दुपारी पोकळ्याचं गरगटं केलं. नेहमीप्रमाणे भरपूर. गरगटं म्हणजे डाळीचं पीठ लावून गरगटलेलं. पळीवाढीपेक्षा घट्ट आणि झुणक्याहून पातळ, असं अधलंमधलंच. पोकळा ही कोल्हापूर परिसरातली लाल माठवर्गीय लाडकी पालेभाजी आहे. लाल माठाची पानं जरड आणि चव चोथ्याकडे सरकलेली असते, [असं माझं वैयक्तिक मत आहे, मतभेदांबद्दल पांढरं निशाण] आणि लाल माठ अंग चोरत नाही तर पोकळा तुलनेत अंग चोरणारा, पण नाजूक पानादेठांचा आणि चवदार, त्यामुळे इकडे बहुतेकांच्या आवडीचा प्रकार आहे. घरटी आठवड्यातून एकदा तरी ही भाजी होत असते. पण आज ती माझ्या कर्तृत्वानं बेहद्द बेचव झाली होती. मग बाबांनी सुचवलेले काही फेरफार केल्यावर रात्री ती चांगलीशी खाणेबल झाली. ते करताना अर्थातच मला रश्मीच्या आईची आणि त्यांनी केलेल्या मेथीच्या भाजीची हटकून आठवण आली.
रश्मी, अश्विनी आणि मी हॉस्टेल रुममेटस्. पीजी म्हणून रहाताना आणि तिघींचंही वेगवेगळं शिक्षण चालू असताना आम्ही तिघींनी मिळून भरपूर धमाल केली. रश्मीचं लग्न ठरल्यावर परदेशात असणारे तिचे आई-बाबा लग्नापुरते पुण्यात रहायला आले. लग्नाच्या दोन तीन दिवस आधीची गोष्ट आहे. रश्मीच्या हातावर मेंदी काढणं सुरू होतं. आणखी बरेच जण होते घरात आणि हास्यविनोद, चेष्टा मस्करी असं लग्नघराला साजेसं आनंदी वातावरण होतं. दुपारी बाहेरच्या खोलीत मधे अन्नपदार्थ आणून ठेवले आणि आम्ही बाकीचे जेवायला बसलो. काकुंनी मेथीची गोळाभाजी केली होती. वाढून घेताना ऐनवेळी त्यांनी लसूण खरपूस केलेली आणि मोहरी हिंगाची खमंग गरम फोडणी आणून त्या भाजीवर पसरली. त्या क्षणी उसळलेला तो स्वर्गीय सुगंध, फुललेल्या मोहरीचे दाणे आणि बारीक चिरलेला कुरकुरीत लसूण, ती मेथीच्या भाजीची कढई, ताटं घेतलेले आम्ही सगळे, मधे ठेवलेली ती अन्नाची भांडी, एकीकडे चाललेली रश्मीची मेंदी, असं सगळं आठवणीत तेव्हा जसंच्या तसं जे फिट्ट बसलं ते आजतागायत.
आज पोकळ्याचं गरगटं दुरुस्त करताना बाकीच्या सुधारणांबरोबरच तशी मंद आचेवरची लसूण मोहरी हिंगाची कुरकुरीत खमंग फोडणी गरगट्यावर ओतली आणि चवीचा नूर पालटला. अशी फोडणी नेहमी होते आणि त्या प्रत्येक वेळी फक्त लग्नाच्या वेळी गाठ पडलेल्या काकू आणि तो शुभ प्रसंग त्या जिवंत सुगंधासकट नजरेसमोर येतात.
अशी पदार्थांची, कपड्यांची, वस्तूंची, प्राण्यांची, झाडांची, माणसांची, घरांची, रस्त्यांची, शहरांची, आणखीही कशाकशाची अनंत असोसिएशन्स आपल्या मनात असतात, नवीन तयार होतच रहातात आणि त्या त्या क्षणी मेंदू न चुकता इमानेइतबारे त्या नोंदी आपल्यासमोर हजर करत रहातो. एरवी असंख्य गोष्टी वेळेला आठवत नाहीत, पण जोवर ह्या अशा नोंदी वर येत रहातायत, तोवर तरी वरचा मजला आलबेल आहे ही खात्री ठेवायला हरकत नाही, अशी आपली एक स्वतःचीच समजूत.
No comments:
Post a Comment