काल झालेल्या स्वप्नवासवदत्तम् या कार्यक्रमाचा अनुभव खूप प्रसन्न होता.
संस्कृतातल्या उत्तम नाट्यकलाकृती सर्वसामान्यांपर्यंत सुगमपणे पोचवण्याच्या स्तुत्य उपक्रमातली ही पहिली नृत्य-नाटिका, निर्माती दिग्दर्शक मुग्धा पोतदार-पाठकांनी भांडारकर संस्थेच्या सहयोगानं भांडारकर संस्थेच्या आवारातल्या अॅम्फी थिएटरमध्ये संक्षिप्त स्वरूपात सादर केली.
मुग्धा पोतदार-पाठक आणि पूजा मेहता या दोघी कुशल नृत्यांगनांबरोबर केवळ सहा महिन्यांत कथ्थकचे ढोबळ धडे घेऊन आत्मविश्वासानं वावरणारे कुणाल फडके लक्षवेधी आहेत. ओंकार शिंदेंचा यौगंधरायण आणि किंचित सूत्रधार मीठासारखा नेमका वाटला. उत्कृष्ट दिग्दर्शन, कोरस आणि रंगमंचाचा सुरेख वापर, सुरेल गाणी आहेत. सर्वांच्या एकत्र तराण्यानं तर मंत्रमुग्ध केलं. नाटिका नृत्याधारीत असूनही केवळ नृत्यावर केंद्रित नाही. ओपन एअर थिएटरच्या वातावरणानं, वडाच्या सळसळीनं, संध्याकाळच्या सुखद गारव्यानं आणि अधल्यामधल्या झुळुकांनी या सगळ्याचा एकत्रित परिणाम दामदुप्पट केला.
महाकवी भासाच्या या मूळ सहा अंकी नाटकाचं हिंदीतलं सुबोध रुपांतर डॉ सुनील देवधरांनी केलं आहे. संगीत निखिल महामुनी आणि आमोद कुलकर्णींचं आणि शाम भुतकरांचा वॉटर कलर्स-डिजीटल माध्यमाच्या एकत्र वापरातून केलेला बॅकड्रॉप आहे. या सगळ्याला उठावदार प्रकाशयोजनेनं साजेशी संगत केली आहे.
कार्यक्रमात एकदाही मोबाईल वाजला नाही, ही विशेष उल्लेखनीय बाब. संगीता गद्रेंनी मृदूपणे दिलेल्या सुरवातीच्या सिनॉप्सिसपासून शेवटपर्यंत प्रेक्षक अटेंटिव्ह होते. बरोब्बर वेळी येणारी किंवा न येणारी दादसुद्धा रंगत वाढवते. फार छान वाटलं. बादवे, भांडारकर संस्थेच्या आगामी अभ्यासक्रमांची छोटीशी झलक पुरेशी इंटरेस्टिंग होती, अनेकांना खात्रीनं स्क्रू लागले आहेत.
No comments:
Post a Comment