म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, February 25, 2020

 अंतरा संस्थेत काम करत असताना हे अनुभव घेतले आहेत. जिवंत मिनिमॅलिझम आणि डिटॅचमेंट, तरीही योग्य तिथे योग्य तेवढी अटॅचमेंट ह्या मेंढपाळांपाशी पहिल्यांदा प्रत्यक्ष पहायला मिळाली. तेव्हापासून तसं रहायचं, जगायचं, सगळे पसारे काढून टाकायचं खूळ डोक्यात एका कोप-यात चांगलं ठाण मांडून बसलंय आणि नियमितपणे त्याचं आतून ठाणठाण बडवणं चालू असतं. अगदी पुस्तकांपासून कपड्यांपर्यंत काहीही खरेदी करताना, घरात अडकून पडताना ते न विसरता आठवत रहातं. खरेद्या जवळपास थांबल्यात जमा आहेत, पण आधीच गोळा केलेलं गबाळ कसं निस्तरायचं ते अजून लक्षात येत नाही.

ह्याच खुळापायी मध्यंतरी एक किमान गरजांची यादी काढली होती, त्यात जुन्या चांदोबांमध्ये सधन सावकारांच्या घरीसुद्धा जशी साधीच व्यवस्था दाखवलेली असायची, तशा गोष्टी होत्या. एक जाडजुड जाजम, एक पांघरुण, तांब्याभांडं, सर्व मौसमात चालेल असा दांडीवर एक आणि अंगावर एक कपड्यांचा जोड, तवा, थाळावजा परात, उलथणं आणि काड्यांची पेटी, घर म्हणून प्रत्येकाकडे असावीतच अशी जेमतेम दहाच मोजकी पुस्तकं (ही यादी काढणं हा एक अफलातून एक्सरसाइज होता, अनेकांना विचारलं होतं, पण अशी यादी अजूनही तयार होऊ शकलेली नाही) अशी विंचवाच्या बि-हाडासारखी कल्पना होती, जी अजूनही कायम आहे. थोडंफार आणखी काही इकडेतिकडे. उदा. बादली आणि डासांच्या बंदोबस्ताची सोय, वाटल्यास एखादी साधी सायकल, कंदिल, एखाद्या लायब्ररीची मेंबरशिप. सानेमॅडमचं जिवंत उदाहरण आहेच डोळ्यासमोर. इएमआय नकोत, मालिका नकोत, फोन नको, संग्रहच नको. सामानाचाही आणि भावनांचाही.
खूळ का असेना, फॅसिनेटींग आहे खास. RJ Sangram Khopade - माझ्या पलीकडचा महाराष्ट्र - Ep 4 घर म्हणजे नक्की काय असतं?"

Thursday, February 20, 2020

 Unattended Macho Man on our terrace!

(कित्येकदा मनात असूनही मराठीत लिहिताच येत नाही!)
इमारतीत एक कलाकार मुलगा रहायचा. त्याला त्याच्या मित्राने ही तसबीर भेट दिली. पण तिनं घरातलं संपूर्ण ब्रह्मांड व्यापलं म्हटल्यावर तिची रवानगी गच्चीत झाली. आता शंभो ऊनपाऊसथंडीत तावून सुलाखून निघताहेत. त्यांची विचारपूस करायला कुणीही फिरकत नाही. तो मुलगा घर विकून दुसरीकडे रहायला गेल्यालाही य वर्षं झाली.


Tuesday, February 18, 2020

 धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार, अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार

किंवा
शिवरायांची नजर फिरे अन् उठे मुलुख सारा
हे शंकर वैद्यांनी केलेलं वर्णन वाचल्यावर, तोवर अभ्यासलेल्या पाठ्यपुस्तकातल्या धड्यांनी आणि वाचलेल्या तमाम साहित्यकृतींनी मनात एक विशिष्ट प्रतिमा रेखाटली गेलेली ही महन् व्यक्ती सर्वात मोठा क्रशही झाल्याचं आठवतंय. तो क्रश कायम आहे.
शिवछत्रपतींचा जय हो!
श्री जगदंबेचा जय हो!
या भरतभूमीचा जय हो!


Wednesday, February 12, 2020

 आज जागतिक रेडिओ दिन आहे.

आकाशवाणी हा एक आवडीचा विषय आहे. ऐकण्याचे आणि काही चांगलं ऐकण्याचे संस्कार, अनेक विषयांची ओळख तिथून झाली. त्यामुळे आजपर्यंत जे काही बरं ऐकलंय, त्यात आधी सांगली, मग पुणे, आता कोल्हापूर केंद्र आणि अर्थात विविध भारतीचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यात औचित्यपूर्ण कारणांनी इतर आकाशवाणी केंद्रांचं सहप्रसारणही आलं. शहर बदलताना सर्वात मोठी हळहळ पुणे आकाशवाणी सहजी ऐकता येणार नाही, ही होती! पण कोल्हापूर आकाशवाणी ऐकताना ती वृथा होती हे जाणवतंय.
घरातलं सकाळचं वेळापत्रक कळायला लागल्यापासून ते आजपर्यंत, म्हणजे किमान चार तरी दशके आकाशवाणीच्या कार्यक्रमांसोबतच चालत आलं आहे. मोबाईल कानामागून येऊन तिखट झाला तरी माझ्या रुटीनमधली रेडिओची जागा तो अजून तरी घेऊ शकलेला नाही. रेडिओ आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कोणतीही बातमी एआयआरवर ऐकल्याशिवाय मी तिच्यावर सहसा विश्वास ठेवत नाही. नभोनाट्यं, प्रासंगिक कार्यक्रम, आपली आवड, लोकसंगीत, माझं घर माझं शेत, स्त्रिया आणि मुलांसाठीचे कार्यक्रम, रुपकं, चिंतन, अनेक अभिवाचनं, उत्तमोत्तम मुलाखती, श्रोत्यांना पत्रोत्तरं, प्रबोधनात्मक प्रसारणे, असे अनेक कार्यक्रम कित्येक वर्षे ऐकणं सुरू आहे. सर्व वाहिन्यांच्या सर्व आवडत्या कार्यक्रमांचा उल्लेख करायचा म्हटलं तर फार लांबड लागेल. निवेदनातलं मार्दव, जाहिरातींचे संयमित प्रमाण, सर्व क्षेत्रांची घेतली जाणारी नैमित्तिक दखल, वेळोवेळी पुरवली जाणारी आवश्यक ती सर्व शासकीय बाबींची माहिती, उल्लेखनीय शीर्षकसंगीत आणि पार्श्वसंगीत, ह्या कारणांमुळे आकाशवाणी ऐकणं हे खाजगी वाहिन्यांच्या तुलनेत सुसह्य असतं.
खरंतर रेडिओ म्हणजे खाजगी वाहिन्यांचाही उल्लेख हवा. मात्र क्वचित एखाददुस-या वाहिनीवरचा कार्यक्रम वगळता मी फारसं ऐकत नसल्यामुळे त्यासंदर्भात बोलण्यासारखं काही विशेष नाही. दर्जा, कंटेंट, मांडणी, विषयासाठी दिला जाणारा पुरेसा वेळ, उत्तम निवेदने, श्रवणात येणारे किमान अडथळे, अशी अनेक वैशिष्ट्ये आजही बाळगून असलेल्या 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय, बहु जनकल्याणी' आकाशवाणीला तोड नाही.

Saturday, February 8, 2020

 तुलना सहसा करू नये असं म्हणतात. प्रसंग, घटनांनुरुप ते कधी पटतं, कधी नाही, तर कधी कधी आपल्याही नकळत ती होतेच.

जितेंद्र जोशीच्या 'दोन स्पेशल'मध्ये काल आणि आज सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे आले होते. समृद्ध बोलले. पाय जमिनीवर राखून आहेत, हे जाणवत होतं. समारोपाची सयाजी शिंदेंनी म्हणून दाखवलेली अरविंद जगतापांची कविता कळस होती. मात्र हे भाग बघताना, त्यांचं बोलणं ऐकताना उगीचच मधेमधे ह्याच कार्यक्रमाच्या पहिल्या दोन भागात आलेले सुबोध भावे आणि सुमीत राघवन आठवत राहिले. कलावंत आहेतच तेही चांगले, मुद्देही ते योग्य मांडत होते. पण त्यांचा, त्यातही विशेष करून सुबोधचा अहंगंड सातत्याने डोकावत होता, तो प्रकर्षाने जाणवत होता.
पंधरा दिवसांपूर्वी 'गद्धेपंचविशी'बद्दल अनुक्रमे वैभव मांगले आणि चंद्रकांत काळेंचे लेख सलग वाचले गेले. तिथेही तीच कथा. मांगलेंच्या लेखातला शब्दोशब्दी ठिबकणा-या अहंगंडासमोर, मीपणासमोर, चंद्रकांत काळेंचा टोकाचा विनम्र भाव अगदी ठळकपणे जाणवला. काळे पुण्यात वरचेवर कुठे ना कुठे दिसत रहातात. किंवा अगदी अलिकडेच त्यांना 'अपरिचित पुलं'च्या प्रयोगावेळी कोल्हापुरात पाहिलं. माणूस आणि कलाकार म्हणून वावरण्यातली सारखीच सहजता, अभिप्रायांचे नम्रतेने केलेले स्विकार उठून दिसतात. एक ग्लोरी असते त्या व्यक्तिमत्त्वाला.
हे असंच प्रत्यक्षात असेल, नसेल. पण वाचताना, ऐकताना जे अन्वयार्थ लागतात, ते सहसा चकवत नाहीत.
तुमच्या पोतडीत आहेत का अशी काही निरीक्षणे, अशा तुलना?