म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, July 22, 2019

आंसू भारी है ये जीवन की राहें

आज खूप जण मुकेशची आठवण काढतायत. एकाहून एक सुरेख गाणी ऐकायला, वाचायला मिळतायत. मुकेश आवडतो. त्याची काही गाणी पुन्हा पुन्हा ऐकली जातात ती म्हणजे 'सूर की गती मैं क्या जानूं', 'ये दिन क्या आए लगे फूल हंसनें', 'कई बार युं भी देखा है', 'मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने', 'जाने कहाँ गए वो दिन', 'मुझको इस रात की तनहाई में आवाज न दो', 'बडे अरमानों से रखा है बलम तेरी कसम' वगैरे. तशी बरीच आहेत खरंतर.

पण 'आंसू भरी है' जरा जास्त आवडतं. साधे शब्द, कसलाही मेलोड्रामा, दोषारोप, कडवटपणा नाही. त्यामुळे दुःखी असलं तरी रडवं नाही. एक प्रकारचं हवंहवंसं, आकर्षून घेणारं गांभीर्य आहे. हसरत जिंदाबाद. सारंगी प्रचंड भावखाऊ आहे ह्यात. मुकेशच्या बरोबरीनं वाजते. आर्त आणि जखम न करता आत घुसणारी. (ही सारंगी आणि 'है दुनिया उसी की जमाना उसी का' मधला Saxophone एकाच जातकुळीचे वाटतात. गायकाइतकाच परिणाम साधतात.) सतार तेवढ्या मोजक्या तुकड्यातही मन प्रसन्न करून जाते. राज कपूरबद्दल काय बोलावं, इसम भलताच देखणा आहे. शिवाय सहज आहे. बरेचदा असतात तसे नाटकी हावभाव नाहीत इथे. दत्तारामांची चाल इतकी प्रभावी आहे, की कशातही कितीही गर्क असलं तरी जरा जरी कुठून कानावर आली तरी ऑक्टोपससारखी मनाला वेढून टाकते आणि दुसरं तितकंच दमदार काही कानावर पडेपर्यंत तशीच घट्ट वेढून रहाते. इतकं सगळं असलं तरी गाणं मुकेश स्पेशलच आहे.
पण एवढं उगीच बोलतेय मी. काही आवश्यकताच नाही. एकदा ऐकलं की ते ठावच घेतं.

Sunday, July 14, 2019

 दही, बाकी काही नाही

😊
(ता. क. दह्याच्या ह्या सटानं पोस्टनंतर दोनच दिवसांनी राम म्हटलं 😢 जवळजवळ 15 वर्षं वापरलेल्या ह्या आवडत्या सटाचा दह्यामुळे निदान हा एक फोटो तरी संग्रही राहिला. )





 पडवळाचं रायतं आणि पडवळ पुराण!

पडवळाचे काप कच्चेपणा जाईल, पण मेण होणार नाही ह्या बेतानं कोरडे वाफवून जीरे, कढिलिंब, हिंग, हळद, हिरवी मिरचीची खमंग फोडणी घालून, जेवायला घेताना अगदी ऐनवेळी मीठ, साखर, मोठा चमचा ताजं घट्ट दही मिसळून कालवणे. दाण्याचं कुट, ओलं खोबरं ऐच्छिक.
रविवारच्या मानाने अगदीच निरस पदार्थ आहे. पण काही वेळा करायला सोपं आणि पोटाला हलकं काही तरी बरं वाटतं. नुकती कुकरमधून काढलेली नेहमीची साधी शिजलेली मुगाची डाळ आणि आंबेमोहराचा वाफाळता मऊ भात -खिचडी किंवा वरण नव्हे- त्यावर घरचं साजुक तुप आणि मीठ. सोबत ही कोशिंबीर. फारच वाटल्यास एखादा भाजलेला पापड. बस्स, पावसाळी रविवार दुपारच्या गर्द डुलकीसाठी एवढा ऐवज पुरेसा आहे. माझ्यासाठि तरी 😊
खरं म्हणजे लहानपणी पडवळ अजिबात नावडता होता माझा. नंतर मेसमधे जेवायचो तिथे तर ती लाडकी भाजी असल्यासारखी आठवड्यातून किमान दोनदा पानाला असायचीच. त्यामुळे आणखीच मनातून उतरली. पण लग्नानंतर नव-याबरोबरच स्वैपाकही गळ्यातच पडला म्हणल्यावर एकेक करून सगळ्या भाज्या एक्स्प्लोअर करायला घेतल्या. त्यात पीठ पेरलेला पडवळ जमला आणि वरचेवर व्हायला लागला. नंतर 'त्रिपदी'त गोनीदांनी वालाची डाळ घालून रेसिपी सांगितल्यावर तेही व्हर्जन खूप आवडलं. कधी नव्हे ते वालाची डाळही त्यासाठीच पहिल्यांदा आणली आणि ती तेव्हा सिंहगड रस्त्यावर कुठेही मिळाली नव्हती, ग्राहक पेठच (❤️ पेठेबद्दल लिहावं लागणारे एकदा. मनाजवळ आहे!) गाठावी लागली. काय काय असोसिएशन्स असतात तरी! 😊 ही कोशिंबीर कुठं खाल्ली, वाचली ते आठवत नाही, पण केल्यासरशी एका झटक्यात आवडली आणि केली जायला लागली. अशा त-हेने पूर्ण नावडती भाजी आवडती झाली एवढं खरं.

Saturday, July 13, 2019

 नरसोबा-कृष्णामाई भेट आणि देवांचे वरच्या देवळात प्रस्थान

आज आषाढी एकादशी दिवशीची ही श्री क्षेत्र वाडीची काही क्षणचित्रे. चार दिवसांपूर्वी पाणी देवांच्या चरणांशी आले. खालील पहिल्या फोटोत पुजारीवर्ग पोहत देवपादुकांना प्रदक्षिणा घालत आहे. श्री. हरी पुजारी ह्यांनी सहका-यांसमवेत दक्षिणद्वार सोहळा, महाएकादशीचे स्नान ह्याबद्दल सांगितले. त्यांची परवानगी आल्यानंतर ते सर्वांसोबत अवश्य शेअर करेन.
कृष्णेचे अथांग पात्र, आषाढातली आजची पाण्याची पातळी, आजच्या सार्वत्रिक उपासाच्या निमित्ताने भक्तांची क्षुधा शांत करणारा वरीचे तांदूळ आणि दाण्याच्या आमटीचा वाफाळता महाप्रसाद, कृष्णा-पंचगंगा संगम आणि त्यावर चव-या ढाळणारं गच्च भरलेलं सावळं आभाळ, कोणत्याही क्षणी पाण्याखाली येण्याची शक्यता असलेला कुरुंदवाड-रांगोळी रस्त्यातला एक टप्पा, पाण्याने तुडुंब भरलेली शेतखाचरं.
आजच्या आनंद सोहळ्याची भैरवी सांगवड्याच्या देखण्या लक्ष्मी-नरसिंह आणि विठ्ठल रखुमाईभेटीनं.