म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, August 25, 2020

 आंघोळीचा सदैव कंटाळा करणा-या एका मुलाशी आंघोळीपूर्वी हमखास होणारा सहज संवाद -

मी: फटके देऊ का?
नील: नको देऊस.
मी: का रे गधड्या!
नील: मग असं विचारल्यावर कोण हो म्हणणार आहे तुला?

Saturday, August 22, 2020

 रिअॅलिटी शोजचा भयंकर कंटाळा येतो, त्यात गाण्यांचे तर आणखीनच नकोसे. पण आज चक्क एक नवीन कार्यक्रम पूर्ण बघितला आणि रंगून जाऊन. सोनी मराठीवरचा सिंगिंग स्टार. आजचा भाग उत्तम होता.

अभिनेता/अभिनेत्री आणि मेंटॉर गायक/ गायिका अशी थीम आहे, त्या जोड्या चांगल्या निवडल्यात. कुणाकुणाचे किंचीत डावे उजवे धरूनही एकजात सगळे सुरेख गायले आणि दिसलेही. आरती वडगबाळकर, यशोमान आपटे ही प्लेझंट सरप्राईजेस तर हर्षवर्धन वावरे चिक! 'आईच्या हातचं'च्या आरतीच्या एपिसोडमध्ये 'मुझे जां न कहो मेरी जां' गाताना आरतीपेक्षा तिची आई भाव खाऊन जाते, पण इथे आरतीनं आ वासवला. दिसलीही भलतीच गोड, नाहीतर एरवी तिला खरंच गबाळी बघितलीये. तारसप्तकात जरा आवाज चोरते, पण प्रॉमिसिंग वाटतेय. त्यागराज-अमृता बंधू भगिनी खूप गॅपनंतर दिसले. अजय पूरकर एकदम जोमदार.
परिक्षक म्हणून प्रशांत दामले, बेला शेंडे आणि सलिल कुलकर्णी आहेत. हे सगळेजण आवडतात. शिवाय नेहमीच्या ओळखीतला गुणी वाद्यवृंद आहे. सूत्रसंचालन ऋता दुर्गुळे करतेय. एकंदर वावर कंट्रोल्ड असतो तिचा. प्रसन्न दिसते आणि मुख्य म्हणजे तिचा टोन सुसह्य आहे. एक्साईट होऊन बोलली तरी कोकलल्यासारखं इरीटेटींग होत नाही.
सोनी मराठीवर शुक्र-शनि रात्री नऊ वाजता असणार आहे. खरंतर नॅशनलच्या गुल गुलशन गुलफामसाठी मुद्दाम टीव्हीसमोर जाऊन बसले होते. पण इकडेतिकडे बागडताना अचानक संकर्षण गाताना दिसला, उत्सुकतेनं थांबले आणि हेच ऐकत बघत बसले. दिवसभर कचकावून काम केल्याचा सगळा शिणवटा गेला. लक्षात रहाण्याचा उल्हास आहे, त्यामुळे नियमित बघणं होईल की नाही कोण जाणे, पण आजचा भाग आवडला.

Tuesday, August 18, 2020

Friday, August 7, 2020

 चिमखडी अंबाबाई. ही मुख्य देवळाच्या दक्षिण पायरीशीच आहे अगदी. पुजा-यांनी केवढी मनापासून सजवली आहे.



Thursday, August 6, 2020

 #आपलीआवड #कोनाड्यातसरकलेलीगाणी

गाणे ३ 'तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे'

आज सुरेश वाडकरांचा वाढदिवस आहे. हा भाग पोस्ट करायला दोन दिवस उशीर झाला, त्याबद्दल दिलगीर आहे. आजचं औचित्य म्हणून वाडकरांचं आपली आवडमध्ये वाजणारं हे माझं आवडतं गाणं अनेक गाण्यांच्या यादीतून वर ओढून घेतलं. 

प्रभाकर जोगांनी संगीतकार म्हणून मोजकं पण फारच दर्जेदार काम करून ठेवलंय. यशवंत देवांनी लिहिलेलं हे गाणं त्यांनी अत्यंत सुरेख स्वरांनी बद्ध केलंय आणि वाडकरांनी तितकंच सुरेख गायलंयही. ह्याच त्रिकुटाचं 'कोटी कोटी रुपे तुझी'सुद्धा असंच अप्रतिम. शेवटचं कडवं टिपेला नेऊन गाणंही उंचीवर न्यायची ही शैली मला विशेष आवडते, जी ह्या दोन्ही गाण्यांमध्ये ठळक दिसते. जोगांचं नसलेलं पण असंच उंचावर जाणारं चटकन आठवणारं, आपली आवडचं आणखी एक फ्रिक्वेंट गाणं म्हणजे 'ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा' हे वाडकरांचंच द्वंद्वगीत. ते विश्वनाथ मोरेंचं आणि चित्रपट गीत आहे.

वाडकरांचा आवाज माझ्या स्वत:च्या पहिल्या काही स्वतंत्र आवडींपैकी एक आवाज. असं म्हणायचं कारण म्हणजे शालेय वयात आवडणा-या आवाजांपैकी बहुतेक सगळे आवाज ह्या आईबाबांच्या प्रभावाखालच्या आवडी होत्या. जी सगळ्यांच्याच बाबतीत कॉमन बाब आहे. पण आधी मराठी चित्रपटगीतं, मुबलक भाव-भक्तीगीतं, नंतर हिंदी चित्रपट गीतं ह्यातून हा आवाज आईबाबांपेक्षा वेगळा असा वारंवार ऐकला गेला. मग मुलायम, रम्य आणि टिपेला भारदस्त होणा-या ह्या आवाजाच्या प्रेमात पडत गेले. अजूनही हे प्रेम आहेच. ह्यात विशेष उल्लेख होतील ते 'पाहिले न मी तुला', उषा मंगेशकरांबरोबरचं 'शाम रंगीन हूई है', अनुराधा पौडवालांबरोबरचं 'तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला', आकाशवाणी कायमच वाजवत असलेलं पण फार नंतर सारेगमपमध्ये गाऊन प्रथमेश लघाटेनं खूप लोकप्रिय केलेलं 'काळ देहासी आला खाऊ', आणि ऐकण्यासाठी प्रचंड रोमॅंटिक असलेलं मला तरी लता सरस की वाडकर हे न ठरवता आलेलं 'हुस्न पहाडों का'! हे मी आजही सतत ऐकते❤️ उदाहरणादाखल बरीच गाणी देता येतील, पण जंत्री हा उद्देश नाही.

वाडकरांच्या गाण्याला आणि आवाजाला एक विशिष्ट अप्परक्लास आहे. म्हणजे काय ते मला उलगडून सांगता येणार नाही, ती माझी मर्यादा. मग तो क्लास इतरांच्या गाण्याला किंवा आवाजाला नसतो का, तर तसंही म्हणता येणार नाही. तुलना जशी कुणाचीच कुणाशी होऊ शकत नाही, त्याच प्रकारे प्रत्येकाचा क्लास/स्तरही वेगळा असतोच असतो. वाडकर, रविंद्र साठे, हरीहरन, हे एका क्लासमध्ये बसणारे आहेत सगळे. मजबूत, भक्कम बैठक आणि स्वतंत्र, देखणी शैली असलेले. ह्या लोकांकडे गाणं/शब्द नेताना संगीतकार लोक नीट विचार करून जात असतील असं वाटतं.

(हे विचित्र चित्र कोणत्या महाभागानं का डकवलं असेल ह्या सुंदर गाण्याला! काहीतरी संबंध आहे का ह्या आणि गाण्यात उल्लेख असलेल्या लोचनांचा? अगदी शोधून असंबद्ध डोळे लावलेत. डोळेच, लोचन नाहीयेत ते!) 

जाऊ द्या, गाणं ऐका😊

https://www.youtube.com/watch?v=W4tqMOBo2XQ

 दुथडी भरून वाहणारी लाडकी पंचगंगा.

जुलै २०१९ महापुराच्या आधीच्या आठवड्यातला फोटो.


Wednesday, August 5, 2020

 नरसोबा, श्री क्षेत्र सांगवडे, ता. करवीर.



Sunday, August 2, 2020

 हिरव्या साडीवरची सुबक नक्षी. हुपरी रस्त्यावर कुठेतरी.



 नरसोबा वाडी जुलै २०१९



Saturday, August 1, 2020

 #आपलीआवड #कोनाड्यातसरकलेलीगाणी

गाणे २ 'मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटूनी आला'
'एक होता विदूषक' खूप नंतर उशिरा केव्हातरी बघितला. त्याची गाणी अर्थातच पहिल्यांदा रेडिओवर, दर्दी श्रोत्यांच्या फर्माईशींमुळे आपली आवडमध्येच ऐकली. तेव्हा काही ती तितकीशी समजली नव्हती, कारण वय आणि अक्कल दोन्हींचा आनंद होता. (आताही वयाचाच आनंद फक्त, अक्कलेबद्दल शांतम् पापम्!) पण आनंद मोडकांची गाणी रेहमानच्या गाण्यांसारखीच सहसा पहिल्या भेटीत गळ्यात पडत नाहीत. त्यांचा अनुनय करावा लागतो. मग ती हळूहळू भिनत, यथावकाश मनात पर्मनंटली फतकल मारून बसतात. रेहमानबद्दलचा साक्षात्कार अनुक्रमात केव्हाही मोडकांच्या नंतरचा आहे. पण चाकोरीबाह्य ही जातकुळी दोघांची एकच.
खरं म्हणजे श्रावण सुरू आहे, त्यामुळे 'श्रावणातल्या न झेपणा-या ऊन्हाचं' 'भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं' घ्यावं की काय, अशी द्विधा झाली होती. पण मग श्रावण म्हटलं की आशा-अरुण दातेंच्या 'सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा' मधल्या 'हास हास लाडक्या, श्रावणातल्या ऊन्हा'चीही हटकून आठवण येतेच. तेही आपली आवडमुळेच माहिती. झालंच तर श्रावणाची नेहमीची यशस्वी गीतं तर आहेतच. लतापासून पद्मजा फेणाणींपर्यंत. त्यामुळे श्रावण हा निकष माझा मलाच फारसा अपील झाला नाही.
ह्या अंगाईगीताची जागा मात्र अढळ आहे. 'नीज माझ्या नंदलाला'इतकीच. पोटात कालवतं ऐकताना. मुखड्यात डोकावणारा खर्ज दाटलेला कंठ खरोखर दाखवतो. चित्रपटातल्या बाकीच्या गाण्यांच्या तुलनेत धोधो महानोरांचे शब्द इथे मवाळ, सायीसारखे आहेत. गाता गाता 'शहाणा हो, मोठा हो' सांगताना आयुष्यानं शिकवलेलं शहाणपण लेकराला सुपूर्द करत फिलॉसॉफी, आशावाद, ईश्वराला प्रार्थना हे सगळं कव्हर केलंय. आणि हे सगळं मी वापरलेत, त्याहून निम्म्या शब्दांत, सुरेख लयीत. आशापेक्षा रविंद्र साठेंचं व्हर्जन जबरदस्त इंपॅक्टींग आहे. साठेंच्या आवाजात भारदस्तपणाबरोबरच मायेचा पोत आहे, तो स्पष्ट जाणवतो. त्यासाठी मोडक जिंदाबाद. पडद्यावर लक्ष्याला ही अंगाई गाताना बघणं फार भावणारं आहे. (लक्ष्याला अहोजाहो करणं कृत्रिम वाटतं, इतका तो आपलाच आहे) मधू कांबीकरसुद्धा खूप आवडतात, पण अशा भुमिकेतला लक्ष्या मुळात दुर्लभ. त्याविषयी, ह्या चित्रपटाविषयी किंवा त्या सगळ्या संदर्भातच काही नवं बोलण्यासारखं माझ्यापाशी नाही. ही जी खाली शेअर केलेली क्लिप आहे, त्यात साठेंना ती अंगाई तन्मयतेनं, हळूवारपणे गाताना बघणं, हाही खास अनुभव आहे. ही अंगाई ऐकताना जे पोटात कालवणं ते 'आज कल मैं ढल गया, दिन हुआ तमाम'च्या सुरावटींच्या जातकुळीतलं.
इतकं लक्ष देऊन मी हल्ली काहीच फार ऐकत नाही, असं काहीसं वाटून गेलं. हा रेडिओ महिमा आहे. आपण बारकं असताना टीपी/अभ्यास/कामं करता करता कान बारकाईनं किती टिपत असतात. ते नकळत ऐकलेलं असं नंतर एकेक लक्षात येत रहातं.
https://www.youtube.com/watch?v=xTtuekFfdsM