'अमलताश' वाचलं नुकतंच. आवडलं. एक साधंसुधं, सौम्य आणि निर्मळ आत्मकथन आहे. खुप सकारात्मक आणि समाधान देणारं.
प्रामाणिकपणे सांगायचं तर वाचायला घेताना मनात धाकधुक होती की मनातल्या संतांच्या आणि इंदिराबाईंच्या प्रतिमेला तडा जाईल की काय. ही अपेक्षा योग्य नाही याची जाणीव आहे, तरीही ती होतीच. पण संतांबद्दल आणखी जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता होती. तीच गोष्ट 'मृद्गंध'नंतरच्या इंदिराबाईंबद्दल. शिवाय मायलेकांच्या एकत्रित भावबंधाबद्दलही.
फक्त दोन अपवाद वगळता लेखकांच्या बायकांच्या मनोगतांचा धसका बसलेला आहे. आपल्याला भावलेल्या त्या व्यक्तिमत्वाच्या लेखक ह्या एका कोनाची त्याच्या अख्ख्या माणूसकीशी आपण नकळत सांगड घातलेली असते, ती दर वेळेस इतर अनेक कोनांमुळे सुसंगत ठरतेच असं नाही., काही वेळा कारणं पटणारी असतात, काहीवे़ळा नसतात. यात भर पडते ती कथनाच्या पद्धतीची, सांगणा-यावर झालेले अन्याय आणि त्याच्या मनात दबा धरून बसलेल्या आकसांचीदेखिल. हे सगळं लक्षात घेऊनही दिल्या गेलेल्या दाखल्यांमुळे खुपदा त्या माणसाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलतो, प्रकाश संतांच्या बाबतीत मला हे (टाळणं माझ्या हातात असूनही) सगळं होणं मुळीच नको होतं.
डॉ. सुप्रिया दीक्षितांनी नेमकी ही जाणीव लख्ख ठेऊन लिहिलं आहे, किंबहुना मुळात त्यांच्याच मनातले संत इतके लख्ख आणि उजळ आहेत की असा काही सायास त्यांना करावाच लागलेला नाही. फार सहजपणे आणि प्रवाहीपणे त्या घडलं ते सांगत गेल्या आहेत. संतांसोबतचं सहजीवन, स्वतःवरचा विश्वास आणि कर्तबगारी, स्नेहीपरिवार आणि कौटुंबिक भावविश्व, मुलांचं कौतुक; या सर्वांबद्दल कोणताही आविर्भाव न ठेवता त्या आपल्याशी बोलतात. आयुष्यात कटू प्रसंग कमी आले असं नाही, पण त्या प्रसंगांना पानाच्या डाव्या बाजूइतकंच महत्व आहे. माणसं माणसांसारखीच वागतात, पण त्यांची वैगुण्ये अधोरेखित केली गेलेली नाहीत.
वाचून झाल्यानंतर मला सुप्रियताईंबद्दल कृतज्ञता वाटली. अनेक कारणांनी कित्येक वर्षे दडपल्या गेलेल्या आणि पुनश्च त्याच तीव्रतेने प्रकटलेल्या संतांच्या अभिव्यक्तीला त्यांच्या सशक्त सहकार्यामुळे, ऋजूतेमुळे आणि संतांवरच्या निर्व्याज प्रेमामुळे प्रवाहीपण आलं असं मला वाटतं.
मला जे जे वाटलं ते त्यांनाही मी पत्राद्वारे आवर्जून कळवलं आहे. पुस्तक पुन्हा वाचणार आहे आणि संग्रहीदेखील ठेवणार आहे नक्कीच!
--------------------------------------------------------------------------------------------
दिनांक १८ फेब्रुवारी २०१४, वेळ संध्याकाळी ५ वा ५१ मि.
सुप्रियाताईंचा मला माझं पत्र मिळाल्याचा फोन आला! १५ फेब्रुवारीलाच तर पोस्ट केलं होतं मी पत्र. दुपारी हातात पडल्यावर लगेचच वाचून मला फोन केला त्यांनी. जवळपास २० ते २५ मिनिटे आम्ही फोनवर बोलत होतो. अतिशय मऊ आणि स्निग्ध आवाज, खालच्या पट्टीतला. जसं लिहिणं, तसंच उबदार बोलणंही. त्यांच्याबद्दल माझं जसं इम्प्रेशन झालेलं अगदी त्याला साजेसं.
त्यांनी पुस्तकाबद्दलचा सगळा प्रवास उलगडून सांगितला. श्री. पुं.चे अभिप्राय, त्यांचं आजारपणातलंही अमलताशच्या खर्ड्याचं वाचन, त्यांच्या जाण्यानंतरचं मौजेतलं स्थित्यंतर, या सर्वांत प्रकाशनाला झालेला ७-८ वर्षांचा उशीर.. मुळात आईने आठवणी लिहून काढायला दिलेलं प्रोत्साहन, श्रीनिवास कुलकर्णींनी, सुप्रियाताईंनी आणि त्यांच्या मुलाने केलेलं प्रुफरिडींग वगैरे खुप तपशीलाने बोलल्या. आईला तिच्या आजारपणात कसं वाचून दाखवायच्या, आईने इतकं कसं आठवतं तुला म्हणुन केलेलं कौतुकही सांगितलं.
साहजिकच त्या ओघात त्यांच्या आईचा विषय निघाला. मी म्हटलं तुमची आई काळाच्या केवढी पुढे होती, तर त्याही मग तिच्याविषयी खुप सांगत राहिल्या. मग माझ्या आईबद्दल विचारलं. स्वतः डॉक्टर असल्यामुळे अगदी तपशीलवार चौकशी केली. सासर-माहेर कोल्हापूर म्हटल्यावर क-हाडला ये म्हणाल्या लगेच. फक्त फोन करून आलीस तर बरं होईल, मी घरीच असते, हल्ली कुठे जात नाही तरी तुला हेलपाटा नको म्हणाल्या..
माझं अक्षर आवडलं, कौतुक केलं. पत्र छान लिहिलंय म्हणाल्या. शिवाय इतर अधिकचे अभिप्रायही कळवणारं हे पहिलंच पत्र असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
मला फार आनंद झाला त्यांचा फोन बघून आणि त्यांच्याशी बोलून. हे त्यांना सांगितल्यावर मग छानशा हसल्या पण.
खूपच छान वाटतंय मला.. !!
छानच ग , आता "अमलताश" मिळवून वाचतेच :)
ReplyDelete