विठ्ठलवाडीतलं लाडकं दांपत्य. दोन वर्षांपूर्वीच्या उन्हाळ्यातला दोघांचा गारवा. अंगभर चंदनाच्या उटीचं लेपन आणि मोगरीनं सुवासित केलेला गाभारा. जीवाभावाची मायाळू माणसं कायम नाकीडोळी नीटसच दिसतात, त्यात अशी नटली की कशी आणखी देखणी होतात बघा. प्रेमात पडू नये तर काय करावं!
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Tuesday, June 30, 2020
Tuesday, June 16, 2020
लीलाताई पाटलांच्या रुपानं एक मोठं माणूस गेलं.
कोल्हापुरात येताना नीलसाठी प्रामुख्यानं सृजन आनंदच डोळ्यासमोर होतं. अनेक कारणांमुळे ते शक्य होऊ शकलं नाही. पण निदान अधेमधे होणा-या तात्पुरत्या पालक कार्यशाळांमध्ये सहभागी होता येतंय. त्यावेळी मुलं आणि शिक्षणासंदर्भातला पायाभूत विचार आणि प्रयत्न अचंबित करतात. सृजन आनंद पुण्यात किंवा कोल्हापूरबाहेरही असायला हवं होतं का (प्रयत्न झाले असतीलच), कोल्हापुरात ही चळवळ पुरेशा प्रभावीपणे फोफावली नाही का, असे प्रश्न पडतात. ते चुकीचेही असू शकतील, कोणाहीबरोबर तपासून घेतलेले नाहीत. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
लीलाताईंबरोबरची वैयक्तिक आठवण आहे. पुण्यात सुजीत पटवर्धनांबरोबर आम्ही काही जण काही काळ पुणे ट्रॅफिकसंदर्भात त्यांच्या घरी काम करत होतो. विद्याताई पटवर्धनांकडे लीलाताई मुक्कामाला यायच्या. लहानखु-या चणीच्या, बॉबकटातल्या, सुटसुटीत आरामदायी पोशाखातल्या. हसतखेळत, गप्पा मारत आमच्यासोबत जेवायला बसायच्या. आमच्या डब्यांमधले पदार्थ हौसेनं चाखायच्या. इतकं मोठं व्यक्तिमत्व, पण आम्हाला कधी दडपण आलं नाही. आता त्या दोन तीन भेटी आठवताना खूप आश्चर्य वाटतं. त्यापूर्वी त्यांचा 'बापलेकी'तला लेख वाचल्यावर त्यांच्याबद्दल आधीच एक बाणेदार मत तयार झालं होतं, त्या तशाच प्रत्यक्षातही वाटल्या. ही बाब खरंतर त्यांच्या कर्तृत्वासमोर अगदीच गौण आणि इतर कारणांनी अनुल्लेखनीयही, पण तरीही महत्त्वाचीच.
मन:पुर्वक आदरांजली.
Sunday, June 14, 2020
तीन दिवसांच्या सातत्यानंतर आता कोल्हापुरात व्यवस्थित पावसाळा सुरू झाला, असं म्हणता येईल. हवा कुंद आहे. परवापासून सूर्यदर्शनही नव्हतं, आज किंचीत थोडा वेळ रविवार म्हणून दर्शन देऊन गेला. पाऊस थोडा थांबत थांबत पण नियमित चालू आहे. अधेमधे जोराचे वारे वाहतायत. त्यामुळे स्वेटर चढवण्याइतपत गारवाही आलाय हवेत.
Thursday, June 4, 2020
ज्येष्ठात लागलेली आषाढ झड. काळोखलेल्या आभाळामुळे (एरवीही तसा कायमच) निवांत असलेला आसमंत. लवकर आलेली जाग. नसलेली घाई. हातात वाफाळती कॉफी आणि विश्राम गुप्तेंचं (तुम्हाला हवंय नकोय न विचारता) धरूनच ठेवणारं लेखकाची गोष्ट. अजून तरी न पोचलेल्या वटपोर्णिमेच्या शुभेच्छा. एकुणात प्रसन्न सकाळ.
सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. माणूसप्राण्यानं ह्या मौसमापासून जरा मनाची मशागत करायला घ्यावी आता. क्रौर्य आणि उतमातीची परिसीमा गाठलीये आपण. फटकेही तंतोतंत मिळतायत.
Subscribe to:
Comments (Atom)