रविवारची निवांत सकाळ आहे. चिल्लर पार्टी नव्या राजवाड्यात आनंदात बागडतेय. राजवाड्याच्या घड्याळाचे दहाचे टोल घणघणताहेत. पर्यटकांची गर्दी सुरू न झाल्याने आसमंतात अजूनही शांतता नांदते आहे. मोर कुटुंब केकावत आहे. आकाशात नारायणरावांचा दांडी मारावी की कसं ह्याबाबतचा निर्णय होत नाहीये. तोवर वारा मंद पण जोरदार झोके घेतोय. झाडं सळसळून साथ देतायत. राजवाडा कॅफेचा पहिला वाफाळता चहा हातात आलाय आणि पहिल्या ताज्या मिसळीला उकळी फुटल्याची वर्दी हवेनं पडवीलगतच्या ह्या डेरेदार कडुनिंबाच्या पारावर तत्परतेनं पोचवलीये. ती लवकरच सेवेशी हजर होतेय आणि सोबतीला जातीनं व्यंकटेश माडगुळकर आहेत. सुख म्हणजे आणखी नक्की काय असावं?
No comments:
Post a Comment