नक्की महिना वगैरे आठवत नाही, पण २००१ की २००२ सालातली केव्हातरीची गोष्ट आहे. नुकतीच कधीतरी मायबोलीची सदस्य झाले होते. तेव्हा नेटवरचं सगळं गप्पांचं जग, मित्रमंडळी नवी नवी होती. मायबोली हा निव्वळ नेटवरचं उपलब्ध मराठी साहित्य शोधण्याच्या नादात केलेल्या खोदकामातला तेव्हा मौल्यवान असणारा खजिना सापडला होता. तिथे सदस्यांपैकी कुणीही ओळखीचे नव्हते, किंबहुना बरेचसे लिहितेबोलते सदस्य भारताबाहेरचे दिसत होते. मी ऐन पुण्यात रहात असल्यामुळे काही मराठीला पारखी नव्हते. नेटबद्दलही फार वेड नव्हतं. पण मला ऑफिसमध्ये बराच वेळ मोकळा असायचा. अडीच हजार स्क्वे फुटांच्या जागेत आम्ही एकूण पाच माणसं काम करायचो. कुणाचंही प्रोफाइल एकमेकांशी संबंधित नव्हतं. आम्ही पाचही जण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे होतो. चहा, जेवण, अधेमधे प्रासंगिक सेलिब्रेशन्स, खाली तळमजल्यावर कलानिकेतनच्या शोरूममध्ये उगीचच रेंगाळत निवांत टाईमपास (तिथे पहिल्यांदाच इतक्या अल्टिमेट साड्या आणि किंमतीही तितक्याच अल्टिमेट पाहिल्या), मुंबईच्या हेड ऑफिसला एकत्रित भेटी आणि स्वतःचं काम, एवढ्या सगळ्यातूनही उरलेल्या भरपूर वेळात तेव्हा मोबाईल्स फोफावले नसल्याने चक्क पुस्तक वाचन आणि नेटसर्फिंग जोरात चालायचं. त्यामुळे मायबोली सापडल्यावर मी लवकरच तिथली पडीक सदस्य होणं क्रमप्राप्त होतं. तेव्हाची माबो, तिथले सदस्य आणि तिथलं लेखन, गप्पा, दंगा, सगळंच बहारदार होतं. त्यातून मुंबईपुण्यातल्या, कोल्हापूरच्या काही मंडळींचीही गाठ पडली, ओळखी झाल्या, बोलणं चालणं सुरु झालं आणि एकंदरीतच मजा वाढला. मायबोलीनं आयुष्य कायमचं श्रीमंत करून टाकलेले मित्रमैत्रिणी दिले. हे क्लिशेड वाक्य वाटेल, पण तीच आनंदाची वस्तुस्थिती आहे. नंतर अनेक संस्थळांवर उनाडक्या सुरू झाल्या, पण माबोच जिव्हाळ्याचा भाग राहिला.
तर त्या सुरुवातीच्या काही महिन्यांत एका दुपारी - बहुतेक रविवारी - घरचा लँडलाईन वाजला. मी उचलल्यावर पलिकडून आत्मविश्वास भरलेल्या आवाजात, "सई, अंबर बोलतोय" हे कानावर पडलं. आपण पहिल्यांदाच बोलतोय, समोरच्याला आवडेल न आवडेल अशा शंकेचा मागमूसही नव्हता त्याच्या आवाजात. कारण तेव्हा नेटवरची मैत्री ही काही सर्रास बाब नव्हती. सुदैवाने मीही खुल्या वातावरणात वाढले असल्याने मलाही त्याच्याशी बोलताना छान वाटलं. मग बरीच माहिती, घरचे पत्ते वगैरे देवाणघेवाण झाली, खूप मनमोकळ्या गप्पाही झाल्या. अंबर तेव्हा गणेशमळ्यात रहायला होता आणि त्याच्या बाबांबरोबर माणिकबागेतल्या कारखान्यात यायचा. थोडक्यात सिंहगड रोडचा आदिम रहिवासी

मी तेव्हा अस्तित्वातही नसलेल्या आत्ताच्या सनसिटी रोडला. त्यामुळे नेटवर एकदम शेजारी भेटल्यासारखंच होतं. मग नियमित भेटीगाठी सुरू झाल्या, माझ्या नव-याचंही अंबरशी चांगलं सूत जुळलं आणि अंबरशी दाट मैत्री झाली.
हा एक निरंतर उद्योगी, चुकूनही स्वस्थ म्हणून न बसणारा प्राणी आहे. त्याच्या डोक्यात सतत काही तरी शिजत असतं. मग ते शिजणारं प्रकरण प्रत्यक्षात उतरवण्याचे बेत तयार होत असतात. त्यासाठी आजवर गोळा केलेले सर्व अनुभव तो वापरतो. आडाखे बांधतो. काही बिनचूक ठरतात, काही चुकतात. पण हा प्राणी थांबत म्हणून नाही. तोवर हा पुढे चालू पडलेला असतो. आणि ती वाट तिस-याच कशाची तरी असते. मी मुद्दामच त्याच्या खवय्येगिरीबद्दल जास्त बोलत नाहीये, कारण अंबर म्हणजे पट्टीचा खवय्या एवढीच त्याची मर्यादित ओळख असावी, हे मला पटत नाही. तो एक धडपड्या आणि असंतुष्ट व्यावसायिक आहे. कितीही उपद्व्याप केले तरी तो समाधानी नसतो. हे असमाधान माणसाला जिवंत ठेवतं. तो सकस वाचक आहे, उत्तम कानसेन आहे, त्याचा गळाही तसा बरा आहे. तो उत्तम लिहीतो. त्याचा फूड ब्लॉग यशस्वी होण्यात तो समोर आणत असलेली कानाकोपऱ्यात लपलेली अस्सल खाद्यस्थळं आणि त्याची वर्णनाची शैली ह्या दोन्हीचा वाटा आहे. त्याचप्रमाणे तो मिनी शरद पवार आहे. पुण्यातले क्वचितच काही लोक त्याला माहिती नसतील. त्यानं धुंडाळले नाहीत असे कमी व्यवसाय उरले असतील आता. शिवाय मधुरा आणि त्याची केमिस्ट्री पहाता तो एक चांगला नवराही असावा असं म्हणायला नक्की वाव आहे.

तो काहीही नवं खूळ (कौतुकानं रे!) काढो, मधुरा तिथे जातीनं पदर खोचून उभी असलेली दिसणारच. अंबरचा एकंदरीत बाज बघता तो त्याच्या चिरंजीवांवरही बाबागिरी करत असेलसं वाटत तरी नाही, ते खातं मधुराकडेच असावं. आणि मित्र म्हणून तर तो जातीवंत आहेच. कधीही अचानक त्याचा फोन येतो. सहज बोलायला. गप्पा मारायला. केव्हाही आपण फोन केला तरी सुरुवात "बोल की सई" अशी हमखास बोलायला (वेळ आहे की नाही ते आपल्याला माहिती नसलं तरी) तयार असल्याची खात्री पटवणारी असते. "अंबर, उत्तम पावभाजी माझ्या घराजवळ कुठे मिळेल", ह्या असल्या फोनलाही तो प्रामाणिकपणे तत्पर उत्तर देतो. मी त्याच्या जागी असते तर नखरे, आढ्यता, सात्विक संताप, शिष्टपणा हे सगळं संमिश्र विचारणा-याच्या टाळक्यावर आदळलं असतं. पण अंबर मात्र उत्साहाने माहिती देतो. त्याच्यामुळे मला माझ्या परिसराची नवी खाद्य ओळख झाली. त्यामुळे पुण्याबाहेरच्या मित्रमंडळींना कुठे कुठे काय काय खिलवून त्यांच्याकडून आयजीच्या जीवावर बायजी उदार ह्या न्यायाने आयते दुवेही कित्येकदा घेऊन झाले.
माबोच्या त्या उमलत्या काळात पुण्या किंवा भारताबाहेरून येणाऱ्या सदस्यांसाठी पुण्यात एक बिनघोषित/स्वघोषित स्वागत समिती तयार झाली होती. येणा-या/रीची चर्चा माबोवर व्हायचीच. अंबर त्या समितीचा बिनविरोध अध्यक्ष होता. मग त्याच्या बेताप्रमाणे आम्ही तेव्हा पोरंबाळं नसलेले सडे लोक सारखी गटग ठरवायचो आणि टोळी करून पाहुण्यांना भेटायला जायचो. माबोच्या सहलीसुद्धा ठरवायचा अंबर. आणि इतक्या प्रकारच्या लोकांना नेऊन आणून ते यशस्वी करायचा. मजेचे दिवस होते ते. अगदी खुद्द अंबरचं लग्नही एक माबो गटगच होतं आणि खुद्द अंबरच यजमान असल्याने आम्हा उपस्थितांना उत्कृष्ट खाद्यास्वाद मिळण्याची पुरेपूर काळजी त्याने जातीने घेतली होती.
यथावकाश आम्ही सगळेच सांसारिक व्याप, नोकरीधंदे आणि मुलंबाळंवाले झाल्यावर आणि पर्यायाने माबोवरचा वावरही आटल्यामुळे नियमित भेटीगाठी कमी होत गेल्या. त्यातले कित्येक मित्र वाटा बदलून गेले, काही हरवले, काही आणखी घट्ट जवळ आले. अंबरशी संपर्क आणि बोलणंभेटणं मात्र आजतागायत विनाखंड चालू आहे आणि त्या भेटण्याबोलण्यात तोच प्रथमपासूनचा ताजेपणाही कायम शिल्लक आहे. त्याचे नवनवे उपक्रम तो न विसरता कळवतो आणि मी (फूडी नसूनही) सवड काढून त्या उपक्रमांना प्रतिसाद देण्याचा यथोचित प्रयत्न करते. हे अगदी आताच्या फक्कडच्या उपाहारगृहापर्यंत नेमानं चालत आलेलं आहे. त्याच्याकडून एखाद्या ठिकाणची विशेष शिफारस आली की तिकडे जाणं होतं. तो स्वतःही अचानक कुठे तरी भेटतो. गप्पा मारतानाही आपण सांगतोय ते समोरच्याला पसंत पडेल अथवा नाही, ही फिकीर न करता तो त्याला योग्य वाटणारे मुद्दे मांडतो. तसा तो फटकळ आणि व्यावहारिक आहे. हा चवीला इतका चोखंदळ माणूस माझ्या हातचं कधीतरी किरकोळ काहीतरी चाखल्यावर चक्क दाद देऊन गेला, तेव्हा माझ्या स्वैपाकघरातल्या पराकोटीच्या नावडीला आणि उरकाउरकीला गांभीर्यानं घ्यावं असं वाटून गेलं होतं. पण एकंदरीत खाणं हाच विषय मी फारसा मनावर घेत नसल्याने मित्र मंडळ बचावले, असं म्हणता येईल. अलिकडे नीलला त्याची गलमिशी फारच आवडली होती, ती आता त्याने काढून टाकलेली दिसतेय.
अंबरला बरीच वर्षं ओळखताना मला दिसलेला माणूस असा आहे. स्वागतशील, प्रयोगशील, लोकसंग्राहक वगैरे. वैगुण्यही काही असेल, पण माझ्या अनुभवाला अजून तरी आलेलं नाही. नाही तर त्याचाही स्पष्ट उल्लेख नक्की केला असता, कारण माणूस कधीच नुसता साखरेचा पाक असू शकत नाही. थोडं तिखट, थोडं कडवट, तुरट, खारट, आंबट ह्या सर्व चवी हव्यात माणसात. तर तो माणूस. तर अंबरला त्याच्या नवनव्या धडपडींमध्ये उदंड यश लाभो आणि उत्तरोत्तर अशाच प्रगतीच्या पाय-या तो चढत राहो, ही त्याला मनःपूर्वक शुभेच्छा

