म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, May 8, 2021

 मायलेकांची कडाक्याची जुंपलेली असताना 'तू जगातली सगळ्यात वाईट आणि दुष्ट आई आहेस', 'तुझ्यामुळे जगातल्या सगळ्या बायकांबद्दल माझं मत वाईट झालेलं आहे', 'ती बिरबलाची माकडीण एरवी तिच्या पोरांशी अशीच वागत असणार', अशा चढत्या भाजणीनं मुक्ताफळांचा शिग लागल्यावर तुमचा संयम एखाद्या क्षणी अगदी उतू जाऊन तुम्हाला फस्सकन हसू येत असेल तर तुम्ही खरोखरच दुष्ट आई आहात. शंकाच नको. अगदी 'माता न तू वैरीणी' कॅटेगरी तंतोतंत. तर ज्या ज्या घरी अशा मातीच्या चुली असतील त्या घरच्या समस्त आदरणीय मातोश्रीवर्गाला आज जरा विशेष सहानुभुतीपुर्वक शुभेच्छा.

बाकी नवपालकांना एक अनाहूत असला तरी आपुलकीचा सल्ला: पोरांना गोष्टी सांगताना एकदाचं लवकर झोपवणे, काही काळासाठी तरी कलकलीतून सुटका करून घेणे, घरादाराची दया येऊन शांतता प्रस्थापित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे, झालंच तर जाता जाता संस्कार का काय म्हणतात ते उरकणे असे उदात्त हेतू भले असू द्यावेत. पण त्या गोष्टींमधून वेचलेलं काहीही भविष्यात मोक्याच्या क्षणी आपल्यालाच नेम धरून फेकून मारलं जाऊ शकतं, ह्याची कायमस्वरूपी मानसिक तयारी असू द्यावी. डार्विनच्या कृपेनं किंवा अन्य संशोधनानं होईल तेव्हा होईल, आपल्याच कर्माची फळं मात्र आपलं माकड झालंय हे नक्की केव्हा ना केव्हा सिद्ध करतात.
हॅपी मदर्स डे! 🙈🙉🙊🐵

No comments:

Post a Comment