तुझं स्वास्थ्य निरामय आणि खळाळतं हसू निरंतर राहो, पुन्हा पुन्हा हेच आणि इतकंच मागणं.
माझ्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी तू होतीस, आहेस आणि रहाशील.
तुला आभाळभर शुभेच्छा.
Monday, September 10, 2018
मुलांना मराठी शाळेत का घालावं ह्याबद्दलचा हा Vishalव्यासनी लिहीलेला उत्तम आणि सविस्तर लेख आहे. जास्तीत जास्त लोकांनी तो वाचणं आवश्यक आहे.
नील मराठी माध्यम असलेल्या निमसरकारी शाळेत जातो. त्याचं आत्तापर्यंत मराठी माध्यमातूनच होम स्कुलिंग चाललेलं होतं आणि यंदा तो थेट पाचवीच्या वर्गात पहिल्यांदाच शाळेत बसला. अशा पार्श्वभूमीवर तो शाळेत इतका छान रमलाय की ह्यापूर्वी तो घरून शिकलाय ह्यावर विश्वास बसू नये. ही किमया त्याच्या शिक्षकांची. वेगवेगळ्या कुवतीचे शेकडो विद्यार्थी हाताखालून गेल्याच्या अनुभवाची. तो शाळेत बसणार ह्याबद्दल माझ्या मनात असलेली काहीशी साशंकता शिक्षक-मुख्याध्यापकांनी दूर करून उलट मलाच समजावून आश्वस्त केलं. शाळेतला शिक्षकवर्ग, त्यांची शिकवण्याची पद्धत, मुलांचा शाळेतला निश्चिंत वावर, केवळ अभ्यास हा केंद्रबिंदू नसणं, घोकंपट्टीला पूर्ण फाटा, विद्यार्थीशिक्षकांचा एकत्र संवाद, मैदानी खेळ आणि एकंदरीत मुलांना उत्साहानं शाळेत जावंसं वाटेल असं वातावरण, ह्याबद्दल मी अतिशय समाधानी आहे.
माझे सदर लेखातल्या मुद्द्यांबरोबरच दोन तीन अधिकचे मुद्दे होते मराठीच शाळा ठरवताना. १. शाळेत समाजातल्या सर्व स्तरातली मुलं एकत्र आलेली असावीत. त्यामध्ये भाषेची सरमिसळ, अपशब्द, विविध ब-यावाईट सवयी, हे सर्व अटळ मुद्दे ओघाने आले. २. वर्गात पटसंख्या कमी असावी. अशानं शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याची पार्श्वभूमी माहिती असते आणि नस सापडते. ३. कोणतेही अनावश्यक तणाव मुलावर आणि पालक म्हणून माझ्यावर येण्याची शक्यता असू नये - उदा. कुणी महागडी दप्तरं किंवा कंपास आणले, कुणी वॉटर पार्कला जाऊन आले, तर कुणी मोठाल्या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरे केले त्यांना तशाच तोलामोलाच्या भेटवस्तू द्या किंवा आपणही साजरे करा वगैरे. अशा काही गोष्टी काही वेळा तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर पटत नसल्या तरी, मुलांना वर्गात सर्वांबरोबर समपातळीत राहू देण्यासाठी कराव्या लागण्याची शक्यता असते. हे मला काही इंग्रजी शाळापालकांच्या बोलण्यातून लक्षात आले.
ह्या बाबी जरा आखुडशिंगी, बहुदुधी, सुबक, ठेंगणी श्रेणीतल्याच आहेत. पण नीलसाठी सरकारी शाळांची चाचपणी करताना सुदैवाने सरकारी मराठी शाळांमधे अजून काही प्रमाणात हे असं वातावरण शिल्लक असल्याचं जाणवलं. मात्र सरकारी शाळा म्हणल्यानंतर जे ठराविक साशंक करणारं केवळ ऐकीव माहितीवर आधारित चित्र डोळ्यांसमोर उभं रहातं, ते प्रत्यक्षात तसे नाही, हे पहायलाही कुणी जात नाहीत हे दुर्दैवानं खरं आहे. नीलला आणि मला अशी शाळा मिळाली, हा मोठा आनंद आणि भाग्यही म्हणायला हवं.