म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, December 20, 2021

 कोणतीही बातमी समजल्यानंतर लगेच व्हॉट्स अप स्टेटसला लावायची घाई का असते आपल्याला! आधी पूर्ण खात्री करून घेऊ या की. कधी कधी खातरजमा करून घेतलेली बातमीसुद्धा खोटी असू शकते. अगदी वर्तमानपत्रं आणि वाहिन्यासुद्धा चुकीचं सांगू शकतात. जरा थांबू, खात्री करू, मग व्यक्त होऊ. पण निदान अफवा पसरवण्यासाठी आपला हातभार लागणार नाही, एवढी तरी काळजी घेऊ.

देव करो आणि अफवा उठलेल्या बातमीबद्दल खडखडीत बरं झाल्यावर ते खुद्द येऊन स्वतः सर्वांची शाळा घेवोत!
हा संदर्भ आज तरी केवळ कोल्हापूरसाठी आहे, पण सर्वांना कायमस्वरूपी ही कळकळीची विनंती आहे.
आई अंबाबाई सगळं बरे करो.
#CDJoshiSir

Saturday, December 18, 2021

 आज गायिका कृष्णा कल्लेंचा जन्मदिवस आहे असं कोल्हापूर आकाशवाणीनं आठवणीनं सांगितलं. अगदी परवा दिवशीच मी खूप शोधत असलेलं 'तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी' हे अवीट गोडीचं गाणं चैतन्यनं Chaitanya चटकन त्याच्या पोतडीतनं काढून दिलं. मन पिसाट माझे अडले रे, रामप्रहरी रामगाथा, श्रीरंग सावळा तू मी गौरकाय राधा, तुझ्याचसाठी कितीदा, अशी रत्नं ऐकताना डोलवतात. आठवणीतली गाणीवर हे सगळे आनंद एकत्र करून ठेवलेली सोय म्हणजे वरदान आहे.

कृष्णा कल्ले, पुष्पा पागधरे, रंजना पेठे, अपर्णा मयेकर, ज्योत्स्ना हर्डीकर, अनुपमा देशपांडे, ह्या सगळ्या गुणी गायिका फार फार आवडत्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=JU82MP9z0Zg

Tuesday, December 14, 2021

 मांजरांना, पाळीव प्राण्यांना किंवा खरं म्हणजे सगळ्यालाच (बाहेरच्या किंवा शेजारच्या मुलांनी खेळायला यायचं नाही, कुणीही कोणताही व्यवसाय करायचा नाही, पाय आपटत जिने चढायचे नाहीत, शिवण मशीन चालवायचं नाही, मुलांनी आरडाओरडा करायचा नाही, वगैरे अनेक. पुण्याला नावं ठेवणा-यांनी ह्याची खास दखल घ्यावी) विरोध करणा-या कि-यानिष्ट शेजा-यांना तुम्ही योग्य मार्गानं आणि त्रास करून न घेता कसं तोंड देता? आमच्या शेजा-यांचा सध्या आम्हाला कडाडून विरोध सुरू आहे. त्यातही जे दोन अतीकजाग शेजारी आहेत त्यांच्याच दारात शी करणे, उंदराचं पिटुकलं मारून आणून टाकणे असे उपद्व्याप जेव्हा (मर्फी'ज लॉ!) आपली पोरं करतात, तेव्हा मग आगीत साग्रसंगीत तेल आणि मज्जा. स्वच्छता करून, वास राहू नये म्हणून फिनेल आणि ओझोन भरपूर वापरून पुसून घेतलं. नवी पायपुसणी आणून दोन्ही दारात घातली, दिलगिरी व्यक्त करायला विसरले नाही. मी एक कन्व्हर्टेड मांजर प्रेमी आहे. तरी हे सगळं लिहितेय. सहवास असणाऱ्या सजीवांचा लळा आपोआप लागतोच.

आम्ही पाचव्या मजल्यावर आहोत. विली आणि चिली-मिली आता स्वतंत्रपणे बाहेर भटकत असतात. जिना आणि आमच्याबरोबर लिफ्ट, दोन्ही वापरतात. थेट खाली, थेट वर. जिना वापरताना कुणाच्याही घरी एकदाही शिरलेली नाहीत. त्यांचा कोणताही उपद्रव आजपर्यंत कुणालाही झालेला नाही. आमची मुलं म्हणून कौतुक आहे असं नाही, तर त्यांच्या ह्या सवयींबद्दल सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. कालपासून लिफ्ट बंद आहे म्हणून आमचं उतरणं कमी झालंय. त्यांचं रुटीन चालू आहे. भटकणारी मुलं कशाला घरात बसतील, नाही का? नेमकी आज सोसायटीची मिटिंग आणि बाकी सगळं, अगदी बंद पडलेल्या लिफ्टचाही मुद्दा बाजूला पडून आमची मुलं आणि त्यामुळे होणारा तथाकथित त्रास हाच अजेंडा झाला! अशावेळी एरवी जे गोडीत असतात आणि ज्यांची मुलं आमच्या ह्या तिन्ही मुलांशी मनसोक्त खेळतात, तेही लोक सोयीस्करपणे विरोधाच्या गंगेत यथेच्छ हात धुऊन घेतात. आमची इमारत अजून रजिस्टर्ड अपार्टमेंट नाही. शिवाय कायद्यानं कुणीही रहिवासी पाळीव प्राण्यांना विरोध करू शकत नाहीत वगैरे सगळं माहीती आहे. पण ते बडगे रोज शेजारी रहाताना उपयोगाचे नसतात, सातत्यानं वाकड्यात शिरून रहाता येत नाही आणि मनस्ताप होतो. दोन्ही मुलं अडॉप्शनसाठी द्यायची आहेत, त्यांनाही मदत करायला सांगितलंय.
अशा परिस्थितीत तुम्ही कसा तोडगा काढता?

 My version of a Greek God.

सपशेल क्लिन बोल्ड. देखणेपण, वावर आणि अभिनय, सग्गळं बिनतोड. नजर हटूच नये असं खूप खूप दिवसांनी होतंय. ऑसिजचे फेस कट्स हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.

Sunday, December 12, 2021

 साधलेली निमित्तं आणि त्यानिमित्तानं!

साबुदाण्याची खिचडी हा बाबांचा वीकेस्ट पॉईंट आहे. इतकी, की ती खायला घालून तुम्ही त्यांच्याकडून त्यांची अख्खी मालमत्ता खिशात घालू शकाल. पण त्यांना ती स्वतःच्या हातचीच सर्वात जास्त आवडते. (कळलं ना, माझे सर्व प्रयत्न विफल असण्याचं कारण 😜) एरवी हल्ली त्यांना घरच्या साखर कारखान्यामुळे जरा गिल्ट असतो खिचडी खाताना. पण मागच्या आठवड्यात पुपो वगैरे आस्वादूनही कालची रिडिंग्ज अनपेक्षितपणे झक्कास आल्यामुळे आज ऑफिशियल सेलिब्रेशन आहे. त्यात रविवार. डिसेंबरातला. हिवाळा संबोधता येईलसा उगा पोटापुरता गारवा आहे. सक्काळ सक्काळ असं आयतं, वाफाळतं खाणं मायेनं हातात मिळण्यासाठी मी नक्की किमान काही तरी पुण्य केलं असणार आहे. खिचडी चवदार होतेच कारण त्यांच्या हातालाच चव आहे. ते भाकरी वगळता सर्व स्वैपाक करतात आणि पदार्थ कधी बिघडत म्हणून नाही. आज खिचडी झाल्यावर लक्षात आलं की बटाटे राहिले. पण मला आवडतात म्हणून लगेच काच-या तेलमीठावर वाफवून वरून मिसळल्या आणि वाढली! हा सुगरणपणा नव्हे?
स्वैपाकघरात बागडणे हा बाबांचा विरंगुळा आहे. एरवी त्यांना माझ्यामुळे हे बागडणं तितक्या मनसोक्तपणे करता येत नाही. शिवाय माझा स्वैपाक सपक, टिपिकल गुळमाट आणि त्यांना झणझणीत लागतं. त्यांना वय कितीही मान्य नसलं तरी आता अधेमधे वय स्वतःच तिखटाविरुद्ध उठाव करतं. मग जेवताना पानात तेलात कालवलेला कांदा लसूण मसाला घेऊन तुका म्हणे त्यातल्या त्यात करत बिचारे परिस्थितीशी जुळवून घेतात झालं. हे असं फारच झालं की कधीतरी तडकून मला 'तू हो बाजूला, माझं मी करतो' असं सरसावून ते स्वैपाकघर ताब्यात घेतात. म्हणून मग मी आठवड्यातून एकदा त्यांनी आणि नातवानं मिळून सगळ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायचा उपाय सुचवला. हवं ते, हवं तसं करा. मी आपली त्यांच्या हाताखाली (लिंबूटिंबू मदत, मागचं ओट्यावरचं ब्रह्मांड आवरणे वगैरे) पूर्वीच्या सासवांना कशा सुना लागायच्या तशी माफक लुडबुड करते.
मला तशीही स्वैपाकाची नावड आहे. पुढेमागे स्वत:चं स्वतंत्र घर बांधलं तर स्वैपाकघर नसेल त्यात, इतकी. म्हणजे करणं झटपट होऊन जातं, पण ते विचार नको असतात. ह्या आठवड्याच्या एका ब्रेकमुळे तेवढा एक दिवस स्वैपाकाचा विचार करावा लागत नाही हा सर्वात मोठा आनंद. नेमकं त्यातच बाबा रमत असल्यामुळे मी आणि ते हा ब्रेक एंजॉय करतो. लहरी महंमद नातू ह्यात कधी असतो, कधी नसतो. अर्थातच मग ते ओट्याशी आहेत किंवा खाली बसून काही चिराचिरी करतायत आणि मी त्यांच्या आरामखुर्चीत हातात चविष्ट ठोकळे घेऊन निवांत लोळतेय असं चित्र सर्रास असतं.
पण ही गंमत एवढीशीच नाही. मी साधारण ज्या वातावरणात रहाते तिथं पाचवी-आठवीतल्या पुरुषांच्याही पाणी-चहा हातात ठेवणं, आंघोळीसाठी कपडे काढून देणं किंवा आई घरात नसेल तर त्याच वयाच्या बहिणीनं किंवा थकलेल्या वयाच्या आजीनं रांधून जेवायला घालून ह्यांनी जेवून ताटातच हात धुवून बाजूला होणं ही प्रथा आहे. अशावेळी ऐंशीच्या घरातला एक पुरुष आठवीतल्या नातवाबरोबर पोटापाण्याची शब्दशः सोय बघत स्वैपाकघरात राबतोय आणि त्याची ढमाली, घोडी पोरगीबाई ऐतखाऊसारखी दात काढत फर्माईशी करत वाचत पडलीये हे किती घोर खटकणारं आहे हे तुम क्या जानो! मी भयंकर चित्रविचित्र कटाक्षांंची, गॉसिपची धनीण आहे.
मी भले हे गंमतीच्या सुरात लिहिलं असेल, पण मी उल्लेख केलेलं माझ्या भोवतालचं वातावरण गंमतीत घेण्यासारखं नाही. ह्याहून अधिक काही बोलावं, लिहावं ही आवश्यकता आहेही आणि नाहीही. कारण इथे कुणी काही लिहिलेलं वाचणारे वेगळे आणि भोवतालच्या वातावरणातले वेगळे असू शकतात, दोन्ही एकच असू शकतात किंवा दोन्हींचा मेळ असणारेही असतील. मी काही लिहून बोलून परिस्थिती बदलणार आहे, असाही भाबडा आशावाद नाही. प्रामाणिकपणे, ह्या सगळ्यात उडणारा माझा गोंधळ मात्र खरा आहे.
नेहमीप्रमाणे भरकटलेल्या विचारांचा आवरण्यापलिकडचा पसारा.




Friday, December 10, 2021

 गुरू तो गुरू. जसं हजार पाकक्रिया उलथ्यापालथ्या करून शेवटी ओगलेआजींनाच साकडं घालणं जात्याच पिंडात आहे, तसं निशा, आदित्य, गौतम महर्षी, रणबीर, नायजेला, अर्चना आर्ते, वरूण, स्मिता देव, मधुरा, अर्चना हेब्बार, झरीन खान सगळ्यांबरोबर जगभर उंडारून पुनश्च संजीव कपूरकडे. ह्या त्यांच्या दोन चार मिनिटांच्या क्लिप्स पार्श्वसंगीतासकट मस्त असतात.

#SanjeevKapoor