निव्वळ राजन ताम्हाणे, लीना भागवत, शरद पोंक्षे प्रभृतींपायी खूप दिवसांनी मालिका बघायला घेतली आहे, ज्यात आधीच भयंकर आनंदीआनंद आहे. पण ब्रेकमध्ये ओंकार गोवर्धनबरोबर मधुराणी प्रभुलकरला बघून त्रास खरा वाढतो. पार 'घो मला असला हवा'पासून विकेट घेतलेला हा बाबा दिवसेंदिवस आणखीन हॅंडसम दिसत चाललाय आणि जोडी अशी विजोड. भरीला चेह-याइतकेच मख्ख, बोजड आणि पोक्त संवाद. अगं मार की बये चार उड्या, बोलाव की त्याला एकेरी, मोड की चेह-याची इस्त्री, हास की खळखळून, हाण की जरा ऐसपैस गप्पा! पण आमच्याकडे चॅनल्सना असल्या सांस्कृतिक धक्कावाल्या कहानी में ट्विस्टचं भलतंच वावडं आहे. असलं काही दाखवलं तर टीआरपी रसातळाला जाईल नव्हे? हे म्हणे कॉलेज बॅचमेट्स, नेमके कोणत्या कोनातनं बॅचमेट्स दिसतात तेच जाणे. एकुणात काहीतरीच!
Monday, November 29, 2021
Thursday, November 18, 2021
कॉटन किंगचं नळ स्टॉपला एकच दुकान होतं त्यावेळेस त्यांची विमेन प्रॉडक्ट्स रेंज होती. माझ्याकडे एक नेव्ही ब्लू कॉड्रा हाफ स्लीव्ह्ड शर्ट आणि सुपरसॉफ्ट धाग्याचा पांढरा गोल गळ्याचा टी शर्ट होता. उत्कृष्ट दर्जा, उत्तम स्पर्श आणि आत्यंतिक कंफर्ट. शर्टचं फिटिंग परफेक्ट टक्समुळे अल्टिमेट होतं. हे कपडे खूप वर्षं वापरले. नेव्ही ब्लू हा रंग खरंतर फेड होणारा, पण तो किंचितही बदलला नाही की जुनाट वाटला नाही. व्यवसाय वाढवताना त्यांनी प्रथम ही विमेन रेंजच बंद केली.
Saturday, November 13, 2021
एसटीचा संप अपेक्षेपेक्षा लांबला आहे. काय आणि कसा तोडगा निघतोय, ह्याबद्दल उत्सुकता आहे. काय होतंय ह्याकडे सुरुवातीपासून आम्ही घरचे लक्ष ठेवून आहोत. मी कुणी अभ्यासक नाही, पण एसटीची अगदी नियमित प्रवासी आहे. त्यामुळे कर्मचारीवर्गाबद्दल सहानुभूती आहे. तुटपुंजे पगार आणि पुरेशा सोयी-सवलती नाहीत, भरती पुरेशी नसल्यामुळे सणावाराला दोन-तीन दिवस सलग प्रवास करावे लागतात. प्रवाशांच्या गैरसोयीची जाणीव आणि निलंबनाची भिती असूनही ऐन मौसमात हा संप त्यांनी सुरू ठेवला आहे. मात्र शासनाच्याही काही अडचणी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना सध्या असलेल्या इतर सुविधा समान हक्क न्यायानुसार सरसकट सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना देणे शासनाला परवडणारे नाही आणि डिपार्टमेंटवाईज नियम बदलले जात नसतात. ह्या सगळ्या पलिकडे खाजगीकरण करून हा लोण्याचा गोळा खायला टपलेले एसटीचे हितशत्रू आहेतच. पण एसटीचे खाजगीकरण सर्वसामान्यांसाठी कदापीही हिताचे होणार नाही. आज ज्याप्रमाणे एसटी खेडोपाडी, राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवासीसंख्येचा विचार न करता सेवेत असते, तशी सेवा खाजगीकरणानंतर उपलब्ध होणार नाही. एकंदर सर्व प्रकारच्या उलाढालींवर आणि सामाजिक प्रगतीवर ह्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, इतकी एसटी सेवा ग्रामीण भागात रोजच्या जीवनाशी निगडित आहे.
Wednesday, November 10, 2021
एतद्देशीय नाश्ता.