म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, September 27, 2020

 

❤️🌼उदंड प्रेम आणि अखंड शुभेच्छा🌼❤️
- चित्रकार रघुवीर मुळगावकर.


Tuesday, September 22, 2020

 आज कविवर्य शंकर वैद्यांचा स्मृतीदिन. त्यांच्या रचना फार आवडतात, पण हे काव्य म्हणजे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचं साक्षात् पेंटिंग आहे. लहानपणापासून शिवाजी महाराजांची क्रमशः ओळख होत आलेली होती आणि अजूनही होतेच आहे, तरी ते माझा महत्त्वाचा क्रश होण्याच्या प्रक्रियेत ह्या रचनेचा मोठाच हातभार आहे. 'धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार' असो किंवा 'शिवरायांची नजर फिरे अन् उठे मुलूख सारा' ह्या ओळी शब्दशः प्रत्यय देतात.

धन्यवाद आकाशवाणी ❤️ मी हे लिहून पूर्ण होईतोवरच हे गीत वाजूही लागलंय 🙂🙏🌹
टाळेबंदीच्या काळात सह्याद्री वाहिनीवर शंकर वैद्य यांनी घेतलेल्या अनेक मुलाखती पहाण्यात आल्या. त्यांचा व्यासंग, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, थोडंसं खर्जाकडे झुकणारं सौम्य आणि मीतभाषी बोलणं, आवश्यक तिथेच केलेलं सुरेख प्रसंगानुरूप आपलं आणि इतर कवी-कवयित्रींच्या काव्यांचं वाचन, वक्त्याला बोलतं करण्याची आणि बोलू देण्याची शैली प्रभावित करून गेली.
https://www.aathavanitli-gani.com/Song/Shatakanchya_Yadnyatun

Sunday, September 13, 2020

 पुरणपोळी खायला आलेल्या गर्भार यजमानीणबाई

🙂
सर्वांचा कन्सर्न समजू शकतेय, जंगली जनावरांना खाऊ घालू नये हेदेखील माहितीये.
वानरांच्या टोळ्या आमच्या घराभोवती सातत्याने वावरत असतात. त्यापैकी काही उघड्या खिडकीतून येऊन कधी डायनिंग टेबलवरची केळी खाऊन, कधी आम्ही घरी असतानाही उघड्या दारातून येऊन थेट स्वैपाकघरात जाऊन शेंगदाण्याची बरणी उचलून तर कधी चक्क नुसतंच ट्रेसपासिंग करून गेली आहेत. त्यामुळे घराची दारंखिडक्याही उघडी ठेवायची सोय राहिलेली नाही हल्ली. पण आज अगदी जेवतानाच, त्यातही एक होणारी आई समोर आल्यावर तसंच जेवत रहाणं बरं वाटलं नाही. काय बरं वाईट असेल ते असो.




Thursday, September 10, 2020

 दि. ८ सप्टेंबरपासून दर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता 'दुर्दम्य' ह्या लोकमान्यांवरच्या चरित्रात्मक कादंबरीचे क्रमशः अभिवाचन आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारीत होत आहे. वाचकस्वर निवेदक प्रवीण चिपळूणकरांचा आहे.

गंगाधर गाडगीळांची ही उत्कृष्ट कादंबरी टिळकांना अतिशय सुयोग्य पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवते. ज्यांना शक्य आहे, त्यांनी आवर्जून ह्या अभिवाचनाचा लाभ घ्यावा. कादंबरी लेखनाच्या प्रवासादरम्यान गाडगीळांचा चाललेला प्रचंड अभ्यास, वाचन, संशोधन, चर्चा पाहून ऐकून गाडगीळांच्या मुलीने चित्रलेखाने त्यांना विचारले होते, हे टिळक आपले नातेवाईक आहेत का?🙂 तर टिळक आपल्याला आवडत असतातच, पण कादंबरी वाचताना हा महापुरुष खरोखरच आपल्या घरचा सदस्य होऊन जातो.
परवाच्या गणेशोत्सवात टिळकांची आठवण अनेकांनी मनापासून काढली, कारण यंदा अगदी त्यांना अभिप्रेत असलेले उत्सवाचे स्वरूप साकार झाले.
@ Ṛta , डेक्कन कॉलेजचे वर्णन ऐकताना तुझी आठवण होणारच होती. कादंबरी वाचून खूप वर्षे झाली, तेव्हा आपली ओळख नव्हती, पण आता नक्की ह्यावर तुझ्याकडून आणखी ऐकू शकते. तेव्हा गावाबाहेर दूर अंतरावर, आश्रमाचं स्वरूप असलेला हा परिसर आज ऐन शहरात आला असला तरी आतमध्ये ते जुनंच स्वरूप ब-यापैकी टिकवून आहे, ही कमाल आहे.
बहूजनहिताय, बहूजनसुखाय, बहूजनकल्याणी, आकाशवाणी ❤️


Tuesday, September 8, 2020

कोल्हापुरात संध्याकाळपासून वीजांच्या गडगडाटासह ढगफुटीसदृश भयावह पाऊस चालू आहे. रोजच झोडपतो हल्ली, पण आज उतू जातोय. शहरात अनेक ठिकाणी प्रचंड पाणी साठलंय. रस्त्यांचे ओढे झालेत. काही आवश्यक औषधांसाठी गावभागात जाऊन परतताना अनेक ठिकाणी फिरत, लांबचे वळसे, थांबे घेत कसंतरी घरी पोचता आलं. जमिनी पाण्यानं तुडुंब झाल्यात. माझ्या परिसरातल्या बैठ्या घरांमध्ये अचानक जमिनीतून उमाळे येत गुडघाभर उंचीची तळी झालीयेत. त्यात आजुबाजूच्या कुंपणं घातलेल्या रिकाम्या प्लॉटस् मधलं निचरा होऊ न शकणारं पाणी मिळून परिस्थिती आणखी चिघळतेय. लोक तुफान पावसात भिजत गटारं रिकामी करीत, पत्रे लावत दोदाणा निस्तरायचा प्रयत्न करतायत. भितीदायक चित्र आहे. 

Monday, September 7, 2020

 भगिनींनो, निरामय दीर्घायुरारोग्यासाठी तुम्हा दोघींनाही अनंत शुभेच्छा

❤️🌹
मीनाताई, तुम्हीसुद्धा दीदींसारखंच जे काही मोजकंच, अनवट आणि स्वर्गीय संगीत देऊन ठेवलंय, त्याला तोड नाहीये. उषाताईंकडून गाऊन घेतलेल्या काही विशेष गाण्यांसाठी तर माझ्याकडून वैयक्तिक धन्यवाद आहेत तुम्हाला. तुमचा स्वत:चा आवाज मंजुळ ह्या श्रेणीतला आहे. तुम्ही बांधलेल्या गाण्यांइतकंच तुम्ही बोलतानाही ऐकत रहावंसं वाटतं. प्रसन्न, खळखळून हसणं हे तुम्हा भगिनींचं ठळक, हवंहवंसं वैशिष्ट्य आहे, ते असंच निरंतर राहो.
आशाबद्दल काही नवं, वेगळं बोलण्यासारखं माझ्यापाशी नाही, बस्स, जुग जुग जीयो!🤗
तुम्ही भावंडं आयुष्यातली महत्त्वाची मालमत्ता आहात, कायम रहाल ❤️


Saturday, September 5, 2020

 आजचं आभाळ. मु. पो. कळंबा, गारगोटी रोड.