म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, September 5, 2011

खळेकाका

गेले दोन-तीन दिवस खळेमय गेले... एक उदासवाणेपण भरून राहिलंय मनात. घरातलं सख्खं वडिलधारं कुणीतरी गेल्यासारखं! त्यांच्या गाण्याशी निगडीत अनेक व्यक्तिगत आठवणी आहेत माझ्या. मी खुप जोडली गेले होते, आहे त्यांच्याशी. भावगीते ऐकण्याची गोडी त्यांच्या गाण्यांमुळे लागली. माझं गाण्याचं पहिलं बक्षिसही नववीत 'श्रावणात घननिळा'ने मिळवून दिलं होतं मला! परिक्षकांच्या विशेष कौतुकासह. मोरपिसावरून श्रावणातच्या समेवर येणं जमवायला मला अतोनात कष्ट घ्यावे लागलेले आजही आठवतायत. एवढं करून प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी ध्रुवपदाला ती सम पकडता आली नाहीच. पण न डगमगता पुढच्या प्रत्येक कडव्यानंतर ती गाठली… पारितोषिक मिळालं. गायले कशी होते देव जाणे पण स्पर्धेसाठी हे गाणं निवडण्यासाठीचं धाडस केल्याबद्दल आणि समेच्या करामतीने परिक्षकांची पाठीवर थाप मिळाली एवढं खरं, पण ही कमाई सगळी केवळ श्रीनिवास खळे या जादूगारामुळेच.

कॉलेजमधेही गाण्यांच्या कार्यक्रमात द्वंद्व आणि एकल मिळून सहा गाणी मी खळेकाकांचीच गात होते! 'पहिलीच भेट झाली', 'पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे', 'आनंदाचे डोही आनंद तरंग', 'हेची दान देगा देवा'... आज आठवलं तरी आश्चर्य वाटतं की झेपत तरी होतं का ते आपल्याला!! निव्वळ वय लहान आणि म्हणुन पर्यायाने समजही लहान म्हणुनच वेळ निभावली गेली असावी इतकंच. आज म्हणायला गेले तर... रामा, शिवा, गोविंदा होतंय !

महाकर्मकठिण चाली आणि त्यांचे तालही! अलौकिक बुद्धीचा गृहस्थ. त्यांच्या मते शिंपी जसा मापे घेऊन व्यक्तिगणिक वेगळे कपडे शिवतो, तोच नियम गाणं आणि गाणारा गळा यांना लागू होतो...

प्रत्येक गायकाची खासियत निराळी म्हणुन गाण्यानुसार गाणारा निराळा.. किंवा चाल आधी तयार करून मग त्यावर शब्द रचणे म्हणजे झबल आधी शिवून त्या मापाचं बाळ जन्माला घालणे असं त्यांचं म्हणणं... असं असू शकत नाही किंवा निदान मला तरी जमणार नाही अशी प्रांजळ कबुली. किती समर्पक बोलणं आहे हे! समजायला अगदी सुलभ आणि तरीही खुप मोठा अर्थ भरलेलं..

ज्ञानोबांनी लहान वयात समाधी घेतली, पण ते जर वृद्ध होईपर्यंत जगते तर खळेकाकांसारखे दिसले असते असं मला नेहमी वाटतं...शांत चित्त, मृदूभाषी, समाधानी, स्मितहास्य विलसत असलेली प्रसन्न मुद्रा! प्रत्यक्षात जसे होते तसे दिसतही... छे! खुप खुप मोठा माणूस, आनंदाचा निर्झर गमावलाय आपण...

1 comment: