लीलाताई पाटलांच्या रुपानं एक मोठं माणूस गेलं.
कोल्हापुरात येताना नीलसाठी प्रामुख्यानं सृजन आनंदच डोळ्यासमोर होतं. अनेक कारणांमुळे ते शक्य होऊ शकलं नाही. पण निदान अधेमधे होणा-या तात्पुरत्या पालक कार्यशाळांमध्ये सहभागी होता येतंय. त्यावेळी मुलं आणि शिक्षणासंदर्भातला पायाभूत विचार आणि प्रयत्न अचंबित करतात. सृजन आनंद पुण्यात किंवा कोल्हापूरबाहेरही असायला हवं होतं का (प्रयत्न झाले असतीलच), कोल्हापुरात ही चळवळ पुरेशा प्रभावीपणे फोफावली नाही का, असे प्रश्न पडतात. ते चुकीचेही असू शकतील, कोणाहीबरोबर तपासून घेतलेले नाहीत. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
लीलाताईंबरोबरची वैयक्तिक आठवण आहे. पुण्यात सुजीत पटवर्धनांबरोबर आम्ही काही जण काही काळ पुणे ट्रॅफिकसंदर्भात त्यांच्या घरी काम करत होतो. विद्याताई पटवर्धनांकडे लीलाताई मुक्कामाला यायच्या. लहानखु-या चणीच्या, बॉबकटातल्या, सुटसुटीत आरामदायी पोशाखातल्या. हसतखेळत, गप्पा मारत आमच्यासोबत जेवायला बसायच्या. आमच्या डब्यांमधले पदार्थ हौसेनं चाखायच्या. इतकं मोठं व्यक्तिमत्व, पण आम्हाला कधी दडपण आलं नाही. आता त्या दोन तीन भेटी आठवताना खूप आश्चर्य वाटतं. त्यापूर्वी त्यांचा 'बापलेकी'तला लेख वाचल्यावर त्यांच्याबद्दल आधीच एक बाणेदार मत तयार झालं होतं, त्या तशाच प्रत्यक्षातही वाटल्या. ही बाब खरंतर त्यांच्या कर्तृत्वासमोर अगदीच गौण आणि इतर कारणांनी अनुल्लेखनीयही, पण तरीही महत्त्वाचीच.
मन:पुर्वक आदरांजली.
No comments:
Post a Comment