म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, October 29, 2018

अरुणाताईंना बघितल्यावर नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे ह्यांना राग येत असेल का! आता माणूस म्हणल्यावर थोडाबहुत राग येणारच, पण त्या तो कशा व्यक्त करत असतील? माझ्यासारखी कडकड किंवा आक्रस्ताळेपणा सोडाच, आवाजाची पातळी तरी वाढत असेल का ह्याबद्दल शंका आहे. फारतर उद्विग्न होऊन शांत बसत असतील. डोळ्यांनी मऊ हसणा-या त्यांच्या बाबांबद्दलही सेमच प्रश्न पडायचे. ते असो. पूर्वी मला अरुणाताईंचं लेखन आवडायचं नाही. गोडमिट्ट वाटायचं. खोटं कशाला बोला, पूर्वी पु म ग्रं मधे पुस्तकं निवडताना दोनेकदा तरी सहजपणे अरुणाताईंना उचलून बाजूला ठेवल्याचं आठवतंय. पण आता नाही होत तसं. फक्त लेखनाचा नाही, अरुणाताईंच्या संयमित, प्रगल्भ व्यक्तिमत्वाचाही तो परिणाम आहे. आता अशा पिंडाचे लेखक वेचून काढून वाचते. आता असं सौम्य, स्निग्ध आणि समतोल कविता, लिखाण वाचताना बरं वाटतं. मनाला मलम लावल्यासारखं. आपल्या बापूंच्या अंगानंच जाणारी मंडळी ही. प्रखर सत्य सांगताना, मांडतानाही धार बोथट करून तीव्रता पोचवणा-यांबद्दल आता अतीव आदर वाटतो. वय वाढत जाताना आपल्यात होणारे हे नकळत बदल जाणवतात.

मुद्दा असा की, उत्तम कवयित्री, लेखिका तर त्या आहेतच, त्याबरोबरच त्यांच्यासारखं संतुलित, शांतचित्त आणि प्रसन्न हसरं माणूस संमेलनाला मिळालं, ही सुखद बातमी आहे. ताईंचं आणि आपल्या सगळ्यांचंही अभिनंदन! आता वर्षभर तरी निश्चिंतता. संमेलनाध्यक्षांची पुस्तकं लोक वाचनालयात शोधून, मागून किंवा विकत घेऊन वाचतात, तेही अशा प्रसंगी योग्य वाटतं. गेली काही वर्षं त्याबाबत जो आनंद होता तो आता निदान वर्षभरासाठी तरी मावळलाय हे नसे थोडके. काल अरुणाताईंचं नाव ऐकल्यावर आपसुक बाबांच्या तोंडून 'चलो यवतमाळ' बाहेर पडलं, त्यानिमित्तानं त्यांनी पूर्वीच्या अनेक संमेलनांच्या सुखद आठवणी सांगितल्या, ह्यातच बरंच काही आलं.

No comments:

Post a Comment