म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, February 26, 2022

 नजिकच्या कालखंडात माझ्या ग्रहमानात 'शिव्या'दानाचा योग आहे आणि त्या मी कचकावून देणार आहे. वाढीचं वय कोल्हापुरात गेलेल्यांच्या समृद्ध शिव्यासंग्रहाबद्दल अवाक्षरही वेगळं बोलायला नको, तसा तो माझाही आहे. आमचा शेजार एवढा देदिप्यमान होता की आम्ही जागेच शिव्या ऐकत व्हायचो आणि आमचं बेला के फूल, रजनीगंधा वगैरेही शिव्यांचंच असायचं. योगायोगानं आताही हे दान देदिप्यमान शेजाराची परंपरा कायम राखणा-याच्या पदरातच घालायचं आहे, त्यामुळे झक्कपैकी एक वर्तुळही पूर्ण होणार आहे.

निव्वळ अभ्यास कुठे कमी पडू नये आणि अधेमधे अडखळले तर नंतर स्वतःचीच स्वतःला लाज येऊ नये म्हणून गेल्या काही दिवसांत पहिल्यांदाच मेंदूतल्या त्या कप्प्यावरची धूळ झटकली. कुठे कुठे चढलेला गंजबिंज नीट साफसुफ केला. आणि शेलकी रत्नं वरखाली करून हा दागिना शोभेल की तो बरा दिसेल, अशी सध्या उजळणी चालू आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त माझी अशीही तयारी.
जय महाराष्ट्र, जय मराठी 🌼

 रशिया युक्रेनच काय, कोणत्याही युद्धासंदर्भातले विनोद करणारे आणि फिरवणारे लोक सपशेल नापास आहेत. आपल्या भोवती ही परिस्थिती असती तर बुडाखाली आग लागली असती. शिकायला गेलेली कोवळी पोरंही अडकलीत. आईबापांच्या काळजाचं पाणी झालंय.

देव बरे करो.

Friday, February 18, 2022

 लकडी पुलावरून दुचाकी नेताना अजूनही पोटात पाकपुक होतं!

🙈

लकडी पूल अनेक वर्षांनी दुचाकीस्वरांसाठी खुला केल्यानंतरची मन:स्थिती.

Saturday, February 5, 2022

 कोवळी उन्हं, ढोकळा, पपई आणि बोर्नव्हिटा.



Friday, February 4, 2022

 पांघरुण खूप आवडला.

दमदार पटकथा, चपखल कास्टिंग, दर्जेदार अभिनय, सुश्राव्य संगीत, नेत्रसुखद फ्रेम्स.
उत्तम संवाद, साजरी वेशभूषा, देखणी लोकेशन्स, सगळंच सरस आहे.
संपूर्ण अल्बमच मेजवानी आहे. गीतकार, संगितकार आणि गायक कुणीही कसर ठेवलेली नाही. मांजरेकरांचा दखलपात्र चित्रपट.
गालबोट म्हणून अलिकडच्या काळातले वाटणारे फोटो तेवढेच काय ते खटकले.
नियतीनं चुकवलेल्या गाड्यांची गोष्ट.
आवडो, नावडो, पण नॉट टू मिस.


Wednesday, February 2, 2022

 आकाशवाणीवरचे माहितीपर कार्यक्रम आवर्जून सर्वांनी ऐकण्यासारखे असतात. विषयवार नेमून ठेवलेले स्लॉट्स असतात आणि त्यातल्या उपविषयांवर अभ्यास असणारे वक्ते, नागरीक बोलावले जातात.

कोल्हापूर केंद्रावर 'कायद्याविषयी बोलू काही' ह्या कार्यक्रमात आज ऍडव्होकेट विनय कदम ह्यांची अत्यंत चांगली आणि सुलभ मराठीतली मुलाखत झाली. मुख्य म्हणजे सगळे मुद्दे सामान्य नागरीकांच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असणारे आणि कायदा पदोपदी आपल्या साथीला असताना केवळ आपल्या अज्ञानामुळे आणि भितीमुळे आपण आपले नुकसान कसे करून घेतो, ह्याबद्दल उदाहरणांसकट चर्चेला घेतले होते. अनेक किरकोळ वाटणा-या पण प्रत्यक्षात अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आज समजल्या. उदा. वहातुक पोलिसांसंबंधी असणारे प्रवाद आणि रस्त्यावरच्या ह्या घडामोडींसंदर्भात असणाऱ्या तरतुदी, कलम 498 संबंधी खुलासे, ओघानं पुरुषांसाठी असणारी कायदेशीर संरक्षणे आणि काळानुसार निर्माण झालेली त्यांची गरज, पत्रकारांचे अधिकार आणि कायदा, कायद्यात कालपरत्वे केले जाणारे बदल आणि ते तसे करता यावेत - किंबहुना करावे लागतील ह्या दूरदृष्टीने त्यासाठी आपल्या घटनेत करून ठेवलेल्या तजविजी, जागतिक कायदेजगतातलं भारतीय कायद्याचं स्थान, सामान्य नागरीकांची कायद्यासाठी असणारी साधी मुलभूत कर्तव्यं, अशी सांगोपांग माहिती मिळाली.
मला इथे मुलाखतकर्तीचंही विशेष कौतुक करायचं आहे. मुलाखती बघणं हा माझा छंद आहे त्यामुळे असंख्य मुलाखती ऐकताना-बघताना वारंवार जाणवत आलेल्या काही बाबी आहेत. आलेल्या पाहुण्याचं मोठेपण लक्षात घेऊन, योग्य तो मान राखत बोलणं ही पहिली गोष्ट. ती व्यक्ती तिच्या पात्रतेमुळे बोलायला आमंत्रित असते, त्यासाठी ती वेळ काढून आलेली असते, ही जाणीव असली पाहिजे. वक्त्याबद्दल, त्याच्या कामाबद्दल किमान काही माहिती गोळा करून छोटी प्रश्नावली समोर तयार हवी. खुपदा अत्यंत घाशीव प्रश्न विचारत, त्याच त्याच प्रश्नांवर घुटमळत, थातुरमातुर प्रतिसाद दिले जात असतात आणि एकंदर अनुभव अत्यंत रटाळ उरतो. फक्त मधे बोललं नाही म्हणजे मुलाखत चांगली होते, असं नाही. वक्त्याला खुलवता नाही आलं तर निदान त्याचा विरस होणार नाही ही तरी दक्षता घेतली पाहिजे. अलिकडेच प्रसारित झालेल्या अनुराधाताईंच्या Anuradha Mehta मुलाखतीचा अनुभव तर ताजा ताजा आहे. आजची मुलाखतकर्ती मात्र चर्चेला उत्तम पद्धतीने पुढे नेत होती, तिनं अतिशय समर्पक प्रश्न विचारले आणि संवादातल्या रिकाम्या जागा मुद्द्याला धरून बोलत भरून काढल्या. ह्याबाबतीत नीनाताईच्या Neena Mestry Naik मुलाखती नेहमी श्रवणीय असतात. इतर केंद्रांचे उल्लेख इथे करण्याचं प्रयोजन नाही, म्हणून ते टाळले आहेत.