म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, December 31, 2022

 हा केवळ सेल्फी नाही. यात अतिशय व्यग्र वेळापत्रकातून निव्वळ मैत्री खात्यासाठी आवर्जून काढलेला मुबलक वेळ आहे, खूप धमाल आहे, मुरत गेलेली मैत्री आहे आणि यात मायबोली आहे.

आमची मैत्री मायबोलीपासून, मायबोलीमुळे झाली. वीसेक वर्षांपूर्वीच्या या ओळखी. ऑनलाईन ओळखी हा प्रकारच मुळात तसा नवा आणि दबकत केला जाणारा प्रकार होता तेव्हा. ती ओळख आणि मैत्री आता क्वचित अपवाद वगळता आमच्यामध्ये प्रत्येकाच्या घरांपर्यंत ऐसपैस पसरली आहे. प्रत्येकाच्या व्यापामुळे, प्राधान्यांमुळे आता माबोवर कुणी जस्ट डोकावतं, तर कुणाचा कनेक्ट संपलाच. या फोटोत आम्ही तिघेच दिसत असलो तरी माबोनं दिलेलं मैत्र मात्र मोठं आहे आणि अखंड आहे. आम्ही एकेकाळी माबोवर आणि माबोबाहेरही भरपूर बागडलेली जमात आहोत. माबोबद्दल मनापासून कृतज्ञता आहे.
ठरवून जिवाची मुंबई करताना सुरुवात एकटीनंच केली, पण मग सचिननं तब्बल चार दिवस बाजूला ठेवले आणि दिनेशही दोन दिवस जातीनं बरोबर फिरत होते. खुद्द मुंबईकर असल्यामुळे दोघांनीही हौसेनं, प्रेमानं मुंबई दाखवली. त्यात दिनेशना मी उंधियुबद्दल म्हणाले होते. मग त्यातली निम्मी तयारी कोल्हापूर दौऱ्यातून करून आणून निम्मी मुंबईत करून तोसुद्धा कार्यक्रम झाला. फिरताना काही टिपिकल ठिकाणांवरून टवाळी झाली, तर काही ऑफ बिट ठिकाणांसाठी वाट वाकडी करून तंगडतोड. काही पदार्थ आवर्जून चाखले, तर काही निव्वळ मुंबईत आहोत या फिलसाठी. हे सगळं करताना कंपनी मॅटर्स हे अनेकाव्यांदा पटलं. मुंबई अशी काही दिवसांत बघून व्हायची नाही. पण एका फेरीत एक टप्पा असं करत थोडी थोडी होत राहील.

Friday, December 30, 2022

 मुंबई दर्शनची हेरीटेज टूर देणारी ओपन डेक डबल डेकर सुर्यास्तावेळी सी लिंकवरून पास होताना वांद्रे किल्ल्यावरून मिळालेली क्लिक

Saturday, December 10, 2022

 सुलोचनाताईंना सादर श्रद्धांजली.

आपण काही लोकांना रोज आठवत बसत नाही, पण काही लोक आपल्या आयुष्यातल्या रुटीन तुकड्यांचे भाग असतात. आमच्या घरी जे सर्व प्रकारचं संगीत अखंड वाजत असायचं, त्यात सुलोचनाताईंच्या लावण्यासुद्धा वरचेवर असायच्या. मला, बहिणीला त्या खडाखड पाठ होत्या आणि यात काडीचीही अतिशयोक्ती नाही.
त्या एवढ्या सर्रास ऐकायचो, की एका वर्षी कॉलेजच्या गॅदरींगला कोणतं गाणं म्हणावं यावर घरात बोलताना बाबांनी मला अगदी गांभीर्यानं 'पाडाला पिकलाय आंबा' सुचवलं होतं. मी आ वासून बाबांकडे बघतच राहिले. मी, आणि लावणी? मी कसं असलं छचोर गाणं गाणार? (how judgmental! I know!) बाबा म्हणाले, 'असे भाव असलेलं गाणं ठसक्यात गाताना त्या डोक्यावरचा पदरही ढळू देत नाहीत, आणि तू कोण लागून गेलीस छचोर म्हणणारी? तो निव्वळ गाण्याचा एक प्रकार आहे. कॉलेजच्या मुलामुलींसमोर ठेका धरायला लावेल असं उडत्या चालीचंच गाणं पाहिजे, तिथं काय भावगीत आळवणारेस का! बघ तू, मुलंमुली १००% डोक्यावर घेतील आणि ते श्रेय सुलोचना चव्हाणांना असेल, तुला नाही.'
बाबांनी एवढं सांगूनही माझी काही धडगत झाली नाही ते गायची आणि ठरवलं असतं तरी तो गाण्याचा बाज मला जरासुद्धा जमला असता, असं मुळीच वाटत नाही. तेव्हा नाही, आजही नाही. बाकीचे प्रकार आपण निदान आपल्यापुरते गुणगुणतो तरी, लावणी इतक्या सहज हाताशी येत नाही. ती नुसत्या वृत्तीनं नव्हे, शास्त्रानंही नखरेल आहे.
गाण्याचा तो एक खरंच अतिशय कठीण प्रकार आहे. प्रचंड एनर्जी, शब्दांचे भाव, भाषेचा लहजा, गातानाचा अभिनय आणि गायनाचा दर्जा इतक्या बाबी अंमलात आणत गाण्याचं नेहमीचं बाकी तंत्र सांभाळायचं, ही तारेवरची कसरत आहे. ही कमाल साधत त्यांनी एवढ्या एकाहून एक लोकप्रिय लावण्या दिल्या, याबद्दल सुलोचना चव्हाणांना कडक सलाम आहे. त्यांचं विस्मरण नाही होणार कधी.


Saturday, December 3, 2022

 कसे खुशमिजाज लोक आहेत हे. अवघ्या काही मिनिटांत हे सेलिब्रेशन मी कितींदा बघितलं, बघतच बसलेय. एवढ्या काहीशा सेकंदांच्या लांबून बघितलेल्या नुसत्या बारक्या रीळानं मला प्रचंड प्रसन्न वाटलं, त्या सगळ्या उपस्थित लोकांना ह्यातून केवढी एनर्जी मिळत असेल! डोक्याला कितीही ताणवलं तरी मी असा गळा पूर्ण मोकळा सोडत सौम्यसाही दंगेखोरपणा उभ्या हयातीत कधी केलेला आठवत नाही, आणि हे सगळे, किंबहुना जवळपास हा सबंध समाज असा आनंद सोहळा हरेक शुभप्रसंगी करत असतील.

समारंभ, सणवार वगैरे प्रत्येक समाजानं आयुष्यातल्या चिंतांना थोडा वेळ बाजूला सरकवून विरंगुळे शोधण्यासाठी आपापल्या पद्धतीनं काढलेली निमित्तंच असतात, पण आपण तेही बऱ्यापैकी नेमस्तपणे, औपचारिकरीत्या, गांभीर्यानंच करतो. कोळी, आदिवासी वगैरे जनसमुहांचा अपवाद. हल्ली हल्ली आपल्याकडे संगीत असतं, तर त्यालाही फॅडं म्हणत काही प्रमाणात नाकं मुरडली जातात. आपणही स्वत:ला घरगुती पातळीवर आजुबाजूच्या परिसराला सोसवेलसं, कुणी आपली किती मापं काढेल हा विचारही जवळ फिरकू न देता आणि स्वतःही कटाक्षानं इतरांची मापं न काढता वकूबबिकूब भिरकावून जरा मोकळंढाकळं, सैल सोडू शकतो का! पण ते जमायला आधी पिंडात असावं लागत असेल, जे नसण्याची शक्यता अधिक.
भारीच देखणे लोक आहेत हे.
कारण आनंदी आहेत.
नाही, आवर्जून रहातात!
https://www.facebook.com/reel/935046627401333

Thursday, December 1, 2022

मृण्मयी रानडेनं परवा ज्वारीचे मुटके केले होते, तिचं बघून आज मीसुद्धा केले मग. सोप्पं सुटसुटीत ते उचलायचं, हा आमचा खाक्या.