'कोल्हापुरातील वर्तमानपत्र' ह्या पोस्टवरुन पेपर टाकणा-या शिखरेकाकांची आठवण येणार नाही, तो कोल्हापूरकर विरळा.
संघाचे कार्यकर्ते आणि पंचगंगा बॅंकेचे एक संचालक असलेले बाळकृष्ण शिखरे हे नाव बहुतेकांना सुपरिचित आहे. दोनेकशे घरांमध्ये पन्नास वर्षे रोजचं वर्तमानपत्र टाकण्याचा व्यवसाय केल्यावर त्यांनी निवृत्ती घेतली. आमचा आणि त्यांचा जुना घरोबा आहे. सगळ्या कोल्हापुराशी ओळख असणाऱ्या ह्या व्यक्तिमत्त्वाचा आवाज आज वय वर्षे ९२ चालू असतानाही दणदणीत आहे. उमेदीत केलेला सपाटून व्यायाम आणि आयुष्यभर चालवलेल्या सायकलमुळे आजही काका उत्तमपैकी तब्येत राखून आहेत. फिक्या रंगाचे कॉलरचे सदरे, सहसा पांढरा पायजमा (पूर्वी क्वचित दुटांगी धोतर पण नेसायचे) आणि डोक्यावर संघाची टोपी असा साधा वेष. कपाळावर अष्टगंध. खांद्याला शबनम पिशवी. त्यात काहीतरी खाऊ. श्रीखंडाच्या गोळ्या, रावळगाव चॉकलेट्स, पॉपिन्स वगैरे. भेटायला गेल्यावर हे आजही मिळतं हातावर. पूर्वी सायकलवर फिरताना पायजम्याला हमखास क्लिप्स लावलेल्या असायच्या.
त्यांच्या आवाजाला लहान मुलं प्रचंड घाबरायची. प्रत्येक घरची पेपर येण्याची वेळ ठरलेली असायची. ती वेळ झाली की घरातली पोरंसोरं कपाटामागं, पलंगाखाली लपून बसायची. तुमच्या कुणाकुणाच्यासुद्धा अशा आठवणी असतील. माझ्या मुलाचा आवाज खूप मोठा आहे. तो तान्हा असताना काका एकदा मुक्कामी पुण्यात होते. दिवसभरात बराच वेळ त्याला मांडीवर घेऊन बसले. आता आम्ही त्याला म्हणतो, काकांच्या आशिर्वादाने तुझा आवाज खणखणीत आहे.
भल्या पहाटे काकांचा दिवस सुरू व्हायचा आणि सगळे पेपर्स बहुतेक सकाळी दहापर्यंत टाकून संपवायचे. अधेमधे कुणाकुणाच्या घरी आग्रहास्तव टेकत दोन घोट चहा घ्यायचा. आमचे वडील आणि काही मंडळी फिरायला बाहेर पडली की साडेपाचच्या दरम्यान वांगी बोळातल्या गाडीवर ह्या काही ठराविक लोकांचा पहिला चहा एकत्र होणार आणि मग जो तो आपापल्या मार्गाला लागणार. कोणताही ऋतू असो, काकांच्या दिनक्रमात फरक व्हायचा नाही की कधी आजारपणाची सबब नाही. वर्तमानपत्राच्या सुट्टीचे वर्षातले चार-पाच दिवसच काय ती सुट्टी. पण त्याही दिवशी कुठेतरी भटकंतीचा बेत असणारच.
काकांना सिनेमे बघण्याचा खूप छंद होता आणि तो अजूनही चालू आहे. गंमत म्हणजे एखादा सिनेमा रद्दड आहे असं कुणी सांगितलं की नेमकं काय रद्दड ते बघायला जायचं, पण सिनेमा बघायचाच. पूर्वी थिएटरला जाऊन बघायचे, आता घरी बसून बघतात हा काय तो फरक.
काहीही अडचण आली तरी चिंता करायची नाही, त्या समस्येचं कारण शोधून काढायचं. खळखळून हसायचं आणि हसवायचं असा त्यांचा स्वभाव. त्यांचा कुंडलीचासुद्धा उत्तम अभ्यास आहे. त्या आणि वर्तमानपत्राच्या निमित्ताने अफाट लोकसंग्रह आणि तितकाच अफाट अनुभव, असं हे संपन्न व्यक्तिमत्व. काकांना उदंड आयुष्य आणि निरामय आरोग्यासाठी दणदणीत शुभेच्छा.