म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, August 5, 2018

आज सकाळी उठता उठताच हे आवडतं गाणं आठवलं. रात्रभर पाऊस सुरू होता. ह्या पावसाचं एक काय नव्हेच! कधी कशाची आठवण आणून देईल, काही काही नेम नाही. त्याला ना वेळ, ना काळ, ना काम, ना उद्योग! पण ताज्यातवान्या रात्रभर न्हायलेल्या सकाळी रंजनाताईंचा आवाज ऐकणं अमृतासारखं वाटलं, एवढं खरं.

इतक्या गुणी गायिका वरचेवर का ऐकायला मिळाल्या नाहीत कोण जाणे. रंजना पेठे, ज्योत्स्ना हर्डीकर, अनुपमा देशपांडे ही नावं खणून काढून ऐकावी लागतात. जाऊ दे, फार खोलात शिरू नये. त्यापेक्षा गाणं ऐकावं आणि तृप्त व्हावं. त्या पावसासारखाच त्या मनालाही ना काळ, ना वेळ, ना उद्योग, ना धंदा. सोप्या समोर आयत्या वाढून ठेवलेल्या गोष्टी सोडून चटोर बारक्या पोरासारखं पळत्या क्लिष्टतेच्या मागे धावणं हाच खेळ खेळत बसतं ते.

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा सगळ्यांना. अर्थाअर्थी ह्या गाण्याचा मैत्रीदिनाशी काही संबंध नाही, पण मैत्रीत असलं असंबद्ध वागणं चालतं, होय की नाही? :-)

#सजणा पुन्हा स्मरशील ना

No comments:

Post a Comment