म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, April 28, 2023

 बुचाचं झाड सहसा शरद ऋतूत फुलतं. पण एक झाड वसंतातही फुलावर आलेलं दिसलं. आश्चर्य म्हणजे वाटेतलं इतर कोणतं बुचाचं झाड फुललेलं दिसलं नाही.

पायपीट करत जाताना जुन्या वाशी नाक्याच्या अलिकडे अनपेक्षितपणे झालेला हा लाभ. पण अतिशय लाडक्या असलेल्या या फुलांना असं अचानक भेटून डोळे विस्फारले, ती वेचताना निखळ आनंद झाला नाही. एखादी गोष्ट कितीही आवडती असली तरी तिच्याशी अशी अवकाळी भेट नकोशी वाटते.
बूच/आकाशनिंब/गगनमोगरा/गगनजाई असं अधेमधे फुलत असतं का? मग एक फुललं आणि बाकी नाही, हा कुठला प्रकार? की मौसम झपाट्याने बदलत चाललेला असल्याचं हे आणखी एक उदाहरण?


Thursday, April 27, 2023

 रोजच्या जेवणात अधेमधे कोशिंबिरींवर नेहमीपेक्षा जास्त भर देऊन बदल असतात, त्यापैकी हे काही फोटो. रंगांइतकेच वेगवेगळे आकार आणि टेक्स्चर्सही एकत्र आवडतात. घरच्या ज्येनांना पचायला सोपं होण्यासाठी काही पदार्थ वाफवून घेते. वर्षभर मिळणारं कच्चं शेंदरी गाजर किंवा कच्चं बीट, मटार वगैरे बऱ्याचदा मलाच सोसत नाही. कधी कधी ड्रेसिंग म्हणून चमचा दोन चमचे कोणत्याही कोरड्या चटण्या कालवते.

१. वाफवलेले बीट आणि मक्याचे दाणे, टोमॅटो, कांदा, मोडाचे मूग, शेंगदाणे, कोथिंबीर, मीठ, साखर, भरपूर लिंबू पिळून.
२. गाजराचा खिस, मेथीचा पाला, चिरलेला कोबी आणि टोमॅटो, शिजवलेले छोले आणि वाफवलेले मटार, खारे दाणे, घट्ट दही, मीठ, मिरपूड.
३. उभा चिरलेला टोमॅटो, गाजराच्या गोल चकत्या, पनीरचे चौकोनी तुकडे, वाफवलेले मक्याचे दाणे आणि मटार, खारे दाणे, अक्रोडाचे तुकडे, भाजलेले तीळ, मगजबिया, कोथिंबीर, मीठ, मिरपूड, भरपूर लिंबू पिळून.

Friday, April 21, 2023

 #scribe #examwritingforblinds #examforblinds

अंध विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात गेल्या काही वर्षांत वरचेवर ढिसाळ व्यवस्थापन दिसून आले, म्हणून ही चौकशीवजा पोस्ट.
शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रश्न फारसा येत नाही. पण बॅंकींग आणि MS-CIT परीक्षांची केंद्रे विद्यार्थ्यांसाठी फार गैरसोयीची असतात. ती केंद्रे अलोकेट करताना विद्यार्थ्यांना यातायात होईल हा मुद्दा ध्यानात घेतला जात नसल्याचं दिसतं. स्पर्धा परीक्षांना कधी गेले नाही त्यामुळे सरसकट काही ठाम विधान करणं योग्य नाही. पण मुलामुलींना फार धडपड करावी लागते एवढं खरं.
बॅंकींगच्या परीक्षांसाठी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी वेगवेगळ्या शहरांमध्ये जातात. ती केंद्रे बऱ्याचदा कानाकोपऱ्यातल्या कॉलेजांमध्ये असतात. पुण्यातल्या अशा केंद्रांवर पोचताना आम्हीच अनेकदा त्रस्त होतो, तिथं विद्यार्थ्यांची काय कथा. कोल्हापुरात एकदा मुंबईहून आलेल्या मुलाच्या स्पर्धा परीक्षेसाठी मी फुलेवाडीतल्या कॉलेजात गेले होते. परीक्षेसाठी अनोळखी शहरात रहाण्याची, वाहतुकीची आणि लेखनिकांची, या सगळ्या सोयी एकाच वेळी करणे, खर्च सोसणे, उन्हातान्हात धक्के खात विचारत पोचणे आणि शिवाय परीक्षा देण्याचा जादाचा मुख्य ताण. साहजिक कारणांनी ही मुलं एकेकटीच येतात. पण निदान त्या परीक्षा तितक्या महत्त्वाच्या तरी असतात.
पण MS-CIT बाबत असं होण्याची आवश्यकता वाटत नाही. या परीक्षांसाठी मुलंमुली ज्या परिसरात रहातात, तिथल्याच स्थानिक संस्थांमध्ये ही व्यवस्था केली जाऊ शकत नाही का? पुण्यात तरी हे चित्र दिसत नाही. मोशीला मोठं शासकीय अंध विद्यार्थी वसतिगृह आहे. पण या परीक्षांसाठी गावात यावं लागतं. अगदी हा अभ्यासक्रमसुद्धा या मुलांसाठी गावातच उपलब्ध आहे, जो ती रोज येऊन पूर्ण करतात आणि परीक्षेला बसतात. हल्ली ही परीक्षा बऱ्याच शासकीय परीक्षांपूर्वी अनिवार्य आहे. लेखनिक विद्यार्थ्यांनीच गोळा करायचे असतात. वास्तविक, अभ्यासक्रम ज्या ज्या संस्थेत आहे, ते अंध विद्यार्थ्यांसाठी लेखनिकांचे डेटाबेस ठेवून सहज ही सोय करू शकतात. पण तसं का केलं जात नाही कल्पना नाही. मोशी-भोसरी-वारजे माळवाडी-डेक्कन-कुमठेकर रोड / अप्पा बळवंत चौक एवढा प्रवास करून विद्यार्थी येतात. अलीकडेच साडेनऊच्या परीक्षेसाठी एक मुलगी सकाळी सहाला निघून एवढा प्रवास करून साडेआठाला परीक्षेला हजर झाली. दुसरी स्वतःच्या घरून, पण धानोरीहून आली. एवढं करून खिदळत आल्या. पता नहीं कौनसी चक्की का आटा खाती है छोकरीयां!
मध्यंतरी एकीची परिक्षा Start Exam वर टिचकी मारल्यावर कशी कोण जाणे स्क्रीनवरून गायबच झाली. केंद्र चालकांनी आधी स्वतः ती रिस्टोअर करण्याचे महा प्रयत्न केले, मग वरिष्ठांना फोन केले. पण अशा ट्रबलशुटींगसाठी कोणतीही ठोस तांत्रिक मदत यंत्रणा उपलब्ध नसल्याचं कळलं. परीक्षेचं सॉफ्टवेअर तयार केलेली कंपनी, महाराष्ट्र शासनाचं तंत्रज्ञान शिक्षण मंडळ आणि एमकेसीएल अशी तिहेरी गुंतागुंत आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे केंद्र चालक एकमेकांना विचारत समस्यांवर मार्ग काढतात. ते असो, तर सगळ्यांची परीक्षा संपल्यावर पुन्हा तिची वेगळी परीक्षा घेतली गेली. आता तो तपशील देत बसत नाही, पण तोवर ती मुलगी गॅसवर होती. बाकीच्यांचे रिझल्टही आले आणि कारण नसताना तिला ताटकळावं लागलं. ही व्यवस्था तिच्या घराजवळ उपलब्ध असती तर ही मिझरी थोडी तरी कमी झाली असती. आपल्यासाठी या परीक्षा सहज असल्या तरी त्यांच्यासाठी कठीण असतात हे लक्षात घेतलं पाहिजे.
खरं म्हणजे कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरताना त्यात व्यंगाचा स्पष्ट उल्लेख असतो. परीक्षा केंद्रावर लेखनिकांसाठी एक जादाची खुर्ची वगळता कोणताही वेगळा सेटअप करावा लागत नाही. म्हणून या मुद्द्यांचा विचार का केला जात नाही असा प्रश्न पडतो. तर या संदर्भात कृपया कुणाला काही अधिक माहित असेल तर सांगा, आम्हाला जाणून घ्यायचे आहे.

Friday, April 7, 2023

 कुमार नावाच्या सुखाची उद्यापासून जन्मशताब्दी. आपल्या सुरांनी कवेत घेऊन माझा तुमचा जीव शांत करणाऱ्या या विलक्षण आनंदात्म्याला कृतज्ञ अभिवादन.

आठवड्याभरापासून संगीत सरितामध्ये कलापिनी कुमारांबद्दल भरभरून बोलत आहेत. विविध भारतीचे त्यासाठी मानावे तेवढे आभार कमी आहेत. कुमाररचित माळवी बंदिशींमधले शब्द आणि कलापिनींचं वडिलांबद्दलच्या जिव्हाळ्यानं अधिकच निथळणारं मधाळ हिंदी म्हणजे दोघांच्याही गाण्याला लावलेली मनभावन झालर आहे. कुमार हा मन:स्वास्थ्यासाठी समानार्थी शब्द होऊ शकतो. देखणेपणाचे निरनिराळे प्रकार असतात. माझ्या ढोबळ मते, हवेत आनंद उधळणारी माणसं काहीशी कुमारांसारखी देखणी दिसतात.