बांधले मी बांधले, इंद्राचे तोरण बांधले
शिंपण घातले, चाफ्याचे शिंपण घातले
उन्हाचे पाटव नेसले, टाकले
वार्याचे पैंजण घातले, फेकले
डोळ्यांत काजळ, केवडा, अत्तर
लावले, पुसले
हर्षाचे हिंदोळे सोडले, बांधले
मयूर मनाचे रुसले, हासले
हिंदोळे हर्षाचे, मयूर मनाचे
हासले, नाचले
दिसला, लपला, चकोर मनाचा
फुलला, ढळला, बहर चंद्राचा
लामण सूर्याचा, श्रावण नेत्राचा
विझले, तेवले
मला ही कविता अत्यंत आवडते... मी या कवितेवर भाळलेली आहे असे म्हटले तरी चालेल. प्रचंड आशावाद आणि सकारात्मकता तीत ठासून भरलेली आहे, जी माझ्याही स्वभावात जन्मजात आहे आणि त्यावर माझा नितांत विश्वास आहे.
यामध्ये सगळं भव्यदिव्य स्वप्नरंजन आहे, स्त्रीसुलभ भावनांचं अप्रतिम चित्रण आहे - छान दिसावं, अंगावर चांगलं चुंगलं ल्यावं, या भावनेनं केलेला साज शृंगार - अगदी नट्टाफट्टा आहे, तोरणा-शिंपणात गृहकृत्याचं देखणं रुपक आहे, हे बघु बरं जरा घालून.. उंहू! नाही आवडलं, नाक मुरडून काढून बाजूला फेकलं, दुसरं काहितरी घेतलं आणि ट्राय केलं... किती नैसर्गिक चंचलता किती मोहकपणे व्यक्त होतेय!
भव्यदिव्यपणा म्हणाले त्याला तर सीमाच नाही. थेट चाफ्याचं शिंपण, इंद्राचं तोरण, वा-याचं पैंजण, सुर्याचा लामण, उन्हाचं लुगडं... असलंतसलं, लहानसहान, स्वस्त, नकोचंय काही! बाकी सगळी भावना स्त्रीसुलभ आहे तरी ही जी जगण्याची आस तशीच आसुसून व्यक्त झालीये त्यात मात्र काटकसर, भागवाभागवी असला (अजूनही) टिपीकल बायकी स्वभावातला कोतेपणा - जो माझ्यातही आहेच - रुढार्थाने हे गुणविशेष मानले जातात खरंतर आपल्याकडे - ह्यालाच टुकीनं संसार करणंही म्हणत असावेत - कुठे चिंधीलाही नाही! मी जेव्हा जेव्हा ही कविता वाचते तेव्हा तेव्हा ही वृती मला भुरळ घालत आलीये... माझा आवाका काय, माझी परिस्थिती काय असली अंथरूण-पांघरूणाची सांगड डोळ्यामागे टाकून, मनोराज्यात काय काय कसं कसं असावं त्याचा विचार करताना, निदान ते कल्पनाचित्र रेखाटताना तरी आपण आपल्यावरचा लगाम स्वैर सोडावा ना...!! तिथे कशाला अडकायचं रोजच्या आयुष्याच्या आखलेल्या मर्यादांत?
जगण्याचा आनंद घ्यायला हवा, तो अनंत प्रकारे घेता येतो, त्यातलाच एक मार्ग स्वतःला खुश ठेऊन... आता स्वतःला आनंदी ठेवण्याचे ज्याचे त्याचे आपापले मार्ग असावेत, ते कुणी दुसरं, त्रयस्थ - मग भले तो जीवाचा सखा का असेना - नाही सांगू / सुचवू / ठरवू शकणार.. स्वतःचा आनंद स्वतःच शोधायला हवा, त्यासाठी स्वतःचा, स्वतःबद्दल तितका विचार करायला हवा, तो पुन्हा कोणत्याही बाह्य बाबींवर अवलंबून नसावा किंवा आयात करून मिळवावा लागू नये.. तो सहजपणे उपलब्ध होईल, जाता जाता मिळवता येईल इतका माझ्या आजूबाजूलाच खच्चून भरलेला असला पाहिजे... उन्हाचं पाटव मी केव्हाही नेसू शकते, वा-याचं पैंजण घालायला मला निराळी फुरसत काढायला नकोय, ना कुणाची परवानगी घ्यायला हवीये.. आनंदाचे झोके मनाला वाटेल तेव्हा वाटेल तिथे बांधावेत, त्यावर हव्वं तितकं हव्वा तितका वेळ झुलावं! थोडक्यात माझा आनंद माझ्या खिशातच. मला त्यासाठी कुणावर-कशावर अवलंबून रहायची आवश्यकता नाही, माझी मी किती स्वावलंबी.. एकदा स्वानंद मिळवला तर जगातली कोणती गोष्ट मिळवायची बाकी रहाते? सगळे आनंद मागोमाग आपोआप विनासायास चालत येतात... मोठमोठे तत्वज्ञानी वेगळं काही सांगतात का?
पण हे तत्वज्ञान सांगायला कोणत्याही जडबंबाळ शब्दांची योजना कुठे शोधून तरी सापडतेय का! काय प्रतिभा आहे.. मला एवढ्या ८-१० ओळीतून मोठंच्या मोठं भांडार मिळालंय, पण तो पसारा मांडायला ईंदिराबाईंना मात्र ८-१० ओळीच पुरे झाल्यायत! हा असा काही काही केवळ मला सापडलेला, भिडलेला आशय, वाचणा-या प्रत्येकाला अजून काही मिळेल आणि स्वतः इंदिराबाईंना तर आणखी निराळंच काही अभिप्रेत असेल... किती गंमत ना? आणि ही प्रत्येक स्त्रीसाठीची कविता आहे हं! नवथर तरुणी असो किंवा एखादी वृद्धा, विवाहीत - अविवाहीत, गृहीणी - नोकरदार, गरिब - श्रीमंत, शिक्षीत - अशिक्षीत, शहरी - ग्रामीण, कुण्णीही कुठलीही असो..
इंदिराबाईंनी कधी स्त्रीवादी मतं मांडली नाहीत, निदान माझ्या तरी वाचनात आली नाहीत. तो मांडायला जी एक हिरीरी लागते (असा प्रवाद तरी आहे, मला स्वतःला असं वाटत नसलं तरी) ती त्यांच्या स्वभावात गैरहजर होती. त्या नेहमीच स्त्रीची एक भावूक प्रतिमा साकारत आल्या. त्या स्वतः जशा होत्या तशीच ही प्रतिमा. स्त्रीच्या स्वभावात जात्याच एक मार्दव, ऋजूता असती, कितीही कर्तव्यकठोर स्त्री असेल तरीही ती असतेच, ते त्यांनी त्यांच्या बहुतेक कवितांमधून अगदी सहजपणे दाखवलिये... अरुणा ढेरेंनी लोकरंगच्या एका अंकात इंदिराबाईंवर लिहिलेल्या एका लेखात ही किनार अगदी अलगद उलगडून दाखवलीये.
हे झालं कवितेबद्दल. किती लिहू अन किती नको असं करणारं. ती अशी आत आत मुरलेली आहे माझ्या. आणि वर्षं जातील तशी नव्याने काहितरी हातात गवसत जातं तिच्यातून.. तिचं गाणंही तितकंच जिव्हाळ्याचं आहे.
कवितेचा योग किती मोठा असावा.. भास्कर चंदावरकरांनी तिला संगीतानं नटवलं, आशानं ते गळ्यावर चढवलं आणि स्मिता पाटील नावाच्या त्याच तोलामोलाच्या मूर्तीमंत प्रतिभेने ते पडद्यावर साकारलं! या चौघातलं कुण्णीकुण्णी जर्रा म्हणुन उणं नाही! आणि याचं श्रेय जब्बार पटेलांना द्यायला विसरलो तर संपलंच मग! खुप सुंदर चाल आहे या गाण्याची, शब्दांना न्याय मिळवून देणारी, त्यातले स्वल्पविरामांचे हेलकावे आणि नेसण्या-टाकण्याची, घालण्या-फेकण्याची, सोडल्या-बांधल्याची, हसण्या-रुसण्याची चंचलता ठळकपणे अधोरेखित करणारी... आशाही तितकीच मन लावून गायलीये. मला असं नेहमी वाटतं की तिला अशा अर्थगर्भित कविता गायला मिळाल्या ना की मनापासून आनंद होत असावा आणि तो आनंद तिच्या स्वरांमधून, उच्चारलेल्या प्रत्येक शब्दामधून असा मधासारखा ठिबकतो. तिच्या कित्येक कवितांच्या गाण्यांतून तिचे भाव हे स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचवतात... आणि स्मिताबद्दल मी काय बोलणार? ती जन्मालाच अशा काही विलक्षण गोष्टी करण्यासाठी आली होती, ते तिनं केलं आणि निघून गेलीसुद्धा...
बाप रे, मी इतकी प्रेमात असते या कवितेच्या की मला भानच रहात नाही... तल्लीन होऊन जाते मी! नाहीतर तसा कविता हा माझा भटकण्यासाठीचा प्रांत नाहीच... अजूनही. पण काही काही गोष्टी, माणसं, त्यांना तुम्हाला भेटावंसं वाटत असतं म्हणुन स्वतःच येऊन भेटतात ना, तशी ही एक.. आली, भेटली आणि कायमच्या मुक्कामालाच राहिली, मी ठेऊनच घेतली तिला!
कविता / गीत - इंदिरा संत
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - सर्वसाक्षी
सई खूप छान लिहितेस तू... खूप आतून, खूप निर्मळ ....
ReplyDeleteअशीच लिहीत रहा. खूप खूप शुभेच्छा !
- आरती
सुरेख लिहिलंय गं तु सई.... अप्रतिम....
ReplyDelete