म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, November 16, 2019

 ड्रायव्हरकाकांचा प्रवाशांना घेऊन एसटीचा प्रवास सुरु आहे. अकलुजच्या घोडेबाजारात अचानक मिळालेली धुळीत लोळलेली एसटी बसची खरीखुरी पाटी ही ह्या दिवाळीतली सर्वात मोठी गंमत आहे. पाटीवरच्या 'अकलुज इंदापूर पुणे' आणि 'पुणे इंदापूर अकलुज' ह्या दोन्ही बाजू व्यवस्थित शाबूत आहेत. अनेक दिवस जमवत आणलेली खरीखुरी तिकीटेसुद्धा आहेत. ड्रायव्हर काकांनी आधीच कधी तरी स्वतःच रेखाटलेला एसटीचा लोगोही त्यानिमित्ताने शोधून बाहेर काढला गेला. वाहक मागे तिकिटे देत आहे.

चला, बसा, निघू या! टीण टीण!!






Tuesday, November 12, 2019

 असंही पर्यटन

एरवी वेळेची फार टंचाई असते असं नाही, पण ठरवलेल्या वेळापत्रकातली मधलीअधली कामं रद्द झाली किंवा लवकर संपली, तर तो मिळालेला वेळ लॉटरीसारखा वाटतो. घरी असाल तर लोळायला, बाहेर असाल तर निर्हेतुक भटकायला निमित्त. पुण्यात तर ही दुग्धशर्करा पर्वणी. त्यामुळे शुक्रवारी ही पर्वणी ऐन उन्हाची वेळ असूनही साधली. अचानक दीडेक तासाचा वेळ हाताशी आयता सापडला. जेमतेम तीनेक किमीच अंतर, पण रमतगमत, रद्दीच्या दुकानात रेंंगाळत, बुचाचं आजवर लपून राहिलेलं झाड शोधून फुलं वेचत, रोजच्या जाययायच्या वाटांवर वर्षभरात झालेले बदल टिपत, नव्यानं उगम पावलेल्या कशाकशांचे फोटो काढत सुशेगाद फिरत सत्कारणी लावलं.
बादशाहीतला नाश्ता ते नुतनीकरणासाठी बंद असल्यामुळे हुकला. मग कल्पना गाठलं. तिथून ठरवून वाट वाकडी करून खूप दिवसांनी 'कलाश्री'ला बाहेरून नमस्कार पावता केला. बरं वाटलं. सेनादत्त पेठेतच आतल्या शांत गल्लीत सुवासानं हाका मारणारं बुचाचं झाड दिसलं. तो एक खजिना गोळा केला. पुढच्या कोप-यावरच्या रद्दीच्या दुकानात जुन्या मुखपृष्ठाचं पडघवली मिळालं. माझ्याकडे आधीच आहे, पण हेही होईल कुणाला वाचायला द्यायला म्हणून उचललं. सत्संग सोसायटीच्या अलिकडे दोन चकचकीत नवे बंगले झालेले दिसताहेत. छान आहेत. अभिनव सोसायटीच्या दोन रोहाऊसेसना नवी नावं दिसली. वैकुंठातल्या आतल्या रस्त्यानं एस एम जोशी पुलावर निघायचं होतं खरंतर. अद्याप एकदाही वैकुंठच्या कमानीतून आत गेलेले नाही मी. पण कुणाची तरी महायात्रा नुकतीच पोहोचत होती, म्हणून वळसा घेऊन निवा-याकडून पुलावर आले. तर तिकडे सुबक ठळक चित्ररुप पुणे दर्शन घडलं. सगळी चित्रे चांगली काढली आहेत. अजून पाहिली नसतील तर जाऊन पाहून या एकदा मुद्दाम. कर्वे रस्त्यावर मेट्रोचं काम कुठवर आलं ते पाहिलं, वेगात आहे प्रगती. अर्थात, आता त्या गर्दीचा भाग नसताना फक्त अलिप्तपणेच असं म्हणणं सोपंय. तसंच पुढे सरकत प्रभात आणि भांडारकर रस्तेही पालथे घालायचे होते, पण सूर्य मी म्हणायला लागल्यावर इथवर पोचून भटकंती आटोपती घ्यावी लागली. मात्र एवढ्यानंही ऑक्सिजन टँक्स रिफील केल्यासारखी तरतरी आली एकदम.
हे असं शंख करत भटकणं पूर्वीही अनेकदा केलंय. केव्हाही कधीही वाटलं की उठायचं आणि सुटायचं. काही ठरवायचं नाही. भारी मजा येते. अशा पद्धतीनं पुण्याच्या हवेतच घाईगडबड भरलेली आहे, वगैरे प्रवादांना झकासपैकी खोटं ठरवता येतं. पुणंच असं नाही, कोणत्याही गावात, शहरात, खरंतर. तर अनपेक्षितपणे असा एखाददुसरा तास हातात मोकळा सापडतो आणि त्याचा सदुपयोग करण्याची बुद्धी सुचते, तेव्हा स्वतःची पाठ थोपटून घ्यावीशी वाटते.




Monday, November 4, 2019

 दोन मालिका बघणं चालू आहे सध्या. कलर्स मराठीवर स्वामिनी आणि युट्युबवर प्रपंच. प्रपंच लेकालाही प्रचंड आवडतेय. त्यामुळे पूर्वी घेतलेला आनंद द्विगुणित होतोय. खरोखर एव्हरग्रीन मालिका.

स्वामिनीतल्या ब-याच बाबी आवडतायत. ब-याच खटकतायतही. पण १००% बिनचूक असणार नाही, ही तयारी ठेवूनच बघायला घेतलीये. पात्रयोजनेसाठी उत्तम गुण द्यावे लागतील. पेशवाईत मुळातच भरपूर घडामोडी असूनही टिपीकल मालिकी राजकारण इथेही आणलंच आहे. पण अरुणा जोगळेकरांच्या चांगल्या संवादांमुळे सुसह्य होतंय.
आज नानासाहेब आणि सदाशिवरावांमध्ये झालेला छोटासा संवाद अर्थपूर्ण होता. पेशव्यांचा आवाका आणि भाऊंची तत्वनिष्ठता अधोरेखित करणारा. वेगवेगळ्या पुस्तकांमधून नानासाहेब पेशव्यांचं जे व्यक्तीचित्र उमटलंय, त्यापेक्षा ही व्यक्तीरेखा उजवी होतेय. गोपिकाबाई मात्र शक्य होईल तितक्या गडद दाखवतायत. हेमासपशेलवैम.
बादवे, पेशवाईत (खरोखरचे) चमचे महाराष्ट्रात पोचले होते का?

 पाऊस कसाही, केव्हाही, कितीही इतका प्रचंड आवडतो, पण यंदा त्यानं अगदी तोंडघशी पाडलंय

😓😢😩😭
त्यामुळे सगळ्या वैतागवाण्या पोस्ट्स वाचताना भयंकर वांड, खोड्या करणाऱ्या पोराच्या आईला शेजारीपाजारी तक्रारी घेऊन आल्यावर कसं वाटत असेल, तसं वाटतंय😱 कुणाला काही बोलता येत नाही आणि धपाटे घालायला पोरगं हातात गावत नाही😷😰😨😩