म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, September 30, 2016

दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सहामाही परिक्षा लिहीण्यासाठी दि. ४ ऑक्टोबरपासून पुढे साधारण महिनाभर शंभरेक लेखनिकांची तातडीने आवश्यकता आहे. विद्यापिठीय परिक्षांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीनही माध्यमांतून आणि शालेय पातळीवर सर्व विषयांसाठी. वयोगट कोणताही चालेल.

कृपया शक्य असलेल्यांनी लगेच संपर्क साधावा. ज्यांना शक्य नाही त्यांनी लेखनिक मिळवून देण्यास मदत केल्यास बरे होईल.

Wednesday, September 28, 2016

आयुष्याच्या मुळ्या निसर्गनियमानं मातीचा ठाव घेत खोल शिरतायत, अनेक झाडं मात्रं वेलीच्या आधारानं उभी आहेत.

तुझं खळखळणारं हसू आणि निरामय स्वास्थ्य निरंतर राहो :-)

तू आणि माऊली हे माझं सर्वात आवडतं काँबिनेशन आहे :-)

ओम नमोजी आद्या.. https://www.youtube.com/watch?v=KNDt3sYt0Os

Sunday, September 25, 2016

घरादारात, शहरात, राज्यात, देशात, सगळ्या वातावरणात तणाव आहे.
मात्र आता आठवडाभर हवेत 'लता'ही असेल, त्यामुळे जरा सुसह्य होईल सगळं.

Tuesday, September 20, 2016

आलिया भोगासी, असावे स'आ'दर...

कणिक मळता येत नाही, की थालिपीठ थापता येत नाही
भाज्या चिरता येत नाहीत, की डबे उघडता येत नाहीत
खिट्टी काढता येत नाही, की लिफ्टचं दार ओढता येत नाही
पेन धरता येत नाही, की रजिस्टर उचलता येत नाही
हँडल धरून इग्निशन की फिरवता येत नाही, की ब्रेक दाबून पाय टेकवता येत नाही
चढता येत नाही, की उतरता येत नाही
झोपलं की कूस बदलता येत नाही, बसून उठलं की पाऊल टाकता येत नाही

ही आहे गोष्ट सध्या हवेत पसरलेल्या व्हायरल इन्फेक्शनची. शरीरामध्ये जितके सांधे जोडण्या असतात, ते सर्व एकजात एकावेळी असहकार चळवळीच्या मूकमोर्चात वेदनेच्या अस्त्रासह सामील झालेत. कोणीतरी बेदम चोप दिल्यासारखी अवस्था आहे. तापाच्या धगीनं त्वचा करपतेय. औषधांचा कितीही भडीमार केला तरी शब्दश: हत्तीच्या पावलांनी दाणदाण चालून येऊन मुंगीच्या पावलांनी उगीच दाण्यादाण्यानं सरकत बरं होणारं हे आजारपण. त्यात दुष्काळात तेराव्या महिन्यासारखं गच्च मळभ आणि धुंधूर पाऊस. परिस्थिती आणखी बिकट.

सकाळी उठल्यावर पहिला तासभर तर नुसती संवेदनाच जागी होते, सांधे तसेच झोपलेले, आखडलेले. मग त्यांना चुचकारून जागं करावं लागतं. कसेतरी कुरकुरत जागं झाल्यावर मग पुढे दिवसभर मेंदूचा आदेश दहादा सांगितल्यावरच ऐकायचा हा ठाम पवित्रा. गुडघे, मनगटं, घोटे, पिंढ-या हे तालेवार शिलेदार तर दम काढतातच, पण हातापायाच्या बोटांची पेरं, महिने मोजायची हाडं, पावलांचे सांधे हे मावळेसुद्धा बरोबरीनं, त्याच त्वेषानं लढतात आणि रडकुंडीला आणतात.

फणफणून आडवं व्हायला जेमतेम एक तास पुरला, बरं व्हायला मात्र महिने लागतील. तोवर आहेच आता.. लडखडत चालणं, लंगडत उतरणं, कैलास जीवनच्या जाहिरातीतल्या आजोबांसारखे वेडेवाकडे चेहरे करत वस्तू उचलणं, पहिल्यांदाच स्वैपाक करत असल्यासारख्या ओबडधोबड चिरलेल्या भाज्या न् नकाशांचे आकार, वन डीश मिल्सचा सुकाळ, सुप अन् सँडवीचच्या सोयीचा साक्षात्कार वगैरे वगैरे..

घराघरात, बघेल तिकडे समदु:खी दिसतायत, कंपनी मिळतेय, लागू पडलेल्या औषधोपचारांची देवाणघेवाण होतेय, चहू दिशांनी काळजी घ्या काळजी घ्याचे पडघम वाजतायत, आता वर्तमानपत्रंही वेदनांना वाचा फोडतायत.

तर, अशी सगळी मजा मजा सुरू आहे.
आलिया भोगासी, असावे सादर _/\_

Thursday, September 15, 2016

सकाळी नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला पोचले, तर शुकशुकाट! आज ऑफिसला सुट्टी होती आणि मला तंद्रीत ते माहितीच नव्हतं! क्षणभर काय करावं प्रश्न पडला. दोन मिनिटं तिथेच थांबून लगेच पडलेल्या प्रश्नावर विचार केला आणि युक्ती सुचली.
उत्सवी गंधाच्या दरवळाची सुंदर हवा होती, भुरुभुरू पाऊस होता, ओलसर झालेला कर्वे रस्ता बराचसा रिकामा होता आणि अनपेक्षितपणे अशी अचानक मिळालेली सुट्टी :-) मिरवणुकीचे गणपती रांगेला लागायला बराच वेळ होता अजून. मात्र तरी वर्दळ अगदीच तुरळक होती.
गाडी वळवून कर्वे रस्त्यावर छानपैकी भटकले. डेक्कन कॉर्नर ते पौड फाटा. रमत गमत, उगीचच रेंगाळत, निवांतपणे चार घिरट्या घातल्या. इतकं प्रसन्न वाटत होतं की बस्स! :-) अशी पर्वणी क्वचित मिळत असेल. ठरवलं तरी हे साधता यायचं नाही.
अशावेळी हातातल्या दुचाकीचा आनंदही द्विगुणित होतो.
त्या क्षणी हातात सायकल असती तर आणखी आनंद मिळाला असता, पण हरकत नाही! फिर कभी!!
अनंत चतुर्दशी, अशीही :-)
गणपतीबाप्पालाही माझा हेवा वाटला असेल नक्कीच :-)

Tuesday, September 6, 2016

अवि, तुझे कुमार.. निरंतर ऐकलेस आणि ऐकवलेसही.

https://www.youtube.com/watch?v=l1SpZ7tf4DY