म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, December 15, 2020

 जीवेत् शरद: शतम् उषाताई

🌹
अतिशय गुणवंत गायिका, गुणवंत चित्रकार, गुणवंत निर्मात्या आणि मितभाषी प्रसिद्धी पराङ्मुख व्यक्तिमत्त्व असणाऱ्या उषाताईंना केवळ लावणी आणि मुंगळा ही मुख्य ओळख मिळाली आहे. ती कमी महत्त्वाची नसली तरी त्यांची लावणीव्यतिरिक्तची गाणीसुद्धा तेवढीच उल्लेखनीय आहेत. मीना खडीकर, मानस मुखर्जी, श्रीनिवास खळे, विश्वनाथ मोरे अशांसारख्या काही संगितकारांनी त्यांना जी इतर गाणी दिली, ती अगदी कस पाहणारी आहेत आणि उषाताईंनी त्यांचं खणखणीत सोनं केलं आहे. क्वचित जैत रे जैत वगळता पं. मंगेशकरांनी उषाताईंबाबत हात अगदीच आखडता घेतला आहे. तरी उषाताई आनंदी असतात. खरंतर त्यांनाही रडगाणी गाण्याची, तक्रारींची केवढी संधी, पण वृत्ती प्रसन्न, प्रेमळ आणि हसरी. वाट्याला आलेलं सगळं उत्कृष्ट डिलिव्हर करायचं, एवढंच ध्येय. मग ती राम कदमांची लावणी असो, दादा कोंडकेंची अवखळ दंगेखोर गाणी असोत, खळ्यांचं मंजुळ भावगीत असो की भावाच्या अल्बमसाठी केलेलं गालिबचं पोर्ट्रेट. बाकी मी बरी आणि माझं घर बरं. अशी माणसं मग विशेष आवडतात.
आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी, वेळ झाली भर माध्यान्ह, थांब रे घना, पालखी हाले डोले, माझी रेणुका माऊली, झाल्या तिन्हिसांजा, त्या तुझिया चिंतनात, केळीचे सुकले बाग, सख्या चला बागामधी, ना ना ना ना नाही नाही नाही रे, अशी काही अत्यंत आवडती गाणी आहेत.
त्यापैकी 'आता लावा लावा शीळा आम्ही जातो देवाघरा, मोक्षद्वार हे विवर, मुक्ते आसू तू आवर' हे सर्वात आवडतं आहे. आवडतं म्हणणं ही आयरनी आहे खरंतर. त्यातले शब्द ऐकताना पोटात तुटतं आणि ते आर्त वातावरण थोडंफार डोळ्यांपुढे उभं राहतं. (नुकताच माऊलींचा संजीवन समाधी दिन झाला.)

Saturday, December 12, 2020

 #आपलंनेहमीचंच

सकाळसाठी गाजर मटार उपमा आणि आल्याचा चहा.
दुपारसाठी फक्त मीठमीरपूड भुरभुरलेली कोबीची पचडी, भरल्या वांग्याचा कालवलेला मसाला, भरलं वांगं, तुपगुळपोळीसुक्यामेव्याचा चुरा, पोळी आणि ताक.




 पतंगाच्या निमित्ताने बिळातून थोडी तरी बाहेर पडलेली पोरं.

नील जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो. बहुतेक पालकवर्ग श्रमजीवी आहे. सगळेच स्मार्टफोनवाले नाहीत, त्यामुळे ऑनलाईन वर्ग वगैरे नाहीत. एका इयत्तेत जेमतेम २०-२२ विद्यार्थी, मग शिक्षक अधेमधे प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन हालहवाल घेतायत. शासनाकडून दर तिमाहीचं एक सर्व विषय सामाईक केलेलं पुस्तक येतंय ते (ओझं कमी करण्याचा एक चांगला प्रयत्न) आणि दर महिन्याला पोषण आहाराचा शिधाही न चुकता येतो, तो आम्ही पालक घेऊन येतो. दर आठवड्याला अभ्यास पीडीएफ्स आणि शिक्षकांनी सहामाहीसाठी हाताने लिहिलेल्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सप ग्रुपवर येतात. मुलं त्यांच्या सोयीसवडीनं गृहपाठ करून आणि पेपर्स सोडवून ते फोटो शिक्षकांना पाठवतात. मुलं अक्षरशः आसुसलेली आहेत शाळेत जाण्यासाठी. अगदी शिक्षकांचं ओरडणं खाण्यासाठीसुद्धा! आमच्या शाळेत मुलांना ओरडतात शिक्षक आणि आम्ही कुणीही त्यांना त्याबद्दल विचारायला जात नाही. पीटीए असते अधेमधे (मार्चपुर्वीचं सांगतेय) पण त्यात पालकांना मुलांची कौतुकं जास्त ऐकायला मिळतात. हे नक्की आपल्याच मुलाबद्दल बोलतायत ना ही खात्री करून घ्यावी लागते.
मध्यंतरी मुख्याध्यापकांना जरा काळजीच्या सुरात म्हणाले, 'सर, जरा मोबाईल, टीव्हीबद्दल काही तरी सांगा, आम्हाला दाद देत नाहीत.' सरांनी क्षणभर माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, 'यंदा फक्त सुखरूप रहायचं आहे. मुलांनी आणि आपण सगळ्यांनीच. अभ्यासाचाच नव्हे, कसलाही जाच करू नका त्याला. पुढच्या वर्षी बघू आम्ही काय करायचं ते. जे काही होतंय, व्हायचंय, ते जगभरातल्या मुलांचं होणारे, तुमच्या एकट्याच्या मुलाचं नाही. घरातून बाहेर पडायचं नाही, शाळा दिसत नाही, मित्र भेटत नाहीत, हुंदडता येत नाही, मैदानावर जायला मिळत नाही, करायचं काय त्यांनी?'
मुकाट्यानं मान डोलावून घरी परत आले. नशीब, त्यांच्या विद्यार्थ्यानं हे ऐकलं नाही. पण अशा कानपिचक्या मिळाल्या की भान येतं जरा आणि मग बरं वाटतं. घडोघडी विनाकारण असुरक्षितता बाळगायची सवय लागत चाललीये, ती झटकता येते. हा शिक्षकवर्ग मला ज्या प्रकारे आश्वस्त करत आलाय, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. डिसलेसरांच्या निमित्ताने ह्या दुर्लक्षित वर्गाकडे लक्ष वेधलं गेलं आहे हे खरंच चांगलं घडलंय.









Tuesday, December 8, 2020

 लेखातले उपाय आपल्यासाठी फार अवघड आहेत, कारण हे काहीही आपल्या जनुकीय ओळखीचं नाही. पण तरीही थोडाफार प्रयत्न जमू शकेल. प्रत्येक भावी आणि सद्य पालकांनी, खरं म्हणजे प्रत्येक माणसाने हा लेख वाचायला पाहिजे. थोडा मोठा आहे पण अतिशय महत्त्वाचा आणि वाचनीय आहे. एस्किमोजबद्दलचं कुतुहल शाळेपासून आहे. असं अधेमधे काही तरी सापडल्यावर आणखी वाचायला हवं हे लक्षात येतं.

https://www.npr.org/sections/goatsandsoda/2019/03/13/685533353/a-playful-way-to-teach-kids-to-control-their-anger?fbclid=IwY2xjawREXWZleHRuA2FlbQIxMQBzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEeWjxk90LN_1E3B4JT7gwgTQ4sj4IWVLKd7Wsyrt5GC9Jcr4Dfcq1oy19hNN8_aem_jrXgWoaJPAg76RlpIyiLNg

Friday, December 4, 2020

 #हिवाळा #रंग #भरपूरभाज्या #ताजीभाजी #मंडई

पुदिना चटणी, मुळागाजरमटारमसुरमुगडाळ पचडी, पोकळ्याचं गरगटं, ताक, भाजलेले शेंगदाणे, भाकरी, लोणी.
नाश्त्याच्या इडलीतही होता होईतो केलेली ढकलाढकली.