जीवेत् शरद: शतम् उषाताई
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Tuesday, December 15, 2020
अतिशय गुणवंत गायिका, गुणवंत चित्रकार, गुणवंत निर्मात्या आणि मितभाषी प्रसिद्धी पराङ्मुख व्यक्तिमत्त्व असणाऱ्या उषाताईंना केवळ लावणी आणि मुंगळा ही मुख्य ओळख मिळाली आहे. ती कमी महत्त्वाची नसली तरी त्यांची लावणीव्यतिरिक्तची गाणीसुद्धा तेवढीच उल्लेखनीय आहेत. मीना खडीकर, मानस मुखर्जी, श्रीनिवास खळे, विश्वनाथ मोरे अशांसारख्या काही संगितकारांनी त्यांना जी इतर गाणी दिली, ती अगदी कस पाहणारी आहेत आणि उषाताईंनी त्यांचं खणखणीत सोनं केलं आहे. क्वचित जैत रे जैत वगळता पं. मंगेशकरांनी उषाताईंबाबत हात अगदीच आखडता घेतला आहे. तरी उषाताई आनंदी असतात. खरंतर त्यांनाही रडगाणी गाण्याची, तक्रारींची केवढी संधी, पण वृत्ती प्रसन्न, प्रेमळ आणि हसरी. वाट्याला आलेलं सगळं उत्कृष्ट डिलिव्हर करायचं, एवढंच ध्येय. मग ती राम कदमांची लावणी असो, दादा कोंडकेंची अवखळ दंगेखोर गाणी असोत, खळ्यांचं मंजुळ भावगीत असो की भावाच्या अल्बमसाठी केलेलं गालिबचं पोर्ट्रेट. बाकी मी बरी आणि माझं घर बरं. अशी माणसं मग विशेष आवडतात.
आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी, वेळ झाली भर माध्यान्ह, थांब रे घना, पालखी हाले डोले, माझी रेणुका माऊली, झाल्या तिन्हिसांजा, त्या तुझिया चिंतनात, केळीचे सुकले बाग, सख्या चला बागामधी, ना ना ना ना नाही नाही नाही रे, अशी काही अत्यंत आवडती गाणी आहेत.
Saturday, December 12, 2020
पतंगाच्या निमित्ताने बिळातून थोडी तरी बाहेर पडलेली पोरं.
नील जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो. बहुतेक पालकवर्ग श्रमजीवी आहे. सगळेच स्मार्टफोनवाले नाहीत, त्यामुळे ऑनलाईन वर्ग वगैरे नाहीत. एका इयत्तेत जेमतेम २०-२२ विद्यार्थी, मग शिक्षक अधेमधे प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन हालहवाल घेतायत. शासनाकडून दर तिमाहीचं एक सर्व विषय सामाईक केलेलं पुस्तक येतंय ते (ओझं कमी करण्याचा एक चांगला प्रयत्न) आणि दर महिन्याला पोषण आहाराचा शिधाही न चुकता येतो, तो आम्ही पालक घेऊन येतो. दर आठवड्याला अभ्यास पीडीएफ्स आणि शिक्षकांनी सहामाहीसाठी हाताने लिहिलेल्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सप ग्रुपवर येतात. मुलं त्यांच्या सोयीसवडीनं गृहपाठ करून आणि पेपर्स सोडवून ते फोटो शिक्षकांना पाठवतात. मुलं अक्षरशः आसुसलेली आहेत शाळेत जाण्यासाठी. अगदी शिक्षकांचं ओरडणं खाण्यासाठीसुद्धा! आमच्या शाळेत मुलांना ओरडतात शिक्षक आणि आम्ही कुणीही त्यांना त्याबद्दल विचारायला जात नाही. पीटीए असते अधेमधे (मार्चपुर्वीचं सांगतेय) पण त्यात पालकांना मुलांची कौतुकं जास्त ऐकायला मिळतात. हे नक्की आपल्याच मुलाबद्दल बोलतायत ना ही खात्री करून घ्यावी लागते.
मध्यंतरी मुख्याध्यापकांना जरा काळजीच्या सुरात म्हणाले, 'सर, जरा मोबाईल, टीव्हीबद्दल काही तरी सांगा, आम्हाला दाद देत नाहीत.' सरांनी क्षणभर माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, 'यंदा फक्त सुखरूप रहायचं आहे. मुलांनी आणि आपण सगळ्यांनीच. अभ्यासाचाच नव्हे, कसलाही जाच करू नका त्याला. पुढच्या वर्षी बघू आम्ही काय करायचं ते. जे काही होतंय, व्हायचंय, ते जगभरातल्या मुलांचं होणारे, तुमच्या एकट्याच्या मुलाचं नाही. घरातून बाहेर पडायचं नाही, शाळा दिसत नाही, मित्र भेटत नाहीत, हुंदडता येत नाही, मैदानावर जायला मिळत नाही, करायचं काय त्यांनी?'
मुकाट्यानं मान डोलावून घरी परत आले. नशीब, त्यांच्या विद्यार्थ्यानं हे ऐकलं नाही. पण अशा कानपिचक्या मिळाल्या की भान येतं जरा आणि मग बरं वाटतं. घडोघडी विनाकारण असुरक्षितता बाळगायची सवय लागत चाललीये, ती झटकता येते. हा शिक्षकवर्ग मला ज्या प्रकारे आश्वस्त करत आलाय, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. डिसलेसरांच्या निमित्ताने ह्या दुर्लक्षित वर्गाकडे लक्ष वेधलं गेलं आहे हे खरंच चांगलं घडलंय.
Tuesday, December 8, 2020
लेखातले उपाय आपल्यासाठी फार अवघड आहेत, कारण हे काहीही आपल्या जनुकीय ओळखीचं नाही. पण तरीही थोडाफार प्रयत्न जमू शकेल. प्रत्येक भावी आणि सद्य पालकांनी, खरं म्हणजे प्रत्येक माणसाने हा लेख वाचायला पाहिजे. थोडा मोठा आहे पण अतिशय महत्त्वाचा आणि वाचनीय आहे. एस्किमोजबद्दलचं कुतुहल शाळेपासून आहे. असं अधेमधे काही तरी सापडल्यावर आणखी वाचायला हवं हे लक्षात येतं.
https://www.npr.org/sections/goatsandsoda/2019/03/13/685533353/a-playful-way-to-teach-kids-to-control-their-anger?fbclid=IwY2xjawREXWZleHRuA2FlbQIxMQBzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEeWjxk90LN_1E3B4JT7gwgTQ4sj4IWVLKd7Wsyrt5GC9Jcr4Dfcq1oy19hNN8_aem_jrXgWoaJPAg76RlpIyiLNg
Sunday, November 29, 2020
Saturday, November 28, 2020
पुण्यातले नामशेष खाद्यपदार्थ आणि ठिकाणे
आमच्या बाबांना हळद घातलेलं उप्पीट आवडतं. हमोंचं 'बालकांड'मधलं उफीट वाचलं तेव्हा प्रत्येक उल्लेखाबरोबर घरोघरचं हेच व्हर्जन आठवत राहिलं होतं. तर हे उप्पीट आमच्याकडे आठवड्यातून सरासरी तीनदा तरी केलं जातं. म्हणजे बाबांना रोजच चालेल, मीच करायचा कंटाळा करते. ते असो, तर हे करताना दरवेळी आठवण येते ती 'जनसेवा दुग्धालया'च्या तिखटामीठाच्या सांज्याची!
'जनसेवा दुग्धालय' ह्या 'संस्थे'बद्दल वेगळं किंवा न बोललं गेलेलं काही बोलायला शिल्लक नाहीच. तरीही पुण्याबाहेर वास्तव्यास असणाऱ्यांसाठी, हे पुण्यातल्या ऐन लक्ष्मी रस्त्यावर प्रसिद्ध गोखले हॉलसमोर स्थित तितकेच प्रसिद्ध असलेले एक डेअरी-कम-उपाहारगृह होते. पुणे मनपाने 'अ' दर्जाचे प्रमाणपत्र दिलेले आणि तशी ठळक पाटी लावलेले. तिथे एक विभाग दुग्धजन्य पदार्थ व मिठाईविक्रीचा आणि जोडून मोठा विभाग उपाहारगृहाचा, लागूनच मागच्या बाजूला मुदपाकखाना. नाश्त्याचे ब्राह्मणी पद्धतीचे मोजकेच मराठी पदार्थ आणि मसाला दूध एवढाच आटोपशीर मेनू. बहुतेक कॉफीसुद्धा मिळायची, पण चहा नाही. बहुतेक अशासाठी, कारण मी तिथे नेहमी दूधच प्यायलेय. तिथल्या पदार्थांच्या चवी केवळ उत्कृष्ट. जनसेवा काही वर्षांपूर्वी चालकांनी बंद केलं. तेव्हा बरेचसे पुणेकर हळहळले होते. ते पुन्हा सुरू होणार, नाही होणार, अशा चर्चाही काही काळ सुरू होत्या, पण तसं काही झालं नाही.
तिथला अतिशय बहारदार चवीचा तिखटामीठाचा सांजा आमच्या विशेष आवडीचा. एका ताटलीत जेमतेम एका सामान्य आकाराच्या वाटीची, पाच-सात घासांची एक मूद. साधारण २५ रु. वगैरे एका प्लेटचा दर त्या आकाराच्या आणि आमच्या तेव्हाच्या ऐपतीच्या मानानं बराच होता. नव-याचं बसल्या बैठकीला किमान चारेक डिश खाल्ल्याशिवाय मन भरायचं नाही आणि ते तसं खरंतर कधीच भरायचं नाही. जोडीला आणखी एक दोन पदार्थ, दूध वगैरे. आठवड्यातून एकदा तरी जायचं. मग महिन्याचं अंदाजपत्रक शंख करायला लागल्यावर मी विचार करून घरी प्रयोग करायला सुरुवात केली.
हलका सोनसळी लिंबू(
) रंग, आसट-मोकळ्याच्या सीमारेषेवरचं आणि एखाददुसरा चमचाभर साजुक तुपाची नेमकी मात्रा असणारं परफेक्ट टेक्स्चर, फक्त कढीलिंब-हिंग-मोहरी-हिमि-मीठ-साखर-लिंबाचारस-कोथिंबीर-ओलंखोबरं आणि दणदणीत वाफ हे बारीssक रव्याला प्रेमळ गळामिठी घातलेले घटक पदार्थ. पण ते हवं तसं रुपरंगचवगंध साधायला मला सहा ते सात महिने चिवटपणानं खर्ची घालावे लागले. मंद आचेवर भाजलेला रवा, हळदीचं आणि नंतर आधणाचं योग्य प्रमाण, एकमेकाला धरून आणि एकमेकापासून फटकून राहिल असा एकाचवेळी समाजवादी अन् व्यक्तीवादी असणारा रव्याचा प्रत्येक कण, ही सर्कस जमवायला घाम गाळावा लागला. पण त्याचं चीज झालं. सांजा नुसता करूनही असं समाधान व्हायला लागलं की नंतर शिल्लक उरला नाही तरी वाईट वाटणं बंद झालं.
आता ऋतू आणि लहरीप्रमाणे कधीकधी मटार, गाजर, टोमॅटो, काजू वगैरे काही जादाची भर घातली जाते. कारण मंगल कार्यालयातल्या सकाळच्या नाश्त्याचं व्हर्जनही फार आवडतं. पण मूळ सांज्यात हे काही नसतं. आणि हा जनसेवा सांजा करायला लागल्यापासून तर कांदा, लसूण, शेंगदाणे, उडीद किंवा हरभरा डाळ हेसुद्धा वापरायचं प्रमाण कमी झालं. कोणतीही कमतरता जाणवत नाही.
पुण्यातली अशी काही ठिकाणं आठवणीत खूप गच्च रुतून बसलेली आहेत. मधेच केव्हातरी ओघानं आठवेल तसं एकेक वर काढून त्यात डुंबलं की तेवढंच बरं वाटतं जीवाला.
Archana Majaleअर्चुनं रेसिपी मागितली, ती इथेही देते. अजिबातच सोपी आहे.
झाकण घट्ट बसू शकेल अशी कढई, वाटीभर बारीक रवा, साधारण अडीच वाटी आधणाचं पाणी, चार ते पाच चमचे साजूक तूप, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, मीठ, साखर, हिरवी मिरची, अर्धं लिंबू, कढिलिंबाची बारीक पानं सात-आठ, कोथिंबीर, ओलं खोबरं, संपूर्ण वेळ गॅसची मंद आच, भरपूर वेळ आणि मनाची तल्लीनता.
सगळी पुर्वतयारी आधी करून मग मंद आचेवर कढईत रवा घालून एकदा ह्या तर एकदा त्या, असे दोन्ही पाय नाचवत आणि मोबाईल लांब ठेवून भाजून घ्यायचा. तेव्हाच एकीकडे मंदच आचेवर पाण्याचं आधण ठेवायचं. मोबाईल लांबच असू देणे. भाजलेला रवा बाजूला काढून घेऊन त्याच कढईत तेल घालून सगळ्या यशस्वी कलाकारांची खमंग फोडणी करून घ्यायची. हळद फोडणीत घालायची की आधणात ते आपापल्या अंदाजाने आणि हळदीच्या उग्रतेनुसार ठरवणं सोयीचं. घरगुती हळद धम्मक असते, ती कमी लागते, बाजारी थोडी सौम्य म्हणून जास्त. मग त्यात आधण ओतून मीठ, साखर घालून ते नीट मिसळून त्यात हळूहळू ढवळत रवा सोडायचा आणि तो वरून खालून नीट हलवून झाकून किमान पाचेक मिनिटं दणकून वाफ द्यायची. तेवढा वेळ मोबाईलमध्ये थोडं डोकावल्यास हरकत नाही. ह्या पहिल्या वाफेनंतर झाकण उघडून एकदा ढवळून लिंबू पिळायचं आणि सगळ्या बाजूंनी कडेनं तूप सोडायचं. पुन्हा झाकून दुसरी वाफ किमान तीनेक मिनिटं द्यायची. आता मोबाईल न घेता ताटल्या, चमचे, पाणी वगैरे आणि चहा किंवा खरंतर जायफळाच्या कॉफीची तयारी करून खाणा-यांना हाका मारायच्या. मग झाकण उघडून कोथिंबीर, ओलं खोबरं शिवरून आपल्या ताटलीत एक मूद वाढून घ्यायची. कॉफीचं पातेलं गॅसवर चढवायचं आणि खायला घ्यायचं. एक मूद खाऊन होईतोवर दुधाला उकळी येते. मग त्यात जायफळ किसून घालायचं आणि कॉफी ढवळायची. ताटलीत पुढची मूद घ्यायची, गॅस बंद करून कपात कॉफी गाळून घ्यायची आणि एक घोट एक घास असा आस्वाद घ्यायचा. झालं 


Tuesday, November 24, 2020
Monday, November 16, 2020
ed with Friends, Anyone tagged
Pratibhaप्रतिभाताईंबरोबरच्या ऐसपैस गप्पा हा अविस्मरणीय अनुभव होता. तो ह्यापुढे आम्ही वारंवार घेणार आहोत. आमच्या ह्या धारीष्ट्याचं श्रेय अर्थातच ताईंना आहे. त्यांचा कामाचा/संशोधनाचा अखंड झपाटा, अगदी दिवस-तारीख-वारानिशी अचूक दाखले जीभेवर ठेवणारी तल्लख स्मरणशक्ती, मोठेपणाचा किंचितही लवलेश नसणारं आमच्याशी समभावानं वागणं बोलणं हे सगळं आजघडीचं त्यांचं वय आणि त्यांनी आजवर निर्माण केलेली आणि येऊ घातलेली अफाट ग्रंथसंपदा पाहता स्तंभित करणारं आहे.
Yashodhanचे औपचारिक आभार मानणं जरा जड जातंय. पण घरचेच असले तरी जोशांना गृहीत धरणं योग्य नाही, पुढे अशा अनेक गोड कामगि-या त्यांच्यावर सोपवायची (पक्षी गळ्यात मारण्याची) सोय इंटॅक्ट असू देणं केव्हाही हिताचं. जोक्स अपार्ट, यशोधन तिथे असल्यामुळे मी अगदी निश्चिंत होते. सिंक्रोनायझेशन म्हणजे नक्की काय, हे आम्ही दोघं आता उत्तमपैकी सांगू समजावू शकतो.
हे सगळं आम्ही एंजॉय करत असताना आम्हाला सतत ट्रॅकवर ठेवण्याचं काम Arun Naikदादांनी केलं. दादा, खूप मजा आली, आनंद मिळाला, एवढंच सांगते
मंडळी, फिरोझ रानडे ह्या अवलियाच्या व्यक्तिमत्त्वाची परिचयात्मक झलक सादर केली आहे आम्ही. चौफेरचा हा दिवाळी अंक नेहमीप्रमाणेच दर्जेदार, वैविध्यपूर्ण आणि संग्राह्य आहे. एकाहून एक उत्तमोत्तम लेख समाविष्ट असलेला हा अंक अवश्य विकत घेऊन वाचनाचा आस्वाद घ्या.
अंकाची ॲानलाईन खरेदी www.aprup.in इथे करता येईल.
Email- choufer@gmail.com
Sunday, November 15, 2020
सौमित्र चॅटर्जी!
अरेरे 
केव्हा ना केव्हातरी अशा बातम्या येणार असतात, पण तरीही वाईट वाटतंच.
फारसं नकळत्या वयात कुणी आवडायला लागलेलं असेल तर ती आवड सहसा शेवटपर्यंत टिकून राहते. सौमित्र चॅटर्जी माझ्या पहिल्या काही स्ट्रॉंग क्रशेसपैकी एक, पण तेव्हा नुसत्या दिसण्या-वावरामुळे. अभिनय कशाशी खातात हे जेव्हापासून थोडंफार समजू लागलं तेव्हा ह्या क्रश प्रकरणाला कायमचं जोरदार वजन आलं. थॅंक्स टू दूरदर्शन! हे लोकं माहिती होण्याचं ते एकमेव कारण. अन्यथा बारावीत सौमित्र चॅटर्जी माहिती होण्याचा काहीही संबंध नव्हता. आता ही गोष्ट पुन्हा कधीतरी.
ही माणसं आपल्यात कायमची वास्तव्याला येतात. अशी एके दिवशी शरीरानं उठून जातात तेव्हा खरंच वाईट वाटतं. अगदी साहजिक कारण असलं तरी. पण आपल्या आत कायमच असणारेत.
Soumitra Chattopadhyay, greatful for all the joy you gave us, you will be loved, always!
Subscribe to:
Comments (Atom)