काणेबुवांच्या ह्या सुरेख स्मरणमालिकेतला आज मंजुषा कुलकर्णी-पाटील यांच्या मनोगताचा पहिला आणि अतिशय मनोज्ञ भाग प्रसारीत झाला. फार आवडला. मंजुषाचे गाणे अत्यंत देखणे, शास्त्रशुद्ध आणि तडफदार. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकेच प्रसन्न. त्या तशा गाण्यामागचे सगळे अंतरंग उलगडताना मंजुषांना आपल्या ह्या आदरणीय गुरुंबद्दल किती सांगू, किती बोलू असे होते आहे, इतक्या त्या भरभरून आणि खुलून बोलतायत. त्यात ओतप्रोत कृतज्ञता, त्यांच्या महत्तेची जाणीव, मिळालेल्या ठेव्याबद्दलची जबाबदारी आकंठ आहे. गुरुकुल पद्धतीने, तांत्रिक आणि प्रदर्शनीय अशा दोन्ही अंगांनी, शिष्याच्या खुबी लक्षात घेऊन, वादक साथीदारांना संधी देत गाणं हे टीम वर्क आहे हा दृष्टीकोन आणि सरतेशेवटी गाणं हे स्वत:च्या आनंदाइतकंच श्रोत्यांसाठीही आहे हा कधीही न विसरण्याचा मंत्र. हे काही ठळक मुद्दे गाण्याइतक्याच रसाळ भाषेत, सुंदर मराठीत आणि अधेमधे खळखळून हसत त्यांनी असे सांगितले, की त्या बोलण्यालाही मनमुराद दाद द्यावी. मुलाखतीच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे, तो येत्या गुरुवारी प्रसारीत होणार आहे.
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Saturday, October 24, 2020
मी आणि मंजुषा तशा समवयस्क आहोत. माझ्या आठवणीप्रमाणे ८८ साली कोल्हापुरात शाहू स्मारकात 'अभिरुची' संगीत स्पर्धेत त्यांना शालेय उपशास्त्रीय गटात प्रथम आणि त्याच गटात मला उत्तेजनार्थ पारितोषिक होते, तेव्हा त्यांचे गाणे मी प्रथम ऐकले आणि ते तेव्हाही लक्षवेधी होते. ज्येष्ठ गायक पं. आनंदबुवा लिमयेंच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला होता. त्यांची तयारी जबरदस्त होती. हे आवर्जून जाणवण्याचं कारण मी गायलेलं 'स्वकुलतारक सुता' मी केवळ गाऊन टाकलं होतं. कोणत्या तरी स्पर्धेसाठी आणि स्टेजवरही प्रथमच गात होते. शाळेत 'स्वयंवर'च्या कडक तालमी सुरू होत्या आणि देवल क्लबात डीआर कुलकर्णीसर पहिल्या परीक्षेसाठी भीमपलासची तयारी करून घेत होते. स्पर्धेसाठी अशी खास तयारी केलीच नव्हती. त्यामुळेच मंजुषाचे गाणे ऐकताना जवळपास सारख्याच वयाच्या असूनही आपण किती ढिसाळ गायलो किंवा मुळात गाणं किती गांभिर्याने घ्यायचं असतं, ही जाणीव प्रकर्षाने झाली. तेव्हापासून आजपर्यंत संधी मिळेल तेव्हा मी त्यांचे गाणे ऐकत आले आहे आणि त्यातून त्यांचा आजवरचा प्रवास, चिकाटी आणि कष्टसुद्धा दिसत आलेत. त्याउलट माझं गाणं वाटेतच कुठेतरी हरवलं आणि ते हरवलंय हेदेखील लवकर लक्षात आलं नाही, इतका उठून दिसणारा माझा हलगर्जीपणा. त्यांना तेव्हाही स्पष्ट माहिती होतं ध्येय आणि कुठे पोहोचायचं आहे. आज त्या त्या स्थानावर पोचल्या आहेत आणि अजूनही प्रवास सुरू आहे असा नम्र भाव बाळगून स्वत:चा स्वतंत्र शिष्यपरिवारही आता त्या तयार करतायत.
त्यांचं गाणं ऐकताना मला नेहमी वाटतं की त्यांना का नाही कौशिकी चक्रवर्तीइतकं राष्ट्रीय स्तरावरचं ग्लॅमर मिळालं अजून! चोखंदळ श्रोते आवर्जून ऐकतातच, पण अशा ग्लॅमरचा सर्वसामान्य लोकांपर्यंत कोणतीही उत्तम चीज पोहोचण्यासाठी उपयोग नक्की थोडा अधिक असतो.
ज्येष्ठ गायक हृषिकेश बोडस, मंगला जोशी, सुखदा काणे अशा आणि आता मंजुषा, अशा सर्व वयोगटातील शिष्यांनी सांगितलेल्या आठवणी ऐकताना काणेबुवांबद्दल खूप मोलाची माहिती मिळते आहे आणि त्यांच्याबद्दलचा आदर शतगुणित होतो आहे. नीनाताई फार ओघवते प्रश्न विचारत सर्वांना बोलतं करते आणि त्यांनाच बोलू देते. कार्यक्रम चढत्या भाजणीने रंगतो आहे. ह्या कार्यक्रममालिकेसाठी तिला शतशः धन्यवाद आणि तिच्यासकट कोल्हापूर आकाशवाणीचेही खूप आभार.
Tuesday, October 20, 2020
ललिता पंचमी
ललिता पंचमीला कोल्हापुरात टेंबलाईची यात्रा असते. अंबाबाई आणि टेंबलाई सख्ख्या बहिणी, दोघींच्यात काहीतरी चकमक झाली आणि टेंबलाई रुसून गावाबाहेरच्या टेकाडावर जाऊन बसली. ललिता पंचमी दिवशी अंबाबाई पालखीतून ह्या बहिणीला भेटायला जाते, त्यांच्या गप्पागोष्टी, आहेरमाहेर होतात आणि त्या आनंदाप्रित्यर्थ ही यात्रा भरते.
ही यात्रा म्हणजे आम्हां शहरातच लहानाचे मोठं झालेल्यांसाठी रम्य आठवणी आहेत. टेंबलाईचा हा गावाबाहेरचा भाग अगदी खरोखरचा आणि तेव्हा लांब असलेला ओसाड माळ होता. हे एवढं एक आणि एरवी शुकशुकाट असणारं एकच देऊळ त्या टेकाडावर. माझ्या आठवणीप्रमाणे झाडंही फारशी नव्हती तिकडे. यात्रेसाठी पालिकेने खास जादा डबल डेकर्स सोडलेल्या असत, त्या बिंदू चौकातून सुटत. आत्ताच बाबांनी सांगितले की कोल्हापूर महानगरपालिका खास यात्रेनिमित्त सात-आठ नव्या डबल डेकर्स विकत घेत असे आणि त्या नव्या बसेस यात्रेला आधी लावत असे. बसेससाठी प्रचंड लांबच लांब रांगा असायच्या. कारण खाजगी वाहनं तेव्हा फार कुणाकडे नसत आणि असली तरी सहकुटुंब सहपरिवार गर्दीबरोबर यात्रेला जाणं हा आनंद मोठाच असणार. दुपारपासून लोक ताटकळत रांगेत थांबायचे. आम्ही दोघी आणि बाबा असे जायचो. अनेकदा आमच्याबरोबर दोघं चुलतभाऊ, काकु, तिच्या मैत्रिणी आणि त्यांची मुलंही असायची. शिवाय रांगेत असताना, नंतर यात्रेतही सगळे ओळखीचे लोक, नातेवाईक, शेजारी पाजारी, शाळेतल्या मैत्रिणी भेटायच्या. थोडक्यात अख्खं कोल्हापूर यात्रेला लोटायचं, ह्यावरून गर्दीची कल्पना येईल. ह्या गोंधळातून जर डबल डेकरच्या वरच्या मजल्यावर पुढे बसायला मिळालं तर होणारा आनंद आभाळाएवढा असायचा. आम्ही रांगेतली पोरंटोरं त्यासाठी आसुसलेले असायचो आणि मागची बस भरल्यावर रांग कुठे तुटली, त्यावरून आपण वर की खाली, पुढे की मागे हे अंदाज चालायचे. काय काय गंमती!
कोणत्याही यात्रेत असतात तसे टेंबलाईला पण फिरत्या दुकानांचे नाना त-हेच्या वस्तूंनी भरलेले ठेले असायचे. नजर जाईल तिथवर माळ आणि टेकाडाची देवळापर्यंतची चढण गच्च भरलेली दिसायची. आणि कशी कोण जाणे, तेव्हा ती टेकडी उंचही भासायची, जी प्रत्यक्षात बुटकी आहे. पिपाण्या, मातीची चित्रं, पळत जाताना हातात धरायची वा-यानं फिरणारी कागदी चक्रं, पिसाच्या उंच टोप्या, गडद पिवळे दागिने, हवेतले आणि जमिनीवरचे पाळणे, इकडे तिकडे फिरणा-या पेरीना आईस्क्रिमच्या भरपूर पांढ-या हातगाड्या, शेवखंडासारखे सहसा घरी न होणारे एरवी फिरत्या गाडीवरून घ्यायला बंदी असणारे म्हणून खूप खावेसे वाटणारे आणि यात्रेत खायला मिळणारे खाऊ, वडे-भजीच्या गाड्यांवरच्या तेलांचे वास, संध्याकाळी प्रत्येक ठेल्यावर लागणारे पेट्रोमॅक्सचे दिवे. ह्या सगळ्यात पार्श्वभूमीला भयंकर कलकलाट आणि कोलाहल. सारखं सटरफटर काही तरी खात आमची तोंडंही चालू असायची. खरेदी फारशी नसायचीच, पण बाबा कोणत्याही गोष्टी घ्यायला कधी नाही म्हणाल्याचंही आठवत नाही. तसंच आम्ही किंवा बाबांनीही रांगेत उभे राहून टेंबलाईचं दर्शनही घेतल्याचं आठवत नाही. अगदी वरपर्यंत जायचो, पण ते फिरत फिरत यात्रेच्या आनंदासाठीच.
यात्रेत बाबांचे मित्र वसंत कुंभारकाकांचं मातीच्या चित्रांचं दुकान असायचं. मग चालून चालून पाय दुखायला लागले की थोडा वेळ तिथं त्यांच्यामागे जाऊन बसायचं आणि आजुबाजूची मजा निरखायची. परत येताना पुन्हा रांगेत थांबून डबल डेकरनंच यायचं. पण येताना अंगात त्राण नसायचं. बिंदू चौकापासून घर दोन मिनिटंही नाही, पण ते अंतर चालणंही रात्री जीवावर यायचं इतके पाय बोलायचे. मग दुसऱ्या दिवशी शाळेत दिवसभर हाच विषय आणि चर्चा चाललेली असे.
पंचवीसेक वर्षं कोल्हापूरबाहेर असल्याने यात्रा घडली नाही आणि आता इकडे आल्यापासून यात्राच होऊ शकलेली नाही. कसे योग असतात! पुढच्या वर्षापर्यंत नव्हे, तर लवकरात लवकर सगळं आलबेल होऊन यात्राच काय, अख्खं जगच सुरळीत नांदायला लागू दे, ही अंबाबाई आणि टेंबलाई ह्या दोघींच्या चरणी मनापासून प्रार्थना. ही यात्रा आमच्यासाठी एक अविस्मरणीय आनंदाची दुपार ते उशिरा संध्याकाळ असायची, एवढं मात्र खरं

Sunday, October 18, 2020
हस्त नक्षत्र उलटून गेलं असलं तरी भोंडला/हादगा आणि नवरात्र हे समीकरण डोक्यात घट्ट आहे. आज आम्ही भोंडला केला. पाटावरचा हत्ती नीलनं आणि शेजारचा त्याच्या मित्रानं काढला आहे. इमारतीतल्या आणि गल्लीतल्या शेजारणी जमलो. दिवसाउजेडी करायचा होता पण सगळ्या जमेतोवर अंधार पडला. काही गाणी पूर्ण आठवली नाहीत, तेव्हा युट्युब मदतीला आलं. हातात हात न गुंफता नुसता फेर धरला. एकत्र आवाजातली गाणी, हास्यविनोद सणावाराची भावना जाणवून देतात. सहा सात महिन्यांची साचलेली मरगळ थोडी झटकायचा प्रयत्न.
Friday, October 16, 2020
यंदा कडाकण्या घरीच आणि मनसोक्त खाता येणार
कडाकण्या मला आणि बाबांना आवडतात. आमच्याकडे त्या करण्याची पद्धत नाही. आज अचानक बाजारात हे दिसलं आणि उचललंच. गंमत म्हणजे घरी करण्याचं कधी सुचलंही नाही आजवर. कारण काही पदार्थ कायम घरपोचच मिळत आलेले असतात 
मोत्यांचा गजरा आणि फॅन्सी मंगळसुत्र आमची डॉमेस्टीक इंजिनिअर मंगलसाठी आहे. (संज्ञा क्रेडीट टू सुला व-हाडकर) तेही असंच फारच आवडलं. तिला शोभेल छानपैकी, हौसेनं घालेल अगदी. तर बाजारातून आलेल्या पिशव्या उपसत जे जिथे जागा मिळेल तिथे ते ठेवलं की असं कशाच्याही शेजारी कुणीही असू शकत असतं
लाडकी फुलं ह्या मौसमात आज पहिल्यांदाच थोडीफार तरी वेचता आली. मग त्यांचं कवतिक अंमळ जास्तच 





Rupali, तुझी फुलदाणी चपखल आहे बघ ह्या लाडक्यांसाठी
ता.क. - मैदा-रव्याच्या गोड, कडक पांढ-या पु-या असतात. कुणाकुणाकडे बेसनाच्याही करतात. त्यांचा साचा मिळतो. त्यांना लाटताना पेनच्या टोपणानं मधे भोक पाडून, साचा नसेल तर कडेनं कातणीनं नक्षीदार कातून तळतात आणि नवरात्रींच्या माळांमध्ये त्या रोज एकेक ओवतात
माळेत मावाव्यात म्हणून फुगू देत नाहीत, जास्त टिकाव्यात म्हणून खरपूस कडक तळतात. कडक म्हणून पण कडाकण्या. तुकडा मोडताना खरंच कडाक आवाज होतो
इकडे घराघरात मोठमोठाले डबे भरून करतात आणि दिवाळी फराळासारखी देवाण-घेवाणही करतात. आम्ही आमच्या शेजारी-पाजारी त्या लाटायलाही जायचो. ही माझी थोडी ऐकीव, थोडी अनुभवलेली माहिती आहे, ज्यांना जास्त माहिती आहे, त्यांनी कृपया भर घाला. त्या करून ओवण्यामागे कारण काय हेही जाणून घ्यायला आवडेल.
Sunday, October 11, 2020
Subscribe to:
Comments (Atom)