म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, February 28, 2016

गोनीदा जन्मशताब्दी वर्षानिमित्त या वर्षभरात काहीतरी करू या का, असं गेल्या ८ जुलैला मी मित्रमंडळीत विचारलं होतं. त्यात मला सुचलेल्या वेगवेगळ्या कल्पना मांडल्या. काहीतरी करायची ही कल्पना सगळ्यांनीच तेव्हा मनापासून उचलून धरली. प्रत्यक्षात मात्र काही ना काही अडचणी येत राहिल्या आणि आज या दिवसापर्यंत तरी काहीच होऊ शकलं नाही. सहज विचार करत मागे मागे जाताना खुपशा अवांतर गोष्टीही आठवत राहिल्या आणि लक्षात आलं, अरेच्चा, पार्श्वभूमीला सगळीकडे गोनीदा आहेतच की. मात्र त्यातली एक गोष्ट अगदी आवर्जून उल्लेख करण्यासारखी आणि आपल्या मायबोलीकरांना तर सहर्ष सांगण्यासारखी आहे, ती म्हणजे आमचं 'वाचन वेल्हाळ'.
डिसेंबर २०१३मध्ये मी ध्रूव भट्टांचं 'अकूपार' वाचलं, ते मला खुपच आवडलं. त्याबद्दल माबोच्या पुस्तकांच्या धाग्यावर लिहिताना, ते वाचताना मला खुपदा गोनीदांचे भास झाल्याचं म्हणाले आणि त्याला शैलजा, हर्पेननी दुजोरा दिला. ओघात 'माचीवरला बुधा' आणि 'वाघरू'बद्दल थोडकं बोलणं झालं. ह्या सामायिक आवडीमुळे आपण मिळून एकत्र वाचनं करायची का असं मी त्या दोघांनाही विचारलं. दोघांनीही आनंदानं होकार दिला. बुधा किंवा वाघरूपासूनच सुरूवात करू असं ठरलं. नुकतंच त्याआधी कधीतरी शशांक पुरंदरेंशी बोलताना ते आणि शांकलीसुद्धा गोनीदाभक्त असल्याचं आणि त्यांच्या मातोश्री डोळ्यांना त्रास होत असतानाही 'स्मरणगाथे'त रमून गेल्या असल्याचं ते म्हणाले होते. मग त्यांना आणि माझ्या आणखी एका आवडत्या मैत्रिणीला, अवललाही याबद्दल विचारलं. सगळ्यांनी अनुमोदन दिलं. अशाच एकसमान आवडीमुळे विशाल कुलकर्णी सामिल झाला. पुण्याबाहेरच्या अविनाश चव्हाण, अशोक पाटील आणि कौतुक शिरोडकर या गोनीदाप्रेमी मित्रमंडळींनीही ह्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती, जे पुण्यात असताना वाचनाला उपस्थित रहाणार होते. शोभनाताईदेखिल उत्सुक होत्या, ज्या अधूनमधून हजर रहाणार होत्या. मात्र ह्या उपक्रमात जिचा आवर्जून सहभाग असावा अशी माझी प्रबळ इच्छा होती, त्या दक्षिणानं हो म्हणल्यावर मात्र मला एकदम बाजी मारल्यासारखं वाटलं. यथावकाश ह्या दिंडीत अमेय पंडित, इन्ना आणि साजिराही आले. वाचन वेल्हाळमधे आजघडीला इतकेच मोजके सदस्य आहेत.
जानेवारी १४ च्या पहिल्या आठवड्यात पहिली बैठक हर्पेनकडे ठरली, तेव्हा हातात होतं 'माचीवरला बुधा'.
MBD 1.jpg
दक्षिणा सोडून आम्ही प्रत्येकाने बुधा अनेकदा वाचलं होतं, पण आमची सगळ्यांचीच ते पुन्हा वाचण्याची आनंदाने तयारी होती. हे अभिवाचन असणार होतं आणि तिनं पुस्तक वाचलेलं नसल्यानं तिनंच ते वाचायला सुरूवात करावी असं सगळ्यांनी सुचवलं. त्या दिवशी आम्ही फक्त दोन पानं वाचली. दक्षिणानं छान वाचन केलं. ह्या पहिल्या बैठकीला हर्पेनकडे शांकली आणि शशांक पुरंदरे, अवल, दक्षिणा, मी आणि माझा लेक, आणि अर्थातच हर्पेन सहकुटुंब होते. शैलजाच्या अनियमित सुट्ट्यांमुळे तिनं सुरुवातीपासूनच व्हर्च्युअल सहभाग नोंदवून ठेवला होता तर विशालला ऐनवेळी काही कामामुळे येता आलं नाही. वाचन जरी निमित्तापुरतं झालं तरी ह्या बैठकीत एकंदर चर्चा वाचनाशी संबंधितच झाली. भेटण्या-वाचण्याबद्दल साधारण नियमावली बनवली गेली. प्रत्येकाकडून खुप चांगले मुद्दे आले. दर पंधरा दिवसांनी भेटणे, शक्यतो रविवारी आणि संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत, जेणे करून दोन ते अडीच तास वाचन करून उरलेली संध्याकाळ घरच्यांबरोबर घालवता येईल, शक्यतो सदस्य दहा ते बारापेक्षा जास्त वाढवायला नकोत, बैठक फिरती ठेवावी म्हणजे प्रत्येक सदस्याच्या घरी वाचन होईल, खानपान हे चहा किंवा कॉफी आणि फारतर कोरडा खाऊ इतपतच मर्यादित असावं, वाचन चालू असताना कुणालाही काहीही अडलं, शंका विचाराविशी वाटली किंवा त्या अनुषंगाने काही आठवलं आणि बोलावं सांगावंसं वाटलं तर जरूर बोलावं, थांबून तो मुद्दा संपवून मग पुढे जावं, नुसतंच वाचत सुटू नये, किमान ४ लोकं तरी वाचनाला असावीत अन्यथा पुढचा दिवस ठरवावा, आजची बैठक संपवताना पुढची तारीख ठरवूनच उठायचं, वगैरे. प्रत्येकानं येताना आपापली काही आवडती पुस्तकं आणली होती, ती देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एकमेकांशी ओळखी झाल्या. काहीजण काही जणांना छान ओळखत होते, पण सगळेजण सगळ्यांना ओळखत नव्हते. खानपानाचा नियम त्याच दिवशी ठरल्यामुळे त्यादिवशी आमची चंगळ झाली. हर्पेन आणि तेजश्रीने ओली भेळ आणि गाजराच्या हलव्याचा बेत केला होता. त्यामुळे वाचनाचा आनंद वाढला. पुढचं वाचन माझ्याकडे ठरवून आम्ही उठलो.
आनंदाची बाब म्हणजे ही वाचनं पुढे अगदी नियमित होत गेली. अगदी न चुकता ही पाक्षिक भेट होत राहिली. ह्या आमच्या गटाचं नाव सर्वानुमते 'वाचन वेल्हाळ' ठेवलं. कधी माझ्याकडे, कधी पुरंद-यांकडे, अवलकडे, दक्षिणाकडे, विशालकडे, इन्नाकडे, शोभनाताईंकडे आम्ही भेटत-वाचत राहिलो, तर कोल्हापूरकरांच्या आमंत्रणाला मान देऊन एकदा अविनाशकडे निवासी कट्टाही केला. बुधाच्या बहुतेक वाचनांच्यावेळी माझा लेकसुद्धा सोबत होता. आमच्याभोवती इकडेतिकडे करत, खेळत, चित्रं काढत, तोही बुधा आजोबाची गोष्ट ऐकत होता. शशांक आणि अवल अधेमधे त्याला ओरिगामीच्या नव्या कलाकृती किंवा चित्रकलेतल्या करामती शिकवायचे.
MBD 2.jpg
बुधासाठी आम्ही साधारण पाच ते सहा बैठका भेटत राहिलो. पूर्ण वाचन दक्षिणानं केलं आणि अतिशय उत्तम वाचलं. ते तसं खुपच चिमुकलं आहे, त्यामुळे त्या आधीही संपलं असतं, पण आम्ही खुप चवीचवीनं वाचत गेलो. त्यातल्या अनवट शब्दांवर, परिसराच्या वर्णनांवर चर्चा होत असे, त्यात येणा-या वनस्पतींबद्दल शांकली तपशीलवार माहिती देई. कधी सर्वांना एकत्रितच भावलेल्या एखाद्या प्रसंगावर थांबून काही बोलणं होई. पूर्वी आपापलं एकेकटं वाचताना लागत गेलेले - न लागलेले संदर्भ, समजलेले - न समजलेले प्रसंग, एकाच वर्णनाचे प्रत्येकाचे आपापले स्वतंत्र अन्वयार्थ, असं विविध प्रकारे बोललं गेल्यामुळे, ह्या एकत्रित वाचनाने व्यक्तिशः मला तरी, पूर्वी अनेकदा वाचलेला असूनही आत्ता कुठे ख-या अर्थाने बुधा थोडाफार समजत, पोचत असल्यासारखं वाटलं. ऐकताना अधेमधे कुणा कुणाच्या तोंडून भारावलेले, विस्मयकारक उद्गार निघत. कुणाला एखाद्या शब्दा-वर्णनावरून काही त्यासंदर्भातलं अवांतर आठवे. असा आनंद घेत घेत आम्ही बुधाच्या माचीवर चढत गेलो. सर्वांना त्याची इतकी आवड लागली की तितकंच अपरिहार्य काही असल्याशिवाय कुणीही वाचनाला दांडी मारली नाही. पुण्याबाहेरचे सदस्यही ब-यापैकी येत राहिले. वाचन सुरू असताना कुणीही फोनवर बोलतोय, व्हॉट्स् अप चाळतोय किंवा फेसबुक बघतोय असं झालेलं नाही. गंमत म्हणजे नाटक किंवा कार्यक्रम सुरू होताना जशी सूचना द्यावी लागते, तसं काही इथे कुणी मुळीच केलं नव्हतं, तरीही प्रत्येकजण स्वहून हा अलिखित नियम आजतागायत पाळत आलेला आहे. बुधा संपणार होतं त्यादिवशी अशोकमामा मुद्दाम पुण्याला आले. त्यादिवशी आम्ही एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. प्रत्येकाने एकेक पदार्थ करून आणला होता.
MBD 3.jpgMBD 4.jpg
तेव्हा पुढच्या वाचनाबद्दल ठरवताना आता एकच पुस्तक घेण्यापेक्षा वेगवेगळ्या पुस्तकांतले लेख, उतारे आणि कविता वाचण्याचं ठरलं. त्यानुसार पुढच्या कट्ट्याला आम्ही दुर्गाबाईंच्या 'पैस'पासून सुरूवात केली. ते अतिशय दुर्बोध शब्दांनी भरलेलं असूनही एकत्र चर्चांमुळे आणि गटातल्या सिनियर वाचकांमुळे समजायला खुप सोपं गेलं आणि बुधाच्या पुढच्या टप्प्यावर चढून गेल्यासारखं वाटलं. गोनिदा आणि दुर्गाबाईंची जातकुळी पूर्णच वेगळी. आम्ही वाचनाची निराळी दिशा पकडली होती एकदम, पण काहीही ठरावीक साचा न ठरवल्यामुळेच आम्ही वाचनाची जास्त मजा घेऊ शकलो. पैसमधले 'पैस' आणि 'द्वारकेचा राणा' वाचले. दिलिप चित्रेंच्या 'तिरकस चौकस' मधला 'हंगेरियन रंगारी' वाचला. व्यंकटेश माडगुळकरांच्या 'गोष्टी घराकडील' वाचल्या. त्यादिवशी वाचन शांकलीने केलं. शोभनाताईंकडे मामांनी 'तुती'चं वाचन केलं. तेव्हा साहजिकच जी.ए. चर्चेचा केंद्रबिंदू होते. तेव्हा शोभनाताईंनी श्रेष्ठ कवी सुधीर मोघेंबद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या गीताबद्दल सुरेख आठवणी सांगितल्या. शोभनाताई, दक्षिणा, मी हे हौशी गाणारे सदस्य. त्यामुळे कधीमधी गाणीही होतात. पुरंदरेंकडच्या वाचनादरम्यान शशांकची मंजुळ सुरेल बासरी आणि संवादिका घुमते. विशालनं पुरंदरेंकडेच एकदा भा. रां. च्या 'घन तमी'वर लिहिलेला अप्रतिम लेख वाचून झाल्यावर ओघानं ते गायलंही गेलं होतं.
MBD 5.jpg
अविनाशच्या घरी झालेल्या कट्ट्याला बाकिबाबांच्या कवितांचं अमेयनं आणि विशालनं रात्री केलेलं वाचन आणि त्यामुळे तयार झालेलं वातावरण अविस्मरणीय. तिकडून परतताना प्रवासातही आम्ही ग्रेसांवरचा एक लेख वाचला. त्यादिवशी गाडीत इन्ना, अविनाश आणि विशालचे ग्रेस आणि त्यांच्या कविता हेच मुख्य विषय होते. फक्त मराठीच साहित्य वाचतो असं नाही. इन्नाकडे विशालनं डॉ. बच्चनांची 'मधुशाला' सुरेखच वाचली आणि समजावली होती.
आम्ही आजवर जितक्या वेळा भेटलोय, तेव्हा प्रत्येकच वेळेस वाचनाव्यतिरिक्त फक्त वाचनाशी किंवा इतर सुसंगत विषयांवरच आमच्या गप्पा झाल्या आहेत. राजकारण, घरच्या गप्पा, उखाळ्यापाखाळ्या, स्वतःचीच मतं पुढे, असं कधी झालं नाही. प्रत्येक बोलणा-याला नीट पूर्ण बोलू दिलं जातं आणि प्रत्येकजण उत्तम ऐकतो असा आजवरचा अनुभव आहे. विनाकारण खोटंच हो ला होदेखिल केलं जात नाही. जे लेख किंवा कविता वाचू, त्या आणि समकालिन लेखक / कवींविषयी, त्या शैलीबद्दल वगैरेही बोललं जातं. हंगेरियन रंगारी वाचला तेव्हा भारतीताईंच्या दिलीप चित्रेंवरच्या लेखाचाही उहापोह झाला, सामाजिक स्तर आणि शैक्षणिक स्तर, त्यासंदर्भातलं आपल्या देशातलं आणि बाहेरच्या देशातलं वातावरण, श्रमप्रतिष्ठा, चित्रेंची इतर पुस्तकं ह्याविषयी फार मौलिक चर्चा झाली होती आणि बोलत बोलत हा विषय इन्नाच्या हातच्या मस्त कडक कॉफीबरोबर घमासान आस्तिक-नास्तिक चर्चेवर येऊन स्थिरावला, जो खाली उतरल्यावरही सुरूच होता. एकदा माझ्या घरी हर्पेन करीअर आणि संधी ह्यावर फार सुरेख आणि दीर्घ बोलले होते. खरंतर असं खुप काही सांगता येईल, विस्तारभयास्तव आवरावं लागतंय.
MBD 6.jpg
विशालमुखी 'जपानी रमलाची रात्र'
गेली दोन वर्षे आम्ही सगळे भेटतोय, वाचतोय, बोलतोय. आमची प्रत्येक भेट झाल्यानंतर मला, आपण अजून सुरूवातही केली नाहिये आणि केवढा पल्ला गाठायचाय असं वाटत रहातं. संकेतस्थळांवर होणा-या पुस्तकांवरच्या किंवा एकंदरीतच लेखनावरच्या प्रदीर्घ चर्चा नुसतं वाचणं निराळं आणि अशी प्रत्यक्ष चर्चा सुरू असताना तिथे स्वतः उपस्थित असणं अन् त्यावर मनात येणारे कोणतेही प्रश्न, शंका, नि:संकोचपणे विचारता येणं, हे सर्वस्वी निराळं. हा माझ्यासाठी मोठा ठेवा आहे. क्षितीज दरवेळी आणखी विस्तारलं जातं, आवाका आणखी वाढवण्याची जाणीव होते. पण त्याचं दडपण किंवा ताण येत नाही, उलट त्यातून आम्हा सगळ्यांनाच रोजच्या धबडग्यासाठी एक खुप चांगली उर्जा मिळतेय. पुढच्या कट्ट्याची आम्ही सगळेच आतूरतेनं वाट बघतो. दक्षिणाही हे वाचन खुप एंजॉय करत असल्यामुळे माझा आनंद शतगुणित झाला.
MBD 7.jpg
हे सगळं आज लिहायची बरीच निमित्तं आहेत. ज्यांच्या पुस्तकांनी आम्हाला एकत्र यायचं निमित्त दिलं ते गोनीदा आहेत, आम्ही सगळे मायबोलीकर असल्यामुळे आपली प्रिय मायबोली आहे आणि साहित्यकृतींचं वाचन हाच पाया असलेल्या आमच्या वाचन वेल्हाळची सर्वांना ओळख करून देण्यासाठी 'मराठी भाषा दिवसा'इतका उचित मुहूर्त दुसरा कोणता असू शकतो? आम्हां सर्वांच्या मनातली मायबोलीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी, असा विचार मनात आला, तो ह्या लेखाद्वारे अंमलात आणला. हल्ली आम्ही अगदी प्रत्येक पंधरा दिवसांनी भेटत नसलो तरी सगळ्यांच्या सोयीने अजूनही नियमीत भेटतो आहे, वाचतो आहे, खुप आनंद घेतो आहे. वाचन वेल्हाळ ग्रुपवर नव्या पुस्तक खरेद्या सांगितल्या जातात, त्यावर आपापले अभिप्राय येतात, त्या अनुषंगाने सर्वांचंच त्याविषयी आणखी बोलणं होतं. आम्हा सर्वांचा एकमेकांशी फार छान मर्मबंध तयार झाला आहे आता.
असे आणखी असंख्य वाचनगट तयार व्हावेत आणि जितक्या सदस्यांना शक्य होईल तितक्यांनी एकत्र वाचन करावं ही ह्यानिमित्ताने आम्हा सर्व वाचन वेल्हाळकरांतर्फे मनापासून सदिच्छा.
आम्हा सर्वांतर्फे सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा Happy

Sunday, February 7, 2016

गानसरस्वती आणि दिव्यत्व

परवा कुलदिप आणि मी, आपण शब्द किती उथळपणे वापरतो ह्यावर बोलत होतो. केवळ आपल्याला माहिती असतात, संग्रहात असतात, त्यांचे पुस्तकी अर्थ माहिती असतात म्हणून उच्चारले जातात, त्यात नुसताच जीभ, टाळूचा वापर असतो. त्या शब्दांची खोली, वजन, रुंदी मात्र आपल्याला प्रसंगानुरूपच जाणवते. तेव्हा शब्द म्हणजे काय हे ख-या अर्थाने उमगतं.

गानसरस्वतीला ऐकताना मला दिव्यत्व ह्या शब्दाची छटा दिसते, समजते. छ्टा ह्यासाठी कारण त्या देतात तो अनुभव आणि दिव्यत्व हा शब्द, दोन्हीचा पूर्ण अर्थ लागण्याची माझी कुवत नाही. मी जेव्हा जेव्हा त्यांना समोर बसून ऐकते तेव्हा डोळ्यांनी दिसत नसलेल्या, पण अस्तित्वात असलेल्या एका निराळ्या विश्वात त्या मला नेतात. त्यांचं गाणं तांत्रिक दृष्ट्या कसं झालं, रसिक तृप्त झाले की नाही, ह्यात मला स्वारस्य नसतं. मला तंत्रातलं काही कळत नाही, ताईंचंच काय, कुणाचंही मोजमाप करायचा माझा आवाका नाही. पण कानावर पडणा-या स्वरांत माधूर्य असतं, जिव्हाळा असतो, आदर असतो, प्रसन्नता असते, समाधान असतं, शांतता असते, माझं मन तिथे एकाग्र होतं आणि ह्यातल्या कशातूनही आनंद आणि सौंदर्य वेचून वेगळं काढता येत नाही, ते तिथे अंगभूत असतं. प्रत्येक कलाकार त्याच्या आणि आपल्यामधे पूल बांधत असतो, आपल्या अंतरंगाशी आपले सूर जुळवून पहात असतो, प्रत्येकाशी ते जुळतातच असं नाही. ताई मला त्या पूलावरून कित्येक योजने पुढे नेत वरती लिहिलेल्या सर्व पाय-यांवरून, त्या मला दिसत नसलेल्या पण जाणवत असलेल्या विश्वात नेत असतात. माझ्यासाठी ते फक्त स्वरोद्यानं फुलवणं, स्वरांचे निरनिराळे सुबक आकृतीबंध रचणं इतकं ते मर्यादित उरत नाही. मला त्यापलिकडे कुठेतरी पोचवलं जातं, ते काय असतं मला सांगता येणार नाही. समोर गात असलेल्या स्त्रीला राग-लोभ, स्वभाव, बरे-वाईट प्रसंग, आघात, आनंद सर्व काही माझ्याप्रमाणेच आहे. पण त्या कशाचंही प्रतिबिंब स्वरावर उमटू दिलं जात नाहिये. ही दोन स्वतंत्र जगणी आहेत. स्वर साधनेबरोबरच ह्यासाठीही केलेली तपश्चर्या आहे ही. मी गाणं ऐकून निर्ममपणे उठून चालू लागू शकत नाही. वरती चढलेल्या पाय-यांचे पडसाद पुढे माझ्या आयुष्यात पडत रहातात. मला लक्षात येतं की निव्वळ अन्न, वस्त्र, निवारा इतक्याच बाबींवर माझं भागू शकत नाही, या वरच्या सर्व गोष्टीही माझ्या गरजा आहेत, मी त्यांशिवाय जगू शकणार नाही. त्या अर्थानं माझ्या गरजा मोठ्या आहेत. ह्या समोर बसलेल्या स्त्रीसोबतचं हे माझं व्यक्तिगत अद्वैत आहे. ते प्रत्येक कलाकाराशी निर्माण होत नाही. कुमारांना आणि पंडितजींना मी प्रत्यक्ष ऐकलं नाही. तिथे ही अनुभूती मला आली असती असं खात्रीनं वाटतं. ही ८५च्या उंबरठ्यावर उभी असलेली स्त्री सलग काही तास नेटानं बसून गातेय, एकाच तडफेनं तीनही सप्तकांत लिलया विहार करतेय, ताना आलापीची आजही दिसणारी देखणी फिरत, वयपरत्वे आलेल्या शारिरीक मर्यादांचा स्वरांत मागमूस नाही की दर्जात तडजोड नाही, हे सगळं मी याची देही याची डोळा पहातेय. माझ्यासमोर मूर्तीमंत स्वर आहे, तो मी ऐकतेय, दिव्यत्वाची प्रचिती घेतेय. मी अंतर्मुख होतेय, नतमस्तक होतेय. दिव्यत्वाबरोबरच मेहनत, साधना, सामर्थ्य ह्याही शब्दांचा अर्थ उलगडतो आहे मला. ह्या सर्व अनुभूतींसाठी माझे कर आपोआप जुळतात.

ताईंना पुण्याची थंडी मानवली नसावी. त्या अधेमधे खोकल्याने त्रस्त होत होत्या. सुरुवात करताना स्वरात कंप होता. गळा सहकार्य करत नव्हता. गारठ्याने कुडकुडलेल्या मुलांना आपण सकाळी हळूहळू पांघरूणाचा एकेक पदर दूर करत, त्यांचे हात चोळत, उचलून जवळ घेऊन जागं करतो, तसं ताईंनी स्वरांना हळूहळू उब देत, मायेनं राजी करत पांघरूणातून बाहेर काढलं. आणि मग त्या आम्हाला स्वरपर्यटनाला घेऊन गेल्या. ताईंचा कधीही स्वरांवर आरुढ होण्याचा आवेश नसतो, त्या कधीही त्यावर स्वार होत नाहीत. त्या आजही स्वरांची आर्जवं करतात, मनधरणी करतात, ती अर्चना असते, श्रद्धा असते, निष्ठा असते. मला हे इतरत्र कुठे पहायला मिळत नाही, हे माझ्या ओळखीचं नसतं, मला हे विलक्षण वाटतं. माझे डोळे घळघळतात. डोळे वहाणं ही मातब्बरी नव्हे, पण आतल्या ओलाव्याचा ओहोळ कुठल्या अद्भूत स्पर्शाने खळखळायला लागतो, तो स्पर्श फरक पाडतो. त्या दृष्टीनं मी भाग्यवान आहे. मी अनेक गोष्टींनी भाग्यवान आहे तशी. मी तुम्हाला प्रत्यक्ष ऐकू शकतेय, त्याचं महत्त्व समजण्याइतकी समज सुदैवाने मला आहे, मी पुण्यात आहे, तुम्ही माझ्या घराजवळ गायला आलायत, आधल्या संध्याकाळपर्यंत काहीही ठरलं नसतानाही ऐनवेळी माझ्यासाठी तिकिटाची केली गेलेली सोय, अशा कितीतरी गोष्टी. तुम्हाला ऐकावं असं वाटणारे हजारो असतील ताई. गाण्यात गती असलेला पण मोलमजुरी करणारा एखादा कामगार असेल, मला कार्यक्रमाला जायचंय असं म्हणायला धजू न शकलेली एखादी स्त्री असेल, परावलंबी जीवन असणारा एखादा रुग्ण असेल, काना-कोप-यातल्या एखाद्या खेड्यात रहाणारी एखादी तरुणी असेल, भारताबाहेरचे येऊ न शकणारे, भारतात कुठे कुठे लांब असणारे, किंवा अगदी पुण्यातच असणारे, यायची अनिवार इच्छा असूनही कित्येक कारणांनी येणं जमवू न शकलेले माझे अनेक मित्र-मैत्रिणी असतील...

ताई, माझा मित्र अविनाश म्हणत असे की आपलं आयुष्य ही एक रांगोळी असते. कोणते ठिपके कुठे, कधी, कसे जुळणार, कोण कोणते रंग भरणार याबद्दल आपण अगदी अनभिज्ञ असतो. आयुष्याच्या अंतापर्यंत हे बिंदू जुळत रहाणं अखंड सुरू रहातं. एका बिंदूपासून दुस-या बिंदूपर्यंतच्या प्रवासात आयुष्यातले खाच-खळगे, सुख-दु:खं येतात. नंतर मागे वळून पहाताना मात्र त्या रेषेचं सुरेखन होऊन गेलेलं दिसतं. हा मला आजवर सर्वात आवडलेला आणि पटलेला सिद्धांत. वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला भेटलेल्या सुहृदांबद्दल विचार करताना तो सिद्ध होत रहातो, आपली रांगोळी मनोहर होताना दिसत रहाते. तुम्हीही माझ्या आयुष्याच्या रांगोळीतला एक बिंदू आहात, तुम्ही फार विलोभनीय रंग भरत आलाय माझ्या रांगोळीत. तुमच्या पायावर डोकं टेकवण्याची मनस्वी इच्छा झाली. ते शक्य नव्हतं. अशी इच्छा असणारे त्या क्षणी तिथे शेकडो असतील.

शतायुषी व्हा ताई, अशाच गात रहा. हा स्वार्थ आहे, तरीही प्रार्थना आहे, आम्हाला समृद्ध करत रहा. देव असेल तर तो तुमचं बरं करो.