रिअॅलिटी शोजचा भयंकर कंटाळा येतो, त्यात गाण्यांचे तर आणखीनच नकोसे. पण आज चक्क एक नवीन कार्यक्रम पूर्ण बघितला आणि रंगून जाऊन. सोनी मराठीवरचा सिंगिंग स्टार. आजचा भाग उत्तम होता.
अभिनेता/अभिनेत्री आणि मेंटॉर गायक/ गायिका अशी थीम आहे, त्या जोड्या चांगल्या निवडल्यात. कुणाकुणाचे किंचीत डावे उजवे धरूनही एकजात सगळे सुरेख गायले आणि दिसलेही. आरती वडगबाळकर, यशोमान आपटे ही प्लेझंट सरप्राईजेस तर हर्षवर्धन वावरे चिक! 'आईच्या हातचं'च्या आरतीच्या एपिसोडमध्ये 'मुझे जां न कहो मेरी जां' गाताना आरतीपेक्षा तिची आई भाव खाऊन जाते, पण इथे आरतीनं आ वासवला. दिसलीही भलतीच गोड, नाहीतर एरवी तिला खरंच गबाळी बघितलीये. तारसप्तकात जरा आवाज चोरते, पण प्रॉमिसिंग वाटतेय. त्यागराज-अमृता बंधू भगिनी खूप गॅपनंतर दिसले. अजय पूरकर एकदम जोमदार.
परिक्षक म्हणून प्रशांत दामले, बेला शेंडे आणि सलिल कुलकर्णी आहेत. हे सगळेजण आवडतात. शिवाय नेहमीच्या ओळखीतला गुणी वाद्यवृंद आहे. सूत्रसंचालन ऋता दुर्गुळे करतेय. एकंदर वावर कंट्रोल्ड असतो तिचा. प्रसन्न दिसते आणि मुख्य म्हणजे तिचा टोन सुसह्य आहे. एक्साईट होऊन बोलली तरी कोकलल्यासारखं इरीटेटींग होत नाही.
सोनी मराठीवर शुक्र-शनि रात्री नऊ वाजता असणार आहे. खरंतर नॅशनलच्या गुल गुलशन गुलफामसाठी मुद्दाम टीव्हीसमोर जाऊन बसले होते. पण इकडेतिकडे बागडताना अचानक संकर्षण गाताना दिसला, उत्सुकतेनं थांबले आणि हेच ऐकत बघत बसले. दिवसभर कचकावून काम केल्याचा सगळा शिणवटा गेला. लक्षात रहाण्याचा उल्हास आहे, त्यामुळे नियमित बघणं होईल की नाही कोण जाणे, पण आजचा भाग आवडला.
No comments:
Post a Comment