म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, November 23, 2018

डॉ. सुप्रिया दीक्षितांना श्रद्धांजली.
सगळे म्हणतायत तसं खरंच सुमी लंपनकडे गेली.

दोन मोठ्या आणि लाडक्या लोकांचा सहवास मिळालेल्या सुप्रियाताईंबद्दल मनात हेवा ठेवूनच अमलताश वाचायला घेतलं होतं. शिवाय संतांना आणि बाईंना शोधत जाणंही होतंच. थोडक्यात लेखिकेविषयी उत्सुकता अगदी नगण्य होती. त्यात आत्मचरित्रं म्हटली की येणारी ठराविक चित्रणं भिती घालत होती. पण तसं मुद्दाम हायलाइट केलेलं काही आढळलं नाही. माणसं माणसांसारखीच रंगवलेली दिसली. त्यामुळे उलट वाचता वाचता दोन मोठ्या माणसांसोबत असूनही स्वत:चं वेगळेपण राखून वावरलेल्या सुप्रियाताईंबद्दल आदर वाटला.

पुस्तक खाली ठेवल्यावर सुप्रियाताईंना पत्रातून पुस्तक आवडल्याचं आणि जे वाटलं ते तसंच्या तसं लिहून कळवलं. दोनच दिवसांनी, पत्र पोहोचल्याच्या संध्याकाळीच सुप्रियाताईंचा फोन आला. पत्र आणि चक्क अक्षराचंही कौतुक केलं. खूप वेळ आणि मनमोकळं बोलल्या, पुस्तकात उल्लेख न केलेल्या काही व्यक्तिगत आठवणी सांगितल्या, क-हाडला येण्याचं आपुलकीचं आमंत्रण दिलं. कोल्हापूरला जातायेताना वाटेत नक्की थांब आणि ये म्हणाल्या. मितभाषी वाटल्या, पण भरभरून बोलल्या. त्यांच्या आत्मिय आणि शांत बोलण्यामुळं मलाही आपण जाऊ असं वाटलं.

पुढे क-हाडला वरचेवर मुक्काम झाले. अगदी दीर्घही. सुप्रियाताईंकडे जाण्यासाठी योग्यशी सोबतही होती. पण प्रत्येक वेळी आठवण असूनही पुढच्या वेळी जाऊ असं उगीचच होत गेलं. मग केव्हातरी अशा बातम्या येणारच असतात. तशा त्या आल्या की, आपण नुसतेच ठरवतो, बोलतो, प्रत्यक्षात करत काहीच नाही, ही अनेकानेक बाबतीत होत असणारी त्रासदायक जाणीव डोहातून डोकं उंच वर काढते. पुन्हा असं होऊ द्यायचं नाही हे निश्चय पुन्हा पुन्हा केले जातात आणि पुन्हा पुन्हा तेच होत रहातं.

असो. आडनावातल्या फरकामुळे सुप्रियाताई कोण हे लेकाला समजावताना किंचित त्रेधा तिरपीट झाली. पण पाठोपाठ लंप्याच्या आठवणी सुरू झाल्यामुळे वातावरण हलकंफुलकं झालं. आता ह्याही निमित्तानं पुन्हा लंपनला भेटणं होईल. लंपनमुळे झालेला एक परिचय लंपनपाशीच येऊन थांबला.

No comments:

Post a Comment