म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Wednesday, October 26, 2016

आदरणीय प्रिय पंडितजी,

ऋणी असावं, कायम रहावं, अशा अनंत गोष्टी आहेत आयुष्यात. त्यात तुम्ही दोघं भावंडं फार वर, तिथे कुठेतरी आहात. दीदी, पु ल, कुमार, किशोरीताई, खळेकाका, तुम्ही, ही पीठं आहात, फक्त व्यक्ती नाही. तुम्हा कुणाहीबद्दल काही बोलावं इतकी योग्यता नाही. तुमच्या जीवनकालात जन्माला आलो, श्रवणासाठी धडधाकट कान मिळाले आणि कानावर काय पडतंय त्याची जाण मिळाली हे अहोभाग्य आहे.

अभ्यास किती आणि कसा असावा, सर्वोत्तमाचा ध्यास, तो निर्मितीमध्ये कसा रेखावा हे वस्तूपाठ. स्वतःला पटेल तेच करावं आणि तरीसुद्धा प्रवाहात उठून दिसावं म्हणजे कमाल आहे. स्वत्व जपणारी आणि ठसा उमटवणारी एकेक रचना, त्यामागचा विचार, त्यासाठी समजून सवरून निवडलेले राग, स्वरावली, वाद्यं, आवाज आणि ह्या सर्वाचं एकजिनसी, प्रभावी स्वरूप. प्रत्येक निर्मिती ही जणू मैलाचा दगड. हे सर्व ऐकताना आणि गुरूमुखातून समजून घेताना अचंबा होतो, ब्रह्मानंदी लागते. इतकं करून बरचसं डोक्यावरून जातं, स्वतःच्या अपु-या वकुबाची जाणीव होते. नीट आकलन व्हायला आणखी बरीच वर्षं जावी लागतील. फक्त इतकं मात्र नक्की जाणवतं, की तुमच्या आणि दीदींनी गायलेल्या एकेक रचना ऐकताना मनातला आणि बाहेरचाही कोलाहल दूर दूर होत जातो आणि मातीच्या कुशीत ओलावा झिरपत जावा तशी मनात शांतता, स्निग्धता पसरत जाते. त्या अनुभूतीसाठी मग पुन्हा पुन्हा तुमची गाणी ऐकली जातात. जितकं समजतं, झिरपतं, ते खेचून, ओढून कवेत घेतं, अनेकवेळा हातचं व्यवधान बाजूला सरकवून, स्वस्थ होऊन तुमच्याकडे लक्ष द्यावं लागतं, इतकी ताकद. साक्षात दीदींनी तुम्हाला गुरू मानावं, तिथे आमची काय कथा!

एक गंमत आहे. पूर्वी अनेकदा अनेकांशी भक्त होऊन आपापल्या देवाची बाजू घेऊन इरेसरीनं वाद घातले, आता तसं होत नाही. अवयव गळून पडावा तशी ती सुरसुरीही वाटेतच कुठेतरी गळून पडली. अलौकिक गाणं ऐकताना किंवा अस्तित्व विसरायला लावणारं पुस्तक वाचताना त्याबद्दल कुणाला पटवून सांगावं ही गरजच नाहीशी झाली. हे काय, कधी आणि कसं झालं ते तुम्हीच सगळे जाणे. हेसुद्धा सृजनाचंच एखादं रूप असावं.

परवा तुम्ही पाया पडू नका म्हणालात सगळ्यांना. पण आपण ज्यांना मनोभावे मानतो, जी आपली श्रद्धास्थानं आहेत, अशी माणसं मुळात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. त्यातही त्यांच्या पायावर डोकं टेकवता येण्याचा योग तर आणखी दुर्मिळ. म्हणून तुम्हाला सांगून तुमचं न ऐकण्याचं औधत्य केलं. एरवी तुमचं सगळंच तर ऐकत असतो!

वाढदिवस आणि दिवाळीनिमित्त अभिष्टचिंतन आणि तुम्हाला उदंड निरामय आयुष्य लाभो ही मनःपुर्वक शुभेच्छा.

आपली नम्र,
सई.

Monday, October 17, 2016

आज बहुतेकांच्या भिंतीवर ताईत दिसतो आहे :-)
# स्मितापाटील

Feeling connected.

https://www.youtube.com/watch?v=bDpS1NqUapg

Sunday, October 16, 2016

लेकाच्या वयोगटातली कुटुंबातली किंवा मित्रमंडळींमधली मोठी भावंडं आठवताना आज एक चांगला एक्सरसाईज झाला. क्वचित अपवाद वगळता सगळ्याच घरी एकेकटी मुलं आहेत. ज्येष्ठ अपत्य म्हणजे काय आणि कोण हे शोधताना आई-बाबांची किंवा आजी-आजोबांचीच भावंडं आठवणं जास्त सोपं गेलं. आपोआप काका-आत्या-मामा-मावशांमधली मोठी, मधली, धाकटी, ही उतरंडही मजेमजेत उलटसुलट उलगडून बघितली गेली.

आता जुन्या प्रथेत बदल करून समान न्यायानं सर्वांनाच ओवाळायचं असतंय. तरी त्यानिमित्तानं वेद-अनिश, मिहिका-कणाद, आई आणि दिपुमावशी, स्वरा, बाबा आणि आत्या, ऋतू आणि समृद्धी, अशा अनेक नामावळ्या नेहमीपेक्षा वेगळ्या कारणानं बोलण्यात आल्या. प्रथा अशाच कारणांसाठी महत्त्वाच्या वाटतात, एरवी मग रटाळ रुटीन असतंयच.

Tuesday, October 11, 2016

Happyness is सुट्टी, हातात पेंडींग यादीतलं पुस्तक, मनचाहे गीत + सदाबहार नग्में.

:-) ||शुभ दसरा|| :-)

Saturday, October 1, 2016

अश्विन खेळायला निघाला होता. आषाढाला आईनं केव्हाच हाका मारून घरी बोलवून नेलं होतं, पण त्याचं खेळून पोट भरलं नव्हतं. अश्विनाला जाताना बघून आषाढानं खिडकीतून त्याला विचारलं,
"मी पण येऊ तुझ्याबरोबर खेळायला?"
अश्विन म्हणाला, "हो, चल की!"
अश्विन आणि आषाढ हातात हात घालून उड्या मारत खेळायला गेले.