले सहज एकेरी उल्लेख आदरार्थी करायला सांगितले, ही एकमेव दुरुस्ती होती त्यात. तेव्हा मला प्रसारणाच्या नियमांबद्दल ताईकडून छान माहिती मिळाली. कोल्हापूर आकाशवाणी केंद्राच्या स्टुडिओत नीनाताईसोबत तिच्या समोर बसून रेकॉर्डिंग करणं हा तेव्हाही माझ्यासाठी अविस्मरणीय प्रसंग होता, आता तर मौल्यवान झाला आहे. तिनं मला अगदी जातीनं मार्गदर्शन केलं.
तिचं घर एक मला फार आवडलं होतं. तिनं घराच्या रचनेत काही कल्पक बदल केले आहेत. घरात पुस्तकांची रेलचेल आहे. काही अभिरुचीपूर्ण वस्तू आहेत. तिच्या घराच्या खिडक्यांतून नजरेत येणारं प्रशस्त लॅंडस्केप आणि आभाळ आम्ही हातात चहाचे कप धरून पुष्कळ वेळ बघत राहिलो होतो.
पुढे तिच्या तन्वीच्या मांजरी आणि आमची विली हा आणखी एक कॉमन विषय झाला आमच्या गप्पांचा. विलीच्या न्युटरींगच्या वेळी मला ताईनंच डॉ. माळींचा संदर्भ दिला, मला शब्दशः धीर दिला आणि विलीची सर्जरी आमच्यासाठी आणि खुद्द विलीसाठीही अक्षरश: विनासायास पार पडली. पुन्हा एकदा, ताईमुळंच घरी आणि निर्धोक सर्जरी होण्याचा एक अनोखा प्रसंग माझ्या गाठीला लागला.
मी पुण्यात आले तरी ताई आठवणीनं आपुलकीनं माझी विचारपूस करत राहिली. तिच्या ड्युटीच्या वेळा सांभाळत फोन झाले. तिनं मला पुणे आकाशवाणीत जाऊन तिथे असलेल्या तिच्या स्नेह्यांना भेटण्यासाठी सांगितलं होतं. स्वतःच्या आजारपणाबद्दल खुद्द ताईनंच सांगितलं, तेव्हा खूप बोललो. नंतर तिच्या सोयी-सवडीनं ती व्हॉईस मेसेज करून खुशाली कळवत राहिली. आता तिचा तो सुप्रसिद्ध आवाज माझ्याकडे आहे याबद्दल आनंद बाळगू की खंत, हे मात्र समजत नाही.
नको असतात या घटना घडायला. पण या म्हणण्याला काही अर्थ नसतो, हेही खरं. फक्त सुन्न होतो आपण.
अरुणदादा आणि तन्वीला हा धक्का सोसायचं बळ मिळो. आकाशवाणीच्या तमाम श्रोतृवृंदाशी सहवेदना.


Sunday, January 7, 2024

 लेखिका निर्मला देशपांडेंच्या कादंबऱ्या कुणाकडे असतील तर वाचायला हव्या आहेत.

खास करून टिकलीएवढं तळं. ते कुठं दिसत नाही. कथा एका बकुळची, त्यांचं आत्मचरित्र वगैरे दिसतंय उपलब्ध.
सलत सूर सनईचा आणि बन्सी काहेको बजाई फार आवडल्या होत्या.
भारतीताईंनी Bharati Birje Diggikar या लेखिकेची ओळख करून दिली होती. आणि त्या बाजानं मोहिनी घातली. त्यात डोकावणारा मध्य प्रदेश ओढून घेतो. भाषेचा डौल वाचत रहावा असा आहे. हे मी फार वरवरचं सांगतेय खरंतर, ते थेट वाचावंच.
अशा नावाच्या कुणी लेखिका आहेत हे माहीत व्हायचं एरवी कारण नव्हतं. त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या पुस्तकांबद्दल कुठंच काही उल्लेख, आढावे पाहण्यात आलेले नाहीत.