म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, April 5, 2020

 मला 'बालपणीच्या आठवणी' या उपक्रमात टॕग करणाऱ्या Irshad Bagwan यांचे आभार.

दोन अडीच वर्षांचीच असेन. तसा हा वयोगट कुणी आवर्जून सांगितलेला नाही मला, पण एकंदर घटना बघता माझा मीच हा अंदाज लावून घेतलाय.
माझ्या बहुतेक आठवणींमधून जो प्रकर्षाने डोकावतोच, तो आमच्या घराच्या पिछाडीचा मुसलमान मोहल्ला. तसा परिसर अठरा पगडींचा, आम्ही धरून तीन बामणघरं, परीट, सोनार, शिंपी, ओतारी, सुतार, चार पाच मराठा उंबरे पण सगळ्यात मुस्लिमांची घरं एकदोन जास्त. त्यातली टिनवाले, बागवान, शेख वगैरे कुटुंबं आमच्या इमारतीच्या जरा जवळपास. आमची तीन मजली इमारत मुख्य रस्त्यावर, रस्त्याकडेच तोंड करून. तर बरोबर मागची ही मधे दहा फुट अंतराची गल्ली एकमेकांकडे तोंडं असलेल्या, रेल्वेच्या डब्यांसारखी सरळसोट, पाठोपाठ खोल्या असलेल्या सलग लांबट बैठ्या घरांची. मुख्य रस्ता खूप वाहतुकीचा, मग खेळ अपरिहार्यपणे मागच्याच गल्लीत. आम्ही गल्लीत कुठेही खेळत असलो तरी आमच्या तिस-या मजल्यावरून सहज दिसणार. शिवाय गल्लीत सर्वांशी गोडी. त्यामुळे आम्ही कुठेही खेळत असलो तरी घरात तशी काळजी नसे.
ही सरळसोट घरं लपाछपी आणि पकडापकडी खेळायला इतकी सोयीची असायची की कळायला लागेपर्यंत हेच खेळ मुख्य खेळलो आम्ही. गल्लीत मुलं रग्गड. सगळ्या घरांमधून पोरांची दिवसरात्र हीच पळापळी चालू. कोणत्या घरांमधे काय चाललंय, वेळकाळ ह्या कशाचाही मुलाहिजा नसे पोरांना. मोठी लोकं कधीमधी उगीच म्हणून कावत करवादत, पण तेवढंच. त्याहून पुढं काही नाही. त्यामुळं खेळणं अबाधितच. तेव्हा लोकांकडे अद्भुत सहनशीलता होती, असं आता उठसूठ पोरांवर तिरमिरणा-या शेजा-यांकडे बघितलं की जाणवतं.
एकदा अशीच पळापळ-कम-पकडापकड चालू असणार. टिनवाल्यांच्यात सगळे जेवायला बसले होते. मधे अन्नपदार्थांची भांडी घेऊन भोवतीनं घरची मंडळी गोल करून जेवत होती. ते खूप माणसांचं एकत्र कुटुंब होतं, सासवा सुना पुढेमागे बाळंत व्हायच्या त्यांच्यात. तर त्या सगळ्या जेवणा-यांच्याही भोवतीनं कधी कडेनं, कधी मधून जमेल तशा आणि तेवढ्या ढांगा टाकत आमचा खेळ चालूच. अशी कसरत करता करताच माझा तोल गेला असावा आणि मी पडले थेट आमटीच्या पातेल्यात! अरारारा, आता कल्पनाही करवत नाही त्या दृश्याची. काय ध्यान झालं असेल माझं, ती आमटीही वाया, जेवणा-यांचा पचका, माझी रडारड, वरून घरातून पळत आले असतील सगळे, मला शांत करून धुऊन काढायची गडबड, नुसता गोंधळ माजला असणार तेव्हा तिथे. बास, तेव्हापासून मला घरात चिडवणं सुरू झालं ते लग्न झाल्यानंतरही बराच काळ सुरूच होतं😊 त्यात आम्ही पडलो शाकाहारी आणि ती आमटी जरी शाकाहारीच होती तरी मांसाहा-यांच्या घरातली. अशी गंमतच गंमत. आता त्या आमटीच्या पातेल्यात पडले म्हणजे दोन अडीचपेक्षा मोठी नसेन. आणि सगळे एवढे लहान होतो म्हणूनच मोठी आमचा इतका दंगा खपवून घेत असणार नक्कीच. आणि ही आठवण घरातले लोक ज्याप्रकारे चिडवत सांगायचे, त्यावरून ही पडापडी झाल्यानंतर आरडेओरडे, भांडणंही काही झाली नसावीत. कारण नंतरही आमचं सगळ्यांचं एकत्र खेळणं कित्येक वर्षांनंतर मी कोल्हापुरातून बाहेर पडेतोवर चालूच होतं.
ही धमाल आठवण मला त्यावेळच्या सामाजिक सलोख्याची, मानसिक निश्चिंततेची, सार्वजनिक विश्वासाची, आमची निरागसता जपू दिलेल्या आमच्या सगळ्यांच्या बालपणाची साक्ष देते. त्यामुळे माझ्यासाठी खास आहे.
सई कोडोलीकर.
०५ - ०४ - २०२०.

No comments:

Post a Comment