म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, March 26, 2016

कुबेरांचा आजचा अग्रलेख. गांभिर्यानं विचार करण्याचा मुद्दा आहे. ही वृत्ती बोकाळतेय. ज्या इमारतीत रहाते, त्या इमारतीचा देखभालखर्च देताना व्यवस्थापन बघणा-यांना 'काय उजेड पाडता' असे प्रश्न निर्लज्जपणे अरेरावीनं विचारले जातात. भ्रष्टाचाराबद्दलच्या ह्या सुरातल्या चर्चा लंच टेबलवरही हिरीरीनं मुठीबिठी आपटून ऐकल्यायत. सिग्नल्सवर ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यावर लोकांच्या अंगात जी वीरश्री संचारते, ते तर वारंवार दिसणारं चित्र आहे. मी काहीतरी असं केलंय, वागलेय, ज्याची मला दिलगीरी असली पाहिजे, हा शरमेचा भाव कुठेच नसतो, उलट पकडले गेल्यावर चेव चढतो.

http://www.loksatta.com/aghralekh-news/ticket-less-woman-traveller-says-wont-pay-fine-catch-vijay-mallya-first-1219632/

Thursday, March 24, 2016

चहा मला फारसा आवडत नाही. काहीतरी चमचमीत खमंग खाताना किंवा खिडकीतून पाऊस बघताना नाहीतर कडकडीत थंडीत सकाळी उठल्यावर चहा मनापासून प्यायला जातो. पण ती रेड लेबल चहाची 'एक कप चाय और मिलेगी?' जाहीरात कधीही पाहिली की मात्र मला त्याचवेळी लगेच चहा प्यावासा वाटतो. इतका तो कपात ओतलेला चहा भारी दिसतो!
चहा न आवडणा-यांची ही कथा, चहा आवडणारे तर लगेच आधणही चढवत असतील काय? कोल्हापुरात होत असेल तसं. कारण त्यांच्याकडे इकडे जेवणं सुरू असतील तरी तिकडे चहाचं आधण असतंच. मग भले, प्रहर कोणताही असो!