म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, August 20, 2018

Friday, August 17, 2018

निमित्त अतिशय दु:खद आहे, पण सगळीकडे अटलजींना बघून, त्यांच्या कविता वाचून बरं वाटतंय. सद्गदीत शब्दाचा अर्थ आज उमगतोय.

अटलजी, मन:पुर्वक अभिवादन _/\_

Wednesday, August 15, 2018

सलोख्याचे प्रदेश

'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत', अशी आपण नुसतीच पोपटपंची करतो, रोजच्या जगण्यात ते म्हणणं झिरपलेलंच नाही असे स्वत:बद्दलच्या साक्षात्काराचे दिवस वारंवार उजाडत असतात. असाच एक दिवस साता-यात व्यासांच्या वाड्यावर उगवला. ईर्शादची नीलशी ओळख करून दिल्यावर अनपेक्षितपणे नीलची 'मला नाही आवडत मुसलमान लोकं' अशी फणकारलेली प्रतिक्रिया आली आणि मी स्तब्धच झाले!

आपल्या मुलाचा इतकी तीव्र प्रतिक्रिया, तीसुद्धा कुणाच्या तरी तोंडावर देण्यापर्यंत मतप्रवास झालाय आणि आपल्याला त्याबद्दल पुसटसा गंधही नाहीये हा प्रचंड शॉक होता माझ्यासाठी. मला एकाचवेळी भयंकर ओशाळल्यासारखं, कुणीतरी खांदे गदागदा हलवून जागं केल्यासारखं, भानावर आणल्यासारखं झालं. त्यामानानं ईर्शाद भलतेच सहज होते. त्यांनी त्यावेळी मला नॉर्मलला येण्यात मदत केली. ते म्हणाले, 'फार विचार करू नका आपा, मला सवय आहे अशा प्रतिक्रियांची'. ही आणखी त्रासदायक गोष्ट होती. त्यादिवशी मी त्याबद्दल नीलशी काहीच बोलले नाही किंवा तो असं का म्हणाला ते जाणून घेण्याचा नंतरही मुद्दाम वेगळा काही प्रयत्न केला नाही. मी जाणूनबुजून काही प्रयत्न करायला गेले आणि त्यातून काहीतरी विचित्र आणि अनरिपेअरेबल होऊन बसलं तर काय घ्या!

मग काही दिवसांनी एकदा त्याच्यासोबत फेसबुकवर बागडताना मीच लिहीलेला नॉस्टॅल्जिया लेख त्याला वाचून दाखवला आणि त्याखालच्या प्रतिक्रियाही वाचून दाखवल्या. त्यातली विशिष्ट नावं किंचित जोर लावून वाचली, अधोरेखित होतीलशी. एकीकडे ह्यावर मी आणि ईर्शादही एकमेकांशी अनेकवेळा बरंच बोलत होतो.

पुढे नव्या घराच्या वास्तुशांतीच्या वेळी आतल्या खोलीत आमचा बालमित्र अनिरुद्ध जोशी खड्या आवाजात मंत्र म्हणत होम करत होता आणि त्याचवेळी बाबांचे बालमित्र रमजानकाका दारात उंबरठ्याच्या आत उजव्या पावलाचा अंगठा टेकवून (आता त्यांची दृष्टी गेली आहे, तरी) डोळे मिटून तोंडाने कुराणातला आयता पढत होते. ह्या प्रसंगी मी लेकाकडे फक्त लक्ष देऊन बघत होते.

तेव्हापासून असं साहित्य शोधत होते ज्यात अशा गोष्टी असतील की मुलांना जड होणार नाहीत आणि सहज वाचल्या जातील. ही गोष्ट मी गौरी कानेटकरच्या कानावर घातली होती. समकालीन किंवा युनिक फीचर्सकडे असं काही मला मिळू शकेल असं वाटलं होतं. तिनं लगेच 'सलोख्याचे प्रदेश' सुचवलं. गौरीला सांगितल्यावर मी ते विसरूनही गेले. मात्र तिनं ते आवर्जून लक्षात ठेऊन गेल्या आठवड्यात कोल्हापुरात भेटल्या भेटल्या आधी हातात ठेवलं.

ह्या सगळ्या पार्श्वभूमीमुळं माझ्यासाठी अप्रुपाच्या झालेल्या ह्या पुस्तकाचं आता लेकासोबत मिळून वाचन होईल. आंघोळीनंतर मोठा हो, गुणी हो, चांगला माणूस हो असं कोरडंच म्हणलं जातं. पण म्हणजे नक्की काय करायचं हे त्याच्याइतकंच प्रामाणिकपणे मलाही माहिती नाही. कारण अशा गोष्टी बोट दाखवून स्पेसिफाय करता येत नाहीत आणि माझ्या दृष्टीनं गुणी, चांगला माणूस होण्याच्या निकषांचे अन्वयार्थ त्यानं कसे लावावेत हेही माझ्या हातात नाही. पण निदान चांगला नागरीक होण्याच्या प्रवासात मला त्याच्याबरोबर नक्की सहभागी होता येईल, असं वाटतं.

हे शेअर करावं की नाही हा संभ्रम होता. आपली प्रत्येकच गोष्ट काय सगळ्यांना सांगत सुटायचं हा नेहमीसाठीच पडलेला प्रश्न आहे. पण गौरी आणि ईर्शाद दोघांनीही बिनधास्त शेअर करायला सांगितल्यावर त्यासाठी आजचा दिवस औचित्याचा वाटला.

सगळ्यांना आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. अनंत गोष्टींमधून योग्य क्लॅरिटी ठेऊन स्वतंत्र व्हायला हवंय ह्याचं स्मरण ठेवण्यासाठी आणि ते अंमलात आणण्यासाठी शुभेच्छा.

Monday, August 13, 2018

देशातील रहाण्यासाठी सर्वात चांगल्या १० शहरांमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर - केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालय

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra+desha-epaper-mahdesh/jaganyasathi+deshatale+sarvat+sundar+shahar+pune-newsid-94563220

Sunday, August 12, 2018

सावन की साँझ, कैसी सुखद भई! :-)

अवीट हिराबाई _/\_

Sunday, August 5, 2018

आज सकाळी उठता उठताच हे आवडतं गाणं आठवलं. रात्रभर पाऊस सुरू होता. ह्या पावसाचं एक काय नव्हेच! कधी कशाची आठवण आणून देईल, काही काही नेम नाही. त्याला ना वेळ, ना काळ, ना काम, ना उद्योग! पण ताज्यातवान्या रात्रभर न्हायलेल्या सकाळी रंजनाताईंचा आवाज ऐकणं अमृतासारखं वाटलं, एवढं खरं.

इतक्या गुणी गायिका वरचेवर का ऐकायला मिळाल्या नाहीत कोण जाणे. रंजना पेठे, ज्योत्स्ना हर्डीकर, अनुपमा देशपांडे ही नावं खणून काढून ऐकावी लागतात. जाऊ दे, फार खोलात शिरू नये. त्यापेक्षा गाणं ऐकावं आणि तृप्त व्हावं. त्या पावसासारखाच त्या मनालाही ना काळ, ना वेळ, ना उद्योग, ना धंदा. सोप्या समोर आयत्या वाढून ठेवलेल्या गोष्टी सोडून चटोर बारक्या पोरासारखं पळत्या क्लिष्टतेच्या मागे धावणं हाच खेळ खेळत बसतं ते.

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा सगळ्यांना. अर्थाअर्थी ह्या गाण्याचा मैत्रीदिनाशी काही संबंध नाही, पण मैत्रीत असलं असंबद्ध वागणं चालतं, होय की नाही? :-)

#सजणा पुन्हा स्मरशील ना

Saturday, August 4, 2018

नील, तुला खारातली मिरची वाढू का?
हो, पण हँडलवाली वाढ.

#निळे बोल