म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, December 10, 2022

 सुलोचनाताईंना सादर श्रद्धांजली.

आपण काही लोकांना रोज आठवत बसत नाही, पण काही लोक आपल्या आयुष्यातल्या रुटीन तुकड्यांचे भाग असतात. आमच्या घरी जे सर्व प्रकारचं संगीत अखंड वाजत असायचं, त्यात सुलोचनाताईंच्या लावण्यासुद्धा वरचेवर असायच्या. मला, बहिणीला त्या खडाखड पाठ होत्या आणि यात काडीचीही अतिशयोक्ती नाही.
त्या एवढ्या सर्रास ऐकायचो, की एका वर्षी कॉलेजच्या गॅदरींगला कोणतं गाणं म्हणावं यावर घरात बोलताना बाबांनी मला अगदी गांभीर्यानं 'पाडाला पिकलाय आंबा' सुचवलं होतं. मी आ वासून बाबांकडे बघतच राहिले. मी, आणि लावणी? मी कसं असलं छचोर गाणं गाणार? (how judgmental! I know!) बाबा म्हणाले, 'असे भाव असलेलं गाणं ठसक्यात गाताना त्या डोक्यावरचा पदरही ढळू देत नाहीत, आणि तू कोण लागून गेलीस छचोर म्हणणारी? तो निव्वळ गाण्याचा एक प्रकार आहे. कॉलेजच्या मुलामुलींसमोर ठेका धरायला लावेल असं उडत्या चालीचंच गाणं पाहिजे, तिथं काय भावगीत आळवणारेस का! बघ तू, मुलंमुली १००% डोक्यावर घेतील आणि ते श्रेय सुलोचना चव्हाणांना असेल, तुला नाही.'
बाबांनी एवढं सांगूनही माझी काही धडगत झाली नाही ते गायची आणि ठरवलं असतं तरी तो गाण्याचा बाज मला जरासुद्धा जमला असता, असं मुळीच वाटत नाही. तेव्हा नाही, आजही नाही. बाकीचे प्रकार आपण निदान आपल्यापुरते गुणगुणतो तरी, लावणी इतक्या सहज हाताशी येत नाही. ती नुसत्या वृत्तीनं नव्हे, शास्त्रानंही नखरेल आहे.
गाण्याचा तो एक खरंच अतिशय कठीण प्रकार आहे. प्रचंड एनर्जी, शब्दांचे भाव, भाषेचा लहजा, गातानाचा अभिनय आणि गायनाचा दर्जा इतक्या बाबी अंमलात आणत गाण्याचं नेहमीचं बाकी तंत्र सांभाळायचं, ही तारेवरची कसरत आहे. ही कमाल साधत त्यांनी एवढ्या एकाहून एक लोकप्रिय लावण्या दिल्या, याबद्दल सुलोचना चव्हाणांना कडक सलाम आहे. त्यांचं विस्मरण नाही होणार कधी.


No comments:

Post a Comment