पडवळाचं रायतं आणि पडवळ पुराण!
पडवळाचे काप कच्चेपणा जाईल, पण मेण होणार नाही ह्या बेतानं कोरडे वाफवून जीरे, कढिलिंब, हिंग, हळद, हिरवी मिरचीची खमंग फोडणी घालून, जेवायला घेताना अगदी ऐनवेळी मीठ, साखर, मोठा चमचा ताजं घट्ट दही मिसळून कालवणे. दाण्याचं कुट, ओलं खोबरं ऐच्छिक.
रविवारच्या मानाने अगदीच निरस पदार्थ आहे. पण काही वेळा करायला सोपं आणि पोटाला हलकं काही तरी बरं वाटतं. नुकती कुकरमधून काढलेली नेहमीची साधी शिजलेली मुगाची डाळ आणि आंबेमोहराचा वाफाळता मऊ भात -खिचडी किंवा वरण नव्हे- त्यावर घरचं साजुक तुप आणि मीठ. सोबत ही कोशिंबीर. फारच वाटल्यास एखादा भाजलेला पापड. बस्स, पावसाळी रविवार दुपारच्या गर्द डुलकीसाठी एवढा ऐवज पुरेसा आहे. माझ्यासाठि तरी 
खरं म्हणजे लहानपणी पडवळ अजिबात नावडता होता माझा. नंतर मेसमधे जेवायचो तिथे तर ती लाडकी भाजी असल्यासारखी आठवड्यातून किमान दोनदा पानाला असायचीच. त्यामुळे आणखीच मनातून उतरली. पण लग्नानंतर नव-याबरोबरच स्वैपाकही गळ्यातच पडला म्हणल्यावर एकेक करून सगळ्या भाज्या एक्स्प्लोअर करायला घेतल्या. त्यात पीठ पेरलेला पडवळ जमला आणि वरचेवर व्हायला लागला. नंतर 'त्रिपदी'त गोनीदांनी वालाची डाळ घालून रेसिपी सांगितल्यावर तेही व्हर्जन खूप आवडलं. कधी नव्हे ते वालाची डाळही त्यासाठीच पहिल्यांदा आणली आणि ती तेव्हा सिंहगड रस्त्यावर कुठेही मिळाली नव्हती, ग्राहक पेठच (
पेठेबद्दल लिहावं लागणारे एकदा. मनाजवळ आहे!) गाठावी लागली. काय काय असोसिएशन्स असतात तरी!
ही कोशिंबीर कुठं खाल्ली, वाचली ते आठवत नाही, पण केल्यासरशी एका झटक्यात आवडली आणि केली जायला लागली. अशा त-हेने पूर्ण नावडती भाजी आवडती झाली एवढं खरं.
No comments:
Post a Comment