म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, March 13, 2017

संपूर्ण शारदा

आपण ब-या वाईट दोन चार ओळी लिहीतो. काहीतरी वाटलं, काही पाहिलं, काही भावलं किंवा काही वाचलं म्हणून. कधी आपलं मत म्हणून, मतभेद म्हणून तर कधी कधी उगीच आपलं काहीतरी लिहायचं म्हणूनही. अनंत छटा असतात. पण तळमळ, अभ्यास, संशोधन, त्यातून केलेलं लेखन आणि मग त्यातून आलेली 'शहाणीव' हा प्रवास मात्र खूप कमीजणांचा होतो. तो व्हायला हवा, 'आहे'कडून 'असावं'च्या दिशेनं. माझ्याशी इतरांनी जसं वागावं असं वाटतं, तसं प्रत्येक माणसानं भोवतीच्या प्रत्येक माणसाशी वागावं, इतकं साधंसुधं पण सगळ्यात मोठ्ठं शहाणपणही खूप कमीजणांना मिळतं. शब्द तर प्रत्येकाच्याच दिमतीला असतात, पण त्या शब्दांची संगतसोबत कोणाशी कशी असते, हे पहाणं फार छान असतं. मला झालेले हे सगळे साक्षात्कार आजच्या संध्याकाळचेच, ताजे ताजे.

तीन अतिशय आवडत्या लेखिका, प्रतिभा रानडे, वीणा गवाणकर आणि उमा कुलकर्णी, आणि आवडतेच लेखक डॉ. आनंद नाडकर्णी, ह्या चौघांनी आज 'संपूर्ण शारदा' ह्या कार्यक्रमांतर्गत ऐसपैस गप्पा मारल्या आणि वाचकांच्या शिदोरीत एका अविस्मरणीय अनुभवाची श्रीमंत भर पडली. ह्या तिघींना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधावा, ही कल्पनाच मुळात कल्पक आहे. रंगत तिथूनच सुरू होते. एखाद्या अघळपघळ घराच्या सोप्यात घरगुती गप्पांमध्ये रंगलेले ज्येष्ठ आणि त्यांच्या मनसोक्त गप्पा भक्तीभावाने ऐकण्यासाठी दाटीवाटीनं भोवती गोळा झालेले घरातले इतर कुटुंबिय असं इतकं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप अनौपचारिक होतं. पण सोप्यातल्या त्या गप्पा जशा कधीच संपू नयेत असं वाटतं, तसंच हा कार्यक्रम संपल्यावरही वेळ संपली पण मन भरलं नाही अशी अवस्था होती.

ह्या तिघीही विदुषी आपापल्या विषयांमध्ये स्वत:ची भक्कम ओळख निर्माण केलेल्या, स्वतंत्र वैशिष्ट्य असलेल्या आणि वाचकांचं अपार प्रेम लाभलेल्या आहेत. त्यांची क्षेत्रे संपूर्णपणे भिन्न आहेत, तरीही एका व्यासपीठावर बसलेल्या असताना कुठेही ही विभिन्नता मधे येत नाही. एवढं मोठं कर्तृत्व ना कुठे त्यांच्या कुणाच्या देहबोलीत डोकावतं, ना त्यांच्या बोलण्यात. एक कमालीचं मार्दव आणि साधेपण तिघींच्याही व्यक्तिमत्त्वांमधे दिसतं. एक घरगुतीपण. लेखन हा त्यांच्यातला सामायिक सहजभाव आहे. प्रत्येकीचा अव्याहत लेखनप्रपंच सुरू आहे, पण एकतानता, तीव्रता तिघींच्यातही सुरूवातीपासून सारखीच आहे. मला त्यांचं बोलणं ऐकताना मधेच मालिनी राजूरकरांचीही आठवण आली. त्याही ह्या तिघींच्याच पठडीतल्या आहेत म्हणून असेल कदाचित. त्याही अशाच. येतात, सहजपणे अलौकिक गातात, निघून जातात. कसलाही दिमाख, दिखाऊपणा, आढ्यतेचा लवलेश नाही. सदैव जमिनीवर, घट्ट.

लेखक हे उत्तम बोलणारे असतातच असं नाही. पण ह्या तिघी ह्यालाही अपवाद. प्रत्येक जण दिलखुलास, खणखणीत मुद्देसुद आणि खुसखुशीत शैलीत बोलल्या. अगदी ऐकत रहावंसं. त्यातही उमाताई तर गोष्टीवेल्हाळ वाटल्या. मुळात डॉक्टरांचे प्रश्नही इतके वाखाणण्याजोगे होते, की तोड नाही. प्रश्नाचं प्रयोजन तिघींनाही योग्य मुद्द्यांवर बोलतं करणं, आणि ते डॉक्टरांनी अगदी नेटकं केलं. त्यांना मनसोक्त बोलू दिलं, कुठेही मधे खंडीत केलं नाही. कार्यक्रमाची दिशा, वेग आणि वेळ सांभाळून हे करणं फार कौशल्याचं आहे आणि ते डॉ. नाडकर्णींना नेमकं साधलं आहे. कार्यक्रमाच्या पुर्वार्धात लेखिकांचं व्यक्तिमत्व, त्यांचा भोवताल आणि साहित्यीक जडणघडण असा प्रवास आहे. पण तो सरधोपट मार्गाने विचारला गेला नाही. तर उत्तरार्धाचं स्वरूप लेखिकांच्या साहित्यिक सहजीवनाचा प्रवास उलगडणारं आहे. तेही नाविन्यपूर्ण प्रश्नांनीच. फार समृद्ध करणारा संवाद होता हा.

लेखकभेट किंवा लेखकओळख फार महत्त्वाची असते. त्यातून लेखक आणि आपसुकच त्याचं व्यक्त होणंही काही प्रमाणात समजत जाणं सोपं होतं. इतरांबद्दल कल्पना नाही, पण व्यक्तिश: माझं तरी असं होतं. आजच्या तीन लेखिका तर वर म्हणल्याप्रमाणे आधीपासून आवडत्या आहेतच, पण आज माणूस म्हणूनही मी त्यांच्या अधिक जवळ गेले. आता त्यांची पुस्तकं वाचताना अधिक आगळी आत्मियता असेल.

आजचा कार्यक्रम लवकरच यु ट्युबवरदेखिल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वजण हा आनंद घेऊ शकणार आहेत. त्यासाठीच कार्यक्रमाच्या कंटेंटबद्दल फारसा उल्लेख केलेला नाही. तो प्रत्यक्ष ऐकण्या-पहाण्याजोगाच अनुभव आहे.

No comments:

Post a Comment