म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Wednesday, April 12, 2017

आज विठ्ठलवाडीतल्या विठूरायाला वासंतिक उटी होती. चंदनाचा लेप लावून आणि मोगरीनं वेढून विठोबाचा उकाडा सुसह्य केला जातो. दर उन्हाळ्यात वर्षातून एकदा हा कार्यक्रम असतो. दोन तास भजन आणि मग पावलांचा ठेका धरून आरती असं तल्लीन करणारं वातावरण असतं. असं वातावरण एरवीही फार आवडतं मला. सगळं देऊळ चंदनाची उटी आणि मोगरीच्या दरवळानं नुसतं घमघमत होतं. विठू आणि रखुमाई एकदम देखणे दिसत होते. तसे ते नेहमीच देखणे दिसतात, पण आज विशेषच. त्याला लावलेली ती उटी मग सगळ्या उपस्थितांनासुद्धा लावली जाते. त्या स्पर्शानं आणि गंधानं मन प्रसन्न होऊन गेलं. शांत, थंड गारेगार वाटलं.

जेमतेम तीस चाळीस लोक होते, पण देहभान हरपून एकापाठोपाठ एक सगळेजण सलग भजनं गात होते. सोबत टाळ आणि चिपळ्यांची साथ. त्यातली बहुतेक भजनं माहिती असलेली आणि काही थोडीफार पाठ असल्यामुळे मीही त्यांच्या सुरात सूर मिळवला. सगळं जग एकीकडं आणि आपण एकीकडं असं काहीतरी वेगळं वाटत होतं त्या सगळ्यांबरोबर गाताना, तरी त्या तसं वाटण्यात एक दिलासा होता, मनाला एक छानशी स्थिरता आली होती. मी त्यातली थोडी उटी मला हवी आहे, मिळेल का विचारल्यावर एकांनी इकडेतिकडे फिरून एक प्लास्टिकची पिशवी हुडकून आणून त्यात ती ओली पातळ उटी भरून दिली. खुशच झाले मी. नंतर सर्वांसाठी आंबा मस्तानीचा प्रसाद होता. तिथं देवळासमोरच्या सुजाता मस्तानीचे वारक-यांच्याच पोशाखातले मालक सर्वांना आग्रहानं बोलवत होते. मला आधी वाटलं, फक्त भजनक-यांसाठीच असेल, म्हणून मी तिकडे न जाता मागंच रेंगाळले. पण तो प्रत्येकासाठी आहे असं सांगून मला त्यांनी हाक मारून बोलावलं आणि मी घेतल्यावर मस्तानी संपली! काय योग असतात पहा!

खूप खूप वर्षांनंतर आज 'जनविजन झाले आम्हां, विठ्ठलनामाप्रमाणे' म्हणलं. अगदी पारच विस्मरणात गेलं होतं. एका टोपीवाल्या दादांनी अचानक सुरू केल्यावर सुखद धक्का बसला. नंतर माझी माय चंद्रभागा, संतभार पंढरीत, देव भावाचा भुकेला, अजी सोनियाचा दिनु, बोलावा विठ्ठल, हेची दान देगा देवा वगैरे. पण आजचा दिवस विठोबाचा, चंदनाच्या सुवासिक उटीचा आणि जनविजन पुन्हा भेटल्याचा.

पुंडलीक वरदे हरी विठ्ठल ||
श्री ज्ञानदेव तुकाराम ||
पंढरीनाथ महाराज की जय ||

No comments:

Post a Comment