दि. ८ सप्टेंबरपासून दर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता 'दुर्दम्य' ह्या लोकमान्यांवरच्या चरित्रात्मक कादंबरीचे क्रमशः अभिवाचन आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारीत होत आहे. वाचकस्वर निवेदक प्रवीण चिपळूणकरांचा आहे.
गंगाधर गाडगीळांची ही उत्कृष्ट कादंबरी टिळकांना अतिशय सुयोग्य पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवते. ज्यांना शक्य आहे, त्यांनी आवर्जून ह्या अभिवाचनाचा लाभ घ्यावा. कादंबरी लेखनाच्या प्रवासादरम्यान गाडगीळांचा चाललेला प्रचंड अभ्यास, वाचन, संशोधन, चर्चा पाहून ऐकून गाडगीळांच्या मुलीने चित्रलेखाने त्यांना विचारले होते, हे टिळक आपले नातेवाईक आहेत का?
तर टिळक आपल्याला आवडत असतातच, पण कादंबरी वाचताना हा महापुरुष खरोखरच आपल्या घरचा सदस्य होऊन जातो.
परवाच्या गणेशोत्सवात टिळकांची आठवण अनेकांनी मनापासून काढली, कारण यंदा अगदी त्यांना अभिप्रेत असलेले उत्सवाचे स्वरूप साकार झाले.
@ Ṛta , डेक्कन कॉलेजचे वर्णन ऐकताना तुझी आठवण होणारच होती. कादंबरी वाचून खूप वर्षे झाली, तेव्हा आपली ओळख नव्हती, पण आता नक्की ह्यावर तुझ्याकडून आणखी ऐकू शकते. तेव्हा गावाबाहेर दूर अंतरावर, आश्रमाचं स्वरूप असलेला हा परिसर आज ऐन शहरात आला असला तरी आतमध्ये ते जुनंच स्वरूप ब-यापैकी टिकवून आहे, ही कमाल आहे.
No comments:
Post a Comment