रुढार्थानं आज अविनाशचा दुसरा स्मृतीदिन.
पण आपलं घर, हवा, आपले पालक, ह्यांना जसं लक्षात ठेवावं लागत नाही, ते कायम सोबतच असतात, अविचं तसं आहे. तो भोवतीच असतो.
मात्र आजच्यासारखा,
'असे काहीसे होईल अशी फार होती आशा;
असे काहीसे झालेले पाहताच थिजे भाषा'
असं म्हणण्यासारखा एखादा दुष्ट दिवस उगवतो.
अर्थात ते दुष्टबिष्ट आपल्यासाठी.
मनस्वी माणसांना आपल्याच जगात रमायचं असतं, त्यांच्यासाठी कदाचित ही 'दार सुखाचे ते हरि-करुणा' सारखी पर्वणी असावी.
जग, माणसं, अगदी शब्दांचा सहवाससुद्धा वेचक घेणा-या अविची ही एक लक्षणीय रचना.
Stillborn
कविता लिहावी म्हटलं तर,
शब्दांचे थवे, हवेत सूर मारून
स्थलांतरीत पक्ष्यांसारखे
परागंदा.
मग आपण बसावे
भाषेच्या काठावर स्तब्ध,
मौनाचे दगड फेकत
निरवतेच्या पाण्यात.
आणि निरखत रहावेत
उठणारे आवेगाचे
अल्पजीवी तरंग.
आणि मग उठावे हलकेच
जन्माआधीच मेलेल्या कवितेचे
त्याच काठावर दफन करून.
No comments:
Post a Comment